राज्य सरकार 14 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून ते 30 एप्रिलच्या मध्यरात्री पर्यंत लॉकडाऊन लावण्याच्या तयारीत

लॉकडाऊन

मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येतील दैनंदिन वाढ सुरूच आहे. राज्यात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत असून परिस्थिती आणखी बिकट बनत चालली आहे. राज्यात अंशतः आणि आठवड्याच्या अखेरीस कडक निर्बंध लावूनसुद्धा रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे आणखी कडक निर्बंध लावण्याच्या विचारात राज्य सरकार आहे.

राज्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता राज्य सरकार 14 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून लॉकडाऊन लावण्याच्या तयारीत आहे. 14 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून ते 30 एप्रिलच्या मध्यरात्री पर्यंत लॉकडाऊन करणार असल्याचं कळतं. जर रुग्णांच्या संख्येत घट झाली नाही तर लॉकडाऊनचा कालावधी आणखी वाढण्याची शक्यता आहे. या लॉकडाऊन दरम्यान फक्त अत्यावश्यक सेवा सुरु राहतील. वेळीच लॉकडाऊन केलं नाही तर एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत रुग्णांचा आकडा 11 लाखांच्या आसपास जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य सरकार लॉकडाउन दरम्यान कडक निर्बंध लावण्याच्या तयारीत आहे.

दरम्यान, दुसरीकडे महाराष्ट्रात कोविड प्रतिबंधक नियमांचं योग्य पालन होत नसल्याचं राज्यातल्या 30 जिल्ह्यांच्या दौऱ्यावर असलेल्या उच्चस्तरीय केंद्रीय आरोग्य पथकांना या सर्वच जिल्ह्यांमध्ये आढळून आलं आहे. या नियमांच्या अंमलबजावणीसाठी कठोर पावलं उचलण्याची गरज असल्याचं मत या पथकांनी व्यक्त केलं असून विविध जिल्ह्यांमध्ये असलेल्या आरोग्य सेवा आणि प्रशासनातल्या त्रुटी दाखवून देत त्या दूर करण्यासाठी तातडीनं पावलं उचलण्याची सूचनाही केली आहे.

या पथकांकडून केंद्राला राज्यातल्या 30 जिल्ह्यांमधल्या कोविड स्थितीबाबतचा दैनंदिन अहवाल पाठवला जातो. या अहवालातील गंभीर दखल घेण्याची गरज असलेल्या नोंदी केंद्रीय आरोग्य सचीव राजेश भूषण यांनी राज्याचे आरोग्य सचीव डॉक्टर प्रदीप व्यास यांना पत्राद्वारे कळवल्या असून त्यात नमूद केलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी तातडीनं पावलं उचलण्याची सूचना केली आहे.

महत्वाच्या बातम्या –