देशातील कोरोना लसीकरणाबाबत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

कोरोना लस

नवी दिल्ली : देशात लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यास सुरुवात होणार आहे. या टप्प्यात ६० वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना लस दिली जाणार आहे. सोबतच ४५ वर्षांवरील पण गंभीर आजार असणाऱ्या लोकांचंही या टप्प्यात लसीकरण दिलं जाणार आहे. आता सरकारी रुग्णालयांसोबतच काही खाजगी रुग्णालयांमध्येही लसीकरणाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

दरम्यान, देशातील कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी मोठा निर्णय जाहीर केला आहे. देशभरातील नागरिक आथा दिवसाच्या २४ तासांत कधीही आपल्या सोईनुसार कोरोनावरील लस घेऊ शकणार आहेत.

केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये म्हणाले की, केंद्र सरकारने कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी लसीकरणासाठी असलेली वेळमर्यादा समाप्त करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील नागरिक आता दिवसाच्या २४ तासांत कधीही लस घेऊ शकतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील नागरिकांच्या आरोग्यासोबतच त्यांच्या वेळेचे महत्त्वही जाणतात.

कोरोना लसीकरणाला सुरुवात झाल्यापासून देशभरात आतापर्यंत १.५४ कोटी नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. या आकडेवारीमध्ये मंगळवारी देण्यात आलेल्या सहा लाख ९ हजार ८४५ लसींचाही समावेश आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आपल्या तात्पुरत्या आकडेवारीमध्ये ही माहिती दिली आहे. कोविड-१९ विरोधात देशव्यापी लसीकरण मोहीम १६ जानेवारीपासून सुरू झाली होती. सुरुवातीला आरोग्य कर्मचाऱ्यांना आणि २ फेब्रुवारीपासून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लसीकरणाची सुरुवात झाली होती.