मास्क घाला, शिस्त पाळा आणि लॉकडाऊन टाळा – एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे

ठाणे –  मास्क घाला, शिस्त पाळा आणि लॉकडाऊन टाळा असे ठाणे  जिल्हावासियांना आवाहन करण्याबरोबरच  नियम न पाळणाऱ्यांवर  कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा पालकमंत्री श्री शिंदे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत घेतला. या बैठकीस ठाणे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, ठाणे मनपा आयुक्त डॉ.विपीन शर्मा, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांसह अन्य अधिकारी उपस्थित होते.

यावेळी श्री.शिंदे यांनी सांगितले आज जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात आहे. ही परिस्थिती नियंत्रणाखाली ठेवणे गरजेचे आहे. यासाठी नियमांची कडक अंमलबजावणी करा. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता सूक्ष्म नियोजन करा. ज्या ठिकाणी रुग्णसंख्या वाढते आहे ते क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करा. सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रात प्रभावी उपाययोजना राबवा. संपर्क शोध मोहीम (कॉन्टॅक्ट ट्रेसिंग) अधिक प्रभावीपणे राबवा असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.

मास्क, सुरक्षित अंतर न पाळणाऱ्यावर कठोर कारवाई

मास्क, सुरक्षित अंतर आणि वारंवार  हात धुणे या त्रिसुत्रीचे प्रत्येकाने पालन करणे आवश्यक आहे.  याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करावी, असे निर्देशही पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

हॉटेल, उपहारगृहे, मंगलकार्यालये, मॉल तसेच रिसोर्ट येथे आयोजित करण्यात येणारे समारंभ हे शासनाच्या नियमांचे पालन करुन आयोजित करावेत. विहीत मर्यादेपेक्षा जास्त संख्या आढळून आल्यास संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश पोलिस प्रशासनास दिले. पोलिसांनी सरप्राईज चेक करावे तसेच सामाजिक अंतरांचे नियम न पाळणा-यांवर थेट कारवाई करावी. ज्या आस्थापना, संस्था, कार्यालये शासनाच्या नियमांचे उल्लंघन करतील त्यांचा परवाना रद्द करणे अथवा सदर ठिकाण सील करण्याबरोबरच दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांनी सांगितले.

दहावी व बारावीचे वर्ग वगळता अन्य वर्गाच्या शाळा बंद

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्व व्यवस्थापनाच्या  ५वी ते १२ वी पर्यतच्या शाळा सध्या सुरु आहेत. दहावी व बारावीचे वर्ग वगळता अन्य सर्व वर्गांच्या शाळा पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश पालकमंत्री यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत.  ऑनलाईन पद्धतीने शाळा सुरु राहतील. शिक्षणविभागाच्या निर्देशांचे पालन करणे शाळांवर बंधनकारक असेल.  आवश्यकता  असेल तिथे  जिल्हा प्रशासनाने आवश्यक ते निर्बंध घालण्याचे निर्देश त्यांनी यावेळी  दिले.

आठवडाभरानंतर परिस्थितीचे अवलोकन करून पुढील निर्णय घेण्यात येतील. ठाणे जिल्ह्यात लॉकडाऊन सध्या करण्यात येणार नाही त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवु नये, असेही पालकमंत्री श्री.शिंदे यांनी यावेळी सांगितले.

महत्वाच्या बातम्या –