राज्यात पुन्हा लॉकडाऊन करायचा की नाही? अजित पवार म्हणाले….

अजित पवार

मुंबई – राज्यात कोरोनाचं संकट पुन्हा एकदा डोकं वर काढत असताना दिसतंय. राजकीय पक्षांचे कार्यक्रम, लग्न समारंभ, सार्वजनिक ठिकाणी नागरिकांकडून कोरोना प्रतिबंधक नियमांचे सर्रास उल्लंघन होताना दिसत आहे. यामुळेच राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसून येत आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक ते सर्व निर्णय घेतले जातील असं सांगत लॉकडाऊन करायचा की नाही? याबाबत विचार सुरू असल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

‘राज्यात जानेवारीच्या अखेरीस कोरोना परिस्थिती नियंत्रणात होती. पण फेब्रुवारीत रुग्णसंख्या वाढताना दिसतेय. लोक मास्क वापरत नाहीत. प्रतिबंधक नियमांचं पालन करत नाहीत. त्यामुळे आता कठोर निर्णय घ्यावेच लागतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईपेक्षा अमरावती, यवतमाळमध्ये रुग्ण संख्या जास्त वाढताना दिसतेय. यामुळे फक्त शहरांमध्ये की ग्रामीण भागातही लॉकडाऊन लावायचा याबाबत विचार सुरू आहे. थोड्याच वेळात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत महत्वाची बैठक आहे. यात कोरोना रुग्णवाढीवर सविस्तर चर्चा होणार आहे’, असं अजित पवार म्हणाले आहेत.

राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढू नयेत म्हणून जी खबरदारी आणि जे निर्णय घेण्याची गरज वाटेल मग ते कितीही कठोर निर्णय असले तरी ते घेतले जातील, असं स्पष्ट करत अजित पवार यांनी लॉकडाउनचे संकेत दिले आहेत. याशिवाय अकोला, अमरावती आणि यवतमाळमध्ये पुन्हा लॉकडाऊन करण्याचा विचार सुरू असल्याचंही ते म्हणाले. अकोला, अमरावती आणि यवतमाळमध्ये कोरोना रुग्णवाढीचं प्रमाण वाढलेलं दिसतंय त्यामुळे या भागांसाठी कडक निर्बंध लागू केले जाण्याची दाट शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या –