जलयुक्त शिवार अभियानातंर्गत १३५ कोटींची कामे होणार

टीम महाराष्ट्र देशा –  जलयुक्त शिवार अभियानातंर्गत तिसऱ्या टप्प्यात जिल्हयातील 206 गावांमध्ये 135 कोटी रुपये खर्चाची 6358 कामे होणार आहे. या कामांच्या आराखड्यास आज जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीने दिली मंजूरी दिली आहे. मंजूरी दिलेल्या कामांबाबत पुढील आवश्यक ती कार्यवाही करुन ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी संबंधित यंत्रणेला दिल्यात. ही कामे पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्याची वाटचाल निश्चितपणे दुष्काळमुक्तीकडे होईल, असा आशावाद जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनाने टंचाईसदृश्य परिस्थितीला सक्षमपणे तोंड देण्याबरोबरच राज्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ‘सर्वांसाठी पाणी – टंचाईमुक्त महाराष्ट्र 2019’ चे उद्दिष्ट समोर ठेवून डिसेंबर 2014 पासून जलयुक्त शिवार अभियान राबविण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेतला.
राज्यात यावर्षी या अभियानाचा तिसऱ्या टप्प्या सुरु असून या वर्षी जिल्हयातील 206 गावांची निवड करण्यात आला आहे. या वर्षीपासून गावांची निवड केल्यानंतर आराखडयास ग्रामसभेची मान्यता घ्यावी लागणार असल्याने प्रत्येक गावातील 5 व्यक्तींना कृषी विभागातर्फे प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच गावात शिवार फेरी काढण्यात येवून गावात कोणती कामे करावायाची हे ठरवून त्यास ग्रामसभेची मान्यता घेण्यात आली आहे. या आराखड्यांना तालुकास्तरीय समितीनेही मान्यता दिली आहे. जिल्हयातील 206 गावांनी तयार केलेल्या आराखडयांना आज जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मान्यता दिली आहे. या अभियानातंर्गत करण्यात येणाऱ्या कामांच्या लवकरच विविध विभागामार्फत निविदा काढून कामे सुरु करण्यात येणार आहे.

जलयुक्त शिवार अभियानातंर्गत तिसऱ्या टप्प्यात तालुकानिहाय निवड झालेल्या गावांची संख्या जळगाव तालुका -12 गावे, भुसावाळ- 14, रावेर-7, मुक्ताईनगर-15, बोदवड-15, यावल-7, अमळनेर-16, धरणगाव-11, पारोळा-14, एरंडोल-10, चोपडा-10, पाचोरा-16, भडगाव-12, चाळीसगाव-21, जामनेर तालुका -26 गावे याप्रमाणे 206 गावांची निवड करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील या गावामध्ये कृषि विभागामार्फत 58 कोटी 94 लाख 55 हजार रुपयांची 3307 कामे, लघुसिंचन (जिल्हा परिषद) विभागामार्फत 49 कोटी 68 लाख 35 हजार रुपयांची 615 कामे, वरीष्ठ भूवैज्ञानिक भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा विभागामार्फत 1 कोटी 8 लाख रुपयांची 184 कामे, उम मुख्य कार्यकारी ग्रामपंचायत विभागामार्फत 3 कोटी 66 लाख 35 हजार रुपयांची 1771 कामे, लघुसिंचन (जलसंधारण) विभागामार्फत 4 कोटी 6 लाख 76 हजार रुपयांची 59 कामे तर वन विभागामार्फत 17 कोटी 64 लाख 46 हजार रुपयांची 422 कामे अशी एकूण 135 कोटी 8 लाख 47 हजार रुपये खर्चाची 6 हजार 358 कामे करण्यात येणार आहे.जलयुक्त शिवार अभियानातंर्गत करण्यात येणाऱ्या कामांमध्ये कंपार्टमेंट बंडींग, सी.सी.टी. लूज बोल्डर स्ट्रक्चर, गॅबियन स्ट्रक्चर, सिमेंट नाला बांध, नाला खोलीकरण, नवीन सिमेंट नाला बांध, नवीन माती नाला बांध, के. टी. वेअर दुरुस्ती, पाझर तलाव, गाव तलाव दुरुस्ती, गाळ काढणे, विहिर पुर्नभरण, सलग समतल चर, दगडी बांध, वन बंधारा, जलशोष खड्डे आदि कामांचा समावेश आहे. यावेळी जिल्हाधिकारी यांनी जलयुक्त शिवार अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यातील अपूर्ण कामांचाही आढावा घेतला. शेतातील पिके निघाल्यानंतर ही अपूर्ण राहिलेली कामे त्वरीत पुन्हा सुरु करुन ती मार्चअखेर पूर्ण होतील यादृष्टिने यंत्रणेने नियोजन करावे असेही जिल्हाधिकारी यांनी बैठकीत सांगितले.