२ नोव्हेंबर पासून शेतकरी पुन्हा संपावर

मागील काही दिवसापूर्वी विविध मागण्यासाठी शेतकरी संपावर गेले होते. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफी मिळावी, या बरोबरच हमी भाव मिळावा इत्यादी मागण्या आंदोलनातून करण्यात आल्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देखील सरकारकडून देण्यात आले परंतु अजूनपर्यंत दिलेल्या आश्वासनाची पुर्तता करण्यात आली नसल्यामुळे  सरकारच्या कारभारावर राज्यातील शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर अद्यापही शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी संपाचे हत्यार उपसण्याच्या तयारीत आहेत. राज्य सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या कर्जमाफी आणि छ्त्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान या योजनेतून शेतकयांचा अपमान झाला आहे. तसेच शेतकयांच्या मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. यापार्श्वभूमीवर राज्यातील शेतकरी २ नोव्हेंबरपासून राज्यव्यापी संपावर जाणार आहेत, असा इशारा शेतकरी आक्रोश कृती समितीचे शांताराम कुंजीर यांनी दिला.

कुंजीर म्हणाले की, कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना अर्ज भरण्यासाठी सांगण्यात आले. दिवाळीपूर्वी बँकेत रक्कम जमा होईल, असे आश्वासनही सरकारने दिले. मात्र, अद्याप ही शेतकयांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर नाही, असेही ते म्हणाले. शेती आणि पूरक व्यवसायांची संपूर्ण कर्ज मुक्त करावी. वयाच्या साठीनंतर शेतकरी पती-पत्नीला दरमहा ५ हजार रुपये निवृत्ती वेतन देण्यात यावे, अशा अनेक मागण्यांसाठी राज्यव्यापी संपाचा निर्णय घेतल्याचे कुंजीर यांनी सांगितले.