जनावरांचे लसीकरण महत्त्वाचे

पशुधन, पाळीव प्राणी व वन्यजीवांपासून अनेक रोग माणसात संक्रमित होत असतात. जैवतंत्रज्ञानाच्या विकासामुळे रोगजंतू विरुद्ध परिणामकारक लस निर्मिती होत आहे. सशक्त पशुधन, स्वच्छ पर्यावरण व पर्यायाने सुरक्षित मानवी जीवन या संकल्पनेत पशू लसीकरणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

पशुस्वास्थ्य, पशुकल्याण, पशुजन्य पदार्थ तसेच सामूहिक शास्त्राकरिता पशू लसीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे. लसीकरण पद्धती एक किफायतशीर पद्धती असून, याद्वारे पशुजन्य आजार तसेच पशूपासून मानवास होणाऱ्या आजारांना प्रतिबंध करता येतो. लसीकरणामुळे भारतातून बुळकांड्या रोगाचे समूळ उच्चाटन तसेच रेबीजची दाहकता कमी झाली.

जनावरे आणि कोंबड्यांतील स्वास्थ्य तसेच उत्पादनवाढीकरिता लसीकरणाचा उपयोग होतो. जागतिक कृषी संस्थेच्या अनुमानाप्रमाणे जगाची लोकसंख्या सन २०२५ मध्ये ८ अब्ज तर २०५० मध्ये ९.१ अब्ज होईल. त्याचप्रमाणे मागास तसेच विकसनशील देशातील कुपोषित लोकांसाठी पोषक आहार उपलब्ध होण्यासाठी मांस व दूध उत्पादनात वाढ होणे आवश्यक आहे. एका अनुमानानुसार वाढत्या लोकसंख्येच्या अन्नविषयक गरजा भागविण्यासाठी सन २०५० पर्यंत ७० टक्के अन्न उत्पादन वाढणे आवश्यक आहे. यामध्ये प्राणीजन्य पदार्थांचा मोठा वाटा असून लसीकरणाशिवाय ही उत्पादन वाढ अशक्य आहे.

पशुधन, पाळीव प्राणी व वन्यजीवांपासून अनेक रोग माणसात संक्रमित होत असतात. लसीकरणामुळे या रोगांचा प्रतिबंध करून पर्यायाने मानवी जीवन सुरक्षित करता येते. पर्यावरणाचा ऱ्हास, जागतिकीकरण इत्यादीमुळे रोगजंतूंचा प्रसार वेगाने होत असून नव्याने येणारे रोग तसेच रोग जंतुतील जनुकीय बदल हे पशुरोग तसेच पशुजन्यरोग शास्त्रज्ञांच्या पुढील आव्हान ठरत आहे. जैवतंत्रज्ञानाच्या विकासामुळे नवीन तंत्रज्ञानाने रोगजंतू विरुद्ध परिणामकारक लस निर्मिती होत असून सशक्त पशुधन, स्वच्छ पर्यावरण व पर्यायाने सुरक्षित मानवी जीवन या संकल्पनेत पशू लसीकरणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

प्रतिजैवक प्रतिबंध हे मानवापुढील २१ व्या शतकातील आव्हान असून जागतिक आरोग्य संघटना, जागतिक कृषी संघटना, विविध देशातील शासनकर्ते, स्वयंसेवी संघटना इत्यादीद्वारे एक मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत प्रतिजैवकांना लसीकरणाद्वारे प्रतिबंध हा उपाय आहे.

जैव तंत्रज्ञानाच्या वापराने जनावरांकरितादेखील अत्याधुनिक लस निर्मिती केली जाते. यामध्ये बर्ड फ्लू, मरेक्स रोग, डिस्टेंपर, रेबीज, मानमोडी रोग इत्यादी रोगांवर लस निर्मिती करण्यात आली आहे. नवीन रोग तसेच रोग जंतूतील जैविक बदल यावर मात करण्याकरीता पशुवैद्यकीय तसेच वैद्यकीय शाखांनी एकत्रीत लस निर्मिती क्षेत्रात कार्य करणे आवश्यक आहे. याकरिता साथीच्या रोग प्रसाराबाबत सातत्याने तपासणी आवश्यक आहे. केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्तिक विद्यमाने विविध योजनांतर्गत लाळ्या खुरकूत, पी. पी. आर., गर्भपात नियंत्रण, घटसर्प, फऱ्या इत्यादी जनावरांतील रोग तसेच कोंबड्यांतील मानमोडी रोग, मरेक्स इत्यादी रोगांच्या नियंत्रणासाठी लसीकरण केले जाते.

लसीमधील संशोधन
भारतीय कृषी संशोधन परिषद, भारतीय वैद्यक परिषद तसेच विविध संशोधन संस्था तसेच विद्यापीठे या क्षेत्रात पशुसंवर्धन खात्याच्या मदतीने कार्य करीत आहेत. लाळ्या खुरकूत रोगावर अखिल भारतीय संयुक्तिक संशोधन प्रकल्पांतर्गत पुणे स्थित केंद्रामार्फत संशोधन केले जाते. महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर अंतर्गत परभणी येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाद्वारे निल जिव्हा रोग नियंत्रणासाठी लस विकसित करण्याकरिता अखिल भारतीय संशोधन प्रकल्पांतर्गत संशोधन झाले. मुंबई तसेच नागपूर येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयात पशुजन्य आजारावरील सातत्याने तपासणीकरिता संशोधन कार्य चालू असून त्याचा वापर परिणामकारक लस निर्मितीमध्ये होतो.

– डाॅ. व्ही. व्ही. देशमुख, ८९९९१३१३३२
(लेखक पशू सामूहिक शास्त्र विभाग, पशुवैद्यकीय महाविद्यालय, परभणी येथे विभागप्रमुख आहेत.)