हक्काची जमीन न मिळाल्यास मंत्रालयात जीव देईन !

मुंबई  : धर्मा पाटील या शेतक-याच्या मृत्युनंतर धुळे जिल्ह्यातील अनुबाई दगडू ठेलारी या शेतकरी महिलेने हक्काची जमीन न मिळाल्यास मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरून आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे.न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतरही मला माझी हक्काची जमीन सरकार मिळवून देत नाही. मग, मी न्याय कुठे मागायचा ? असा सवाल त्यांनी यावेळी केला.

दरम्यान, उद्या मंगळवारी त्या एक दिवस आझाद मैदानात उपोषणाला बसणार असून त्यांनी यासाठी पोलिसांकडे रितसर परवानगीही मागितली आहे. धुळ्याच्या साक्री तालुक्यातील लोणखेडी येथील रहिवासी अनुबाई दगडू ठेलारी यांची जमीन गावातील काही पाटलांनी बळकावली असून, ती परत देण्यासाठी न्यायालयाने आदेश दिले आहे. मात्र, अद्यापही जमीन त्यांना परत मिळालेली नाही. त्यासाठी आपण मुख्यमंत्री कार्यालयापासून राज्यपाल कार्यालयात शेकडो पुरावे दिलेले आहेत.

पण, आपल्याला न्याय मिळाला नाही. यामुळे आता आपल्याला न्याय मिळाला नाही तर मंत्रालयात जीव देऊ आणि आपल्या मयताच्या सामानाची सरकारने तयारी करावी, असा इशारा अनुबाईंनी दिला आहे.