मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीवर उपाय योजनेसाठी पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांचा इस्त्रायल अभ्यास दौरा

मुंबई, दि. ८ : मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीवर उपाय योजनेसाठी पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ दि. ९ जून ते १३ जून या कालावधीत इस्त्रायलच्या अभ्यास दौऱ्यावर जात आहे.

या शिष्टमंडळात पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव श्याम लाल गोयल, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव पी. वेलारासू, महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचे सचिव डॉ. सुरेश कुलकर्णी, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे संचालक शेखर गायकवाड, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता (मु.) सुभाष भुजबळ, मंत्री महोदयांचे खासगी सचिव बप्पासाहेब थोरात, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता (जालना) अजय सिंह यांचा समावेश आहे.

मराठवाडा महसूल विभागातील दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी उपाययोजना करण्याचे राज्य शासनाचे धोरण आहे. मध्यपूर्वेतील इस्त्रायल या देशामध्ये वाळवंटी परिस्थिती असूनसुद्धा जलसंधारण, पाण्याचा पुनर्वापर, पुनर्चक्रिकरण इत्यादी क्षेत्रामध्ये उच्च दर्जाची कामे करण्यात आली असून, पाणी वापराची अत्युच्च कार्यक्षमता साध्य करण्यात आली आहे. इस्त्रायलच्या या अनुभवाचा मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी उपयोग करण्याचे राज्य शासनाने निश्चित केले आहे. यासाठी इस्त्रायल शासनाच्या मालकीच्या मे. मेकोरोट कंपनीसोबत करार करण्यात आला आहे. मराठवाड्यातील प्रस्तावित उपाय योजनेचे स्वरुप निश्चित करण्यासाठी पुढील दोन वर्षात विविध प्रकारचे अहवाल तयार करण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने इस्त्रायलमध्ये प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांची पाहणी करण्यासाठी हे शिष्टमंडळ जाणार आहे.

मराठवाडा दुष्काळमुक्तीच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकत भीषण दुष्काळात होरपळत असलेल्या मराठवाड्याची पाण्याच्या टंचाईतून कायमस्वरूपी मुक्तता करण्यासाठी गावे व शहरांना पाणीपुरवठा करणारी वॉटर ग्रीड योजना राबविण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने व पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या प्रयत्नाने महाराष्ट्र शासन व मे. मेकोरोट, इस्त्रायल सरकार अंगीकृत कंपनी यांच्यामध्ये दिनांक 21 फेब्रुवारी, 2018 रोजी मराठवाडा वॉटर ग्रीडसाठी सर्वंकष करार झाला होता.

मे. मेकोरोट, इस्त्रायल कंपनी मराठवाड्यातील उपलब्ध पाणीसाठे, पर्जन्यवृष्टी, भूस्तर रचना, भूजलाची पातळी, पाणी साठे, वाहून जाणारे पाणी, उपलब्ध पाणी याचा समग्र अभ्यास करून शाश्वत पाणीपुरवठा करण्याचा मास्टर प्लॅन तयार करून त्याबाबतचा प्राथमिक संकल्प अहवाल (PDR) सादर करणार आहे. माहे डिसेंबर 2018 अखेर भांडवली कामाला प्रत्यक्ष सुरूवात करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

मराठवाडा विभागामध्ये 8 जिल्हे येत असून, त्यात 78 तालुके, 12,978 गावे/वाडया, 25 नगरपंचायती, 50 नगरपालिका व 4 महानगरपालिका आहेत. सद्यस्थितीत 2011 च्या जनगणनेप्रमाणे १ कोटी 33 लाख 36 हजार एवढी ग्रामीण तर 53 लाख 96 हजार एवढी शहरी लोकसंख्या या विभागात आहे. या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना ठोक प्रमाणात पाणी पुरवठा करणेसाठी वॉटर ग्रीडची स्थापना करण्यात येत आहे. यात होणा-या सर्वेक्षणामध्ये सध्या अस्तित्वात असणारे पाणीपुरवठा योजनांची सर्व उपांगे ही वापरण्यात येतील व ग्रीडमध्ये समाविष्ट करण्यात येतील. ग्रीडमध्ये मराठवाड्यातील जवळपास सर्वच मोठी धरणे जसे जायकवाडी, माजलगाव,लोअर दुधना, येलदरी, विष्णूपुरी, मांजरा, मनार व सिध्देश्वर तसेच मध्यम व लघु सिंचन प्रकल्प जोडण्यात येतील. पावसाची वारंवारिता व अपुरा जलसाठ्याचा उपलब्धतेप्रमाणे वेळोवेळी आवश्यकतेप्रमाणे मराठवाड्या बाहेरील जसे उजनी, खडकपूर्ण इ. सारख्या प्रकल्पातून देखील पाणी घेण्याची व्यवस्था यात निर्माण करण्यात येईल.

पूर्ण व्यवहार्यता अहवालाद्वारे या वॉटर ग्रीडच्या सर्वेक्षण आराखडे व अंदाजित खर्च समजून येणार आहे. या तपासणी अहवालात मराठवाड्यातील पाणी संपत्तीचे मोजमाप होऊन पाणी क्षमता ध्यानात येईल. त्यानुसार प्रत्यक्षात पिण्याचे उद्योगाचे, शेतीच्या व व्यवसायाची पाणी निकड ध्यानात येणार आहे. पाणी उपलब्धता व पुरवठा याची सांगड घालण्यात येऊन मागणी पुरवठ्याप्रमाणे पाणी स्थिती उपलब्ध होईल. कशाप्रकारे जलसाठे जोडणे शक्य होईल या सर्वच बाबींचा उहापोह होऊन येत्या काही महिन्यातच या योजनेचा आराखडा आपल्यासमोर येईल व मराठवाडयाच्या शाश्वत पाणी पुरवठ्यासाठी महत्वाची योजना आपल्या सर्वांसमोर येईल.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पुढाकारातून व पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांच्या पाठपुराव्यातून ही योजना साकारत असून मराठवाडामध्ये वॉटर ग्रीड कशी राबविता येइल याच्या अभ्यासासाठी श्री. लोणीकर यांनी यापूर्वी गुजरात वॉटर ग्रीड, तेलंगणा वॉटर ग्रीड तसेच शेजारी राष्ट्र असलेल्या श्रीलंका वॉटर ग्रीड ची पाहणी केली होती.