मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या हिताच्या निर्णयाचे राजकारण करु नये – नवाब मलिक

मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या हिताच्या निर्णयाचे राजकारण करु नये - नवाब मलिक malik

शासनाने वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात ५१.३३ हेक्टर जमीन भाडेतत्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दल उलट-सुलट बातम्या प्रसिद्ध होत आहेत. त्याअनुषंगाने मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

मलिक म्हणाले, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही साखर क्षेत्रात संशोधन करणारी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारी नामवंत संस्था आहे. येथे अनेक आंतरराष्ट्रीय परिषदा, विविध संशोधनपर कार्यक्रम वेळोवेळी होत असतात. देशाचे प्रधानमंत्री यांच्यासह इतर अनेक मान्यवर या संस्थेस भेट देतात. पुण्यात असलेल्या या संस्थेने पश्चिम महाराष्ट्रात ऊस क्षेत्र विकसित करण्यात मोठे योगदान दिले आहे. आता मराठवाड्यातही ऊस क्षेत्र वाढत आहे. तेथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे, तेथील हवामानाच्या अनुषंगाने संशोधन करणे अशा विविध उद्देशांच्या अनुषंगाने शासनाने या संस्थेला संबंधित जमीन भाडेतत्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यासंदर्भातील फाईलवर स्वाक्षरी करुन ही जागा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला देण्यासंदर्भात मंत्रिमंडळाकडे जाण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला होता, असे त्यांनी सांगितले.

मराठवाड्यातील ऊस संशोधनात वाढ व्हावी, तेथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळावे या दृष्टीनेच संस्थेला जमीनरुपी मदत देण्याची भूमिका शासनाने घेतली आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या हिताच्या या निर्णयाचे राजकारण करु नये, असे मंत्री नवाब मलिक यांनी दिले. खासदार शरद पवार हे या संस्थेचे विश्वस्त आहेत. इतरही अनेक आमदार, मंत्री या संस्थेचे विश्वस्त आहेत. ही जागा खासदार शरद पवार यांना दिली असे म्हणणे हे लोकांची दिशाभूल करणारे आहे. ही जागा खासदार शरद पवार यांना दिली नसून ती वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला देण्यात आली आहे हे लक्षात घ्यावे, असेही मंत्री मलिक यांनी स्पष्ट केले.

संबंधित जागा ही वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला विकत देण्यात आली नसून अटी शर्तींवर भाडेतत्वावर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या जागेचा वापर मराठवाड्यातील ऊस संशोधनासाठी करण्यात येईल. मराठवाड्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने हा महत्त्वाचा निर्णय असून त्याचे राजकारण करु नये, असे मंत्री मलिक यांनी स्पष्ट केले.