राज्यातील सूतगिरण्या सक्षमपणे सुरू राहण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेणार – डॉ.नितिन राऊत

डॉ.नितिन राऊत

राज्यातील सूतगिरण्या सक्षमपणे सुरू राहण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात येतील. कारखान्यांमध्ये जास्तीत जास्त सौरऊर्जेचा वापर व्हावा यादृष्टीने उपाययोजना करण्यात येणार असून, वीजनिर्मीती करणाऱ्या कारखान्यांना वीजदरात सवलत देण्यात येणार असल्याची माहिती ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली.

वस्त्रोद्योग धोरणांतर्गत सहकारी सूतगिरण्यांना देय असणारी वीज अनुदान सवलत मिळण्यासंदर्भात मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले.

मंत्री डॉ.राऊत म्हणाले, राज्याच्या विकासाच्या दृष्टीकोनातून उद्योगवाढीसाठी वीजदर कमी करणे गरजेचे असून, त्यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल. जे उद्योजक राज्यात नव्याने उद्योग सुरू करण्यास उत्सुक आहेत. अशा उद्योजकांना महाऊर्जा विभागाने पुढाकार घेऊन परवानगी द्यावी. तसेच, सूतगिरण्यांनी वस्त्रोद्योग विभागाकडून वीजदरात सवलत मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत असेही मंत्री श्री. राऊत यांनी सांगितले. सौरऊर्जेला महत्त्व देण्यात यावे. सौरऊर्जेचा वापर मोठ्या प्रमाणात व्हावा यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना मंत्री श्री. राऊत यांनी दिल्या. तसेच, जे कारखाने वीजनिर्मिती करतात त्यांना वीजदरात सवलत देण्याबरोबरच खरेदी दर माफ करण्यासंदर्भात कार्यवाही करण्याच्या सूचनाही मंत्री राऊत यांनी दिल्या. ऊर्जा विभागाचे धोरण उद्योगांना पूरक असे राहील तसेच सौरऊर्जेसंदर्भात लवकरच नवे धोरण आणण्यात येईल, असेही डॉ.राऊत यांनी सांगितले.

बैठकीस राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम, राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासमवेत वस्त्रोद्योग, ऊर्जा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या –

जलवाहिनी दुरुस्तीसाठी काम करणाऱ्या अभियंत्यांचे आदित्य ठाकरे यांच्याकडून कौतुक

सुमन चंद्रा यांनी शेतकऱ्यांना दिलासा म्हणून काही सवलती केल्या जाहीर

सांगली पूरग्रस्त भाग; गिरीश महाजन यांचा पहिला सेल्फी व्हिडीओ, त्यानंतर पाण्यात उतरले

लोकप्रतिनिधींबद्दल गैरसमज पसरविण्याचे काम त्यांनी थांबवा – अजित पवार