Share

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देणार – विजय वड़ेट्टीवार

Published On: 

🕒 1 min read

चंद्रपूर – सावली तालुका आणि परिसरात गोसीखुर्द प्रकल्पामुळे सिंचनाची सोय झाली आहे. त्यामुळे या परिसरात धानासाठी बारमाही पाणी उपलब्ध आहे. मात्र, वरचा अवकाळी पाऊस आपल्या हाती नाही. काही दिवसांपूर्वी या भागात पडलेल्या अवकाळी पावसामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निश्चित मदत करणार, अशी ग्वाही राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वड़ेट्टीवार यांनी दिली.

पाथरी येथे तलाठी कार्यालयाचे लोकार्पण करतांना ते बोलत होते. यावेळी गडचिरोलीचे माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, पं. स. सभापती विजय कोरेवार, मध्यवर्ती सहकारी बैंकेचे संचालक संदीप गड्डमवार, तहसीलदार सागर कांबळे आदी उपस्थित होते.

माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांनी गोसीखुर्द प्रकल्पाची पायाभरणी केली, असे सांगून पालकमंत्री श्री. वड़ेट्टीवार म्हणाले, या प्रकल्पामुळे सावली तालुका सिंचनामध्ये राज्यात अग्रेसर झाला आहे. गोसीखुर्दचे पाणी आसोलामेंढा येथे आणण्यासाठी आपण संघर्ष केला. अखेर हे पाणी आल्यामुळे येथील शेतकरी सुखावला. एकीकडे ही परिस्थिती असतांना गत पंधरवड्यात अवकाळी पावसाने कहर केला. शेतकऱ्यांच्या हाती आलेला घास या पावसाने हिसकावून घेतला. या नुकसानग्रस्त शेतमालाची प्रशासनासोबत आपण पाहणी केली असून शेतकऱ्यांना शासनाची सर्व मदत मिळवून देऊ. त्यासाठी 30 नोव्हेंबर रोजी राज्याचे कृषीमंत्र्यांना सुद्धा या भागात येण्याची विनंती केली असून ते येथे येणार आहेत. मंत्रीमंडळाच्या बैठकीत नुकसानग्रस्त पिकाचा विषय मांडला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

सुरुवातीला पालकमंत्र्यांच्या हस्ते डोंगरगांव (मस्के) येथे रस्त्याच्या बांधकामाचे भूमिपूजन, मंगरमेंढा येथे लहान पुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य वैशाली शेळके, पं. स सदस्य उर्मिला तराळे, डोंगरगांवचे सरपंच रेवनाथ चिनारकर, चिखलीचे सरपंच रेखा बानबले, मंगरमेंढाचे सरपंच गुरुनाथ निसार आदी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या – 

 

बातम्या (Main News) राजकारण (Politics)

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon

🕘 संबंधित बातम्या