सुधारित पद्धतीने करा केळी लागवड

शास्‍त्रीय नांव – मुसा पेंराडिसीएका

कुळ – मुसासीड (कर्दळी)

विशेषत – एकदलीय, मऊ खोडाचे झाड, कंदापासून लागण, मांसल मुळे, उष्‍णदेशिय वनस्‍पती.

उपनाम – कर्दळी, केला, केळी, रंभाकर्दळी, बनाना

लागवड

क्षेत्राच्‍या व उत्‍पन्‍नाच्‍या दृष्‍टीने आंब्‍याच्‍या खालोखाल केळीचा क्रमांक लागतो. केळीच्‍या उत्‍पन्‍नात भारताचा दुसरा क्रमांक लागतो. भारतात अंदाजे दोन लाख वीस हजार हेक्‍टर क्षेत्र केळीच्‍या लागवडीखाली आहे. केळी उत्‍पादन करणा-या प्रांतात क्षेत्राच्‍या दृष्‍टीने महाराष्‍ट्राचा जरी तिसरा क्रमांक लागत असला तरी व्‍यापारी दृष्‍टीने किंवा परप्रांतात विक्रीच्‍या दृष्‍टीने होणा-या उत्‍पादनात महाराष्‍ट्राचा पहिला उत्‍पादनापैकी सुमारे 50 टक्‍के उत्‍पादन महाराष्‍ट्रात होते. सध्‍या महाराष्‍ट्रात एकूण चौवेचाळीस हजार हेक्‍टर क्षेत्र केळीच्‍या लागवडीखाली असून त्‍यापैकी निम्‍म्‍यापेक्षा अधिक क्षेत्र जळगांव जिल्‍हयांत आहे.   म्‍हणून जळगांव जिल्‍हाला केळीचे आगार मानले जाते.

मुख्‍यतः उत्‍तर भारतात जळगाव भागातील बसराई केळी पाठविली जाते. त्‍याचप्रमाणे सौदी अरेबिया इराण, कुवेत, दुबई जपान व युरोपमधील बाजारपेठेत केळीची निर्यात केली जाते.  त्‍यापासून मोठया प्रमाणावर परकीय चलन प्राप्‍त होते.

केळीच्‍या 86 टक्‍केहून अधिक उपयोग खाण्‍याकरीता होतो. पिकलेली केळी उत्‍तम पौष्टिक खाद्य असून केळफूले, कच्‍ची फळे व खोडाचा गाभा भाजीकरिता वापरतात. फळापासून टिकावू पूड, मुराब्‍बा, टॉफी, जेली इत्‍यादी पदार्थ बनवितात. वाळलेल्‍या पानाचा उपयोग आच्‍छादनासाठी करतात. केळीच्‍या खोडाची व कंदाचे तुकडे करुन ते जनावरांचा चारा म्‍हणून उपयोगात आणतात. केळीच्‍या झाडाचा धार्मिक कार्यात मंगलचिन्‍ह म्‍हणून उपयोग केला जातो.

उपयोग

केळीमध्‍ये कर्बयुक्‍त पदार्थचा भरपूर साठा असून 18 ते 20 टक्‍के शर्करी, स्निग्‍ध पदार्थ, कॅलशिअम फॉस्‍पोरस, लोह खनिजे, ब जीवनसत्‍व यांचा आंतरभाव असतो. कच्‍या फळात टॅनीन व स्‍टार्च विपूल प्रमाणात असते. केळी पिकापासून 79 कॅलरीपर्यंत उष्‍णता मिळू शकते. केळीचे फळ मधूमेह, संधीवात मूत्रपिंड, दाह, हृदयविकार, अमांश व पोटातील कृमी आणि जंत इत्‍यादींवर गुणकारी आहे.

हवामान

केळी हे उष्‍ण कटीबंधीय फळ असून त्‍यास साधारण उष्‍ण व दमट हवामान चांगले मानवते. साधारणतः 15 ते 40 डिग्री सेंटीग्रेड पर्यंतचे तापमान या पिकास चांगले मानवते. हिवाळयात 12 सेंटीग्रेडचे खाली व उन्‍हाळयात 40 सेंटीग्रेडपेक्षा जास्‍त उष्‍ण हवामान असल्‍यास  पिकावर अनिष्‍ट परिणाम होतो. केळीची पाने तापमान 60 सेंटीग्रेडपेक्षा कमी असल्‍यास पिवळी पडतात आणि 44 सेंटीग्रेडपेक्षा तापमान जास्‍त झाल्‍यास केळीची वाढ खुंटते. उन्‍हाळयातील उष्‍ण वारे व हिवाळयातील कडाक्‍याची थंडी या पिकाला हानीकारक असते. जळगांव जिल्‍हयातील हवा दमट नसली तरी केळी खाली जास्‍त क्षेत्र असण्‍याचे कारण म्‍हणजे तेथील काळी कसदार जमिन, पाणी पुरवठयाची चांगली सोय व उत्‍तर भारतातील बाजारपेठांशी सुलभ, थेट दळणवळण हे होय.

जमीन

केळी पिकाला भारी कसदार सेंद्रीय पदार्थयुक्‍त  अशी गाळाची, भरपूर सुपिक, भुसभुशित किंवा मध्‍यम काळी एक मिटरपर्यंत खोल असलेली व पाण्‍याचा चांगला निचरा होणारी जमिन मानवतेग. क्षारयुक्‍त जमिनी मात्र केळी लागवडीस उपयुक्‍त नाहीत.

जाती

केळीच्‍या 30 ते 40 जाती आहेत. त्‍यापैकी पिकवून खाण्‍यास उपयुक्‍त जाती उदा. बसराई हरीसाल लालवेलची, सफेदवेलची, मुठडी, वाल्‍हा लालकेळी आणि शिजवून किंवा तळून खाण्‍यास उपयुक्‍त जाती उदा राजेळी, वनकेळ तसेच शोभेसाठी रानकेळ या जाती आहेत. प्रत्‍येक जाती विषयी थोडक्‍यात माहिती खालीलप्रमाणे

बसराई – या जातीला खानदेशी, भुसावळ, वानकेळ, काबुली, मॉरीशस, गव्‍हर्नर, लोटणं इत्‍यादी नांवे आहेत. व्‍यापारी दृष्‍टया ही जात महाराष्‍ट्रात सर्वात महत्‍वाची आहे. महाराष्‍ट्रामध्‍ये केळीच्‍या एकूण क्षेत्रापैकी 75 टक्‍के क्षेत्र या जाती लागवडीखाली आहे. ही जात बांध्‍याने ठेंगणी 5 ते 6 फूट उंच, भरपूर प्रमाणात उत्‍कृष्‍ट व दर्जेदार फळ देणारी असल्‍यामुळे तिला बाजारात अधिक मागणी असते. या जातीला उष्‍ण कोरडे हवामान मानवते. या जातीला वा-यापासून कमी नुकसान पोहोचते. या जातीचे घड मोठे असून सारख्‍या आकाराचे असतात. प्रत्‍येक घडाला सुमारे 6 ते 7 फण्‍या असून एका फणित 15 ते 25 केळी असतात. केळीच्‍या प्रत्‍येक लोंगरात 120 ते 170 फळे असून त्‍याचे सरासरी वजन 25 किलोपर्यंत असते. याजातीच्‍या फळाचा आकार मोठा, गर मळकट पांढ-या रंगाचा असून त्‍यास चांगला वास व गोडी खूप असते. ही जात मर या रोगास प्रतिकारक आहे.

हरीसाल –  या जातीची लागवड वसई भागात जास्‍त प्रमाणात होते. या जातीची उंची 4 मिटरपर्यंत असते. या जातीची साल जास्‍त जाडीची असून फळे बोथट असतात, तसेच ही जात टिकाऊ आहे. प्रत्‍येक लॉगरात 150 ते 160 फळे असून त्‍यांचे वजन सरासरी 28 ते 30 किलो असते. या जातीला सागरी हवामान मानवते.

लालवेलची – या जातीची लागवड कोकण विभागात विशेष आढळून येते. या जाती खोडाचा रंग तांबूस, उंच झाड, फळ लहान व पातळ सालीचे असून चव आंबूस-गोड व रंग पिवळा असतो. या जातीच्‍या लोंगरात 200 ते 225 फळे असतात. त्‍यांचे वजन सरासरी 20 ते 22 किलोपर्यंत असते. या जातीची लागवड भारतातील केळीच्‍या इतर जाती लागवडीपेक्षा जास्‍त प्रमाणात आहे.

सफेदवेलची – या जातीचे झाड उंच, खोड बारीक , फळ फार लहान व पातळ सालीचे असून त्‍याचा गर घटट असतो. प्रत्‍येक लोंगरात 180 फळे असून वजन 15 किलोपर्यंत असते. या जातीची लागवड ठाणे जिल्‍हयात आढळून येते.

सोनकेळ – या जातीच्‍या झाडाची उंची पाच मिटर, भक्‍कम खोड, फळ मध्‍यम जाड व गोलसर आकाराचे असून त्‍याची चव गोड व स्‍वादिष्‍ट असते. ही जात पना या रोगास बळी पडते. हया जातीची लागवड रत्‍नागिरी भागात आढळून येते.

राजेळी – ही जात कोकण विभागामध्‍ये जास्‍त प्रमाणात आढळून येते. या झाडाची उंची पाच मिटर, फळ मोठे व लांब, लोंगरात 80 ते 90 फळे असतात. त्‍यांचे वजन 12 ते 13 किलो असते. या जातीची कच्‍ची फळे शिजवून खाण्‍यास योग्‍य तसेच सुकेळी करण्‍यासाठी उपयुक्‍त असतात.

बनकेळ – या जातीचे झाड 4 ते 5 मिटर उंच, फळ मोठे, बुटाच्‍या आकाराप्रमाणे सरळ व टोकदार असते. प्रत्‍येक लौंगरात 100 ते 150 फळे असून त्‍यांचे वजन 18 ते 23 किलो असते. ही जात भाजी करिता उपयोगी आहे. या जातीची लागवड कोकण विभागात आढळून येते.

वाल्‍हा – या झाडाची उंची दोन मिटर असून फळे जाड सालीचे असतात. फळांची चव आंबूस गोड असते. प्रत्‍येक लोंगरात 80 ते 100 फळे असतात आणिर त्‍यांचे सरासरी वजन 12 ते 14 किलोपर्यंत असते या जातीची लागवड दख्‍खनच्‍या पठारामध्‍ये विशेषतः आढळून येते.

लालकेळ – या जातीच्‍या झाडाची उंची 4 ते 5 मिटर असते. फळ मोठे असून जाड व टणक असते.  या जातीची साल लाल व सेंद्री रंगाची असून गर दाट असतो. तसेच चव गोड असते. प्रत्‍येक लोंगरात 80 ते 100 फळे असतात. त्‍यांचे वजन 13 ते 18 किलोपर्यंत असते. केळीच्‍या सर्व जातीमध्‍ये ही जात दणकट म्‍हणून ओळखली जाते. या जातीची लागवड ठाणे भागामध्‍ये आढळून येते.

अभिवृध्‍दी

या पिकाची लागवड त्‍याचे खोडापासून निघणारे मुनवे (सकर) लावून केली जाते. मुख्‍य झाडाच्‍या वाढीच्‍या काळात आसपास बरीच मुनवे उगवतात. यात दोन मुख्य प्रकार आहेत. 1) तलवारीच्‍या पात्‍याप्रमाणे टोकदार पाने असलेली व दणकट बुंध्‍याची 2) रुंद पानाची गोल किरकोळ बुंध्‍याची. यापैकी पहिल्‍या प्रकाराची मुनवे नारळाच्‍या आकाराची अर्धा ते एक किलो वजनाचे अभिवृध्‍दी करिता वापरतात.

पूर्व मशागत

जमीन लागवडी पूर्वी लोखंडी नांगराने खोलवर नांगरुन कुळव्‍याच्‍या पाळया देऊन भूसभुसीत कराव्‍या. नंतर त्‍यामध्‍ये हेक्‍टरी 100 गाडया चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्‍ट खत घालून मिसळावे.

लागवडीचा हंगाम

केळीच्‍या लागवडीचा मोसम हवामानानुसार बदलत असतो. कारण हवामनाचा परिणाम केळीच्‍या वाढीवर, फळे लागण्‍यास व तयार होण्‍यास लागणारा कालावधी या वरच होत असतो. जळगांव जिल्‍हयात लागवडीचा हंगाम पावसाळयाच्‍या सुरुवातीस सुरु होतो.  यावेळी या भागातील हवामान उबदार व दमट असते. जून जुलै मध्‍ये लागवड केलेंडर बागेस मृगबाग म्‍हणतात. सप्‍टेबर ते जानेवारी पर्यात होणा-या लागवडीस कांदेबाग म्‍हणतात. जून जूलै पैकी लागवडीपेक्षा फेब्रूवारी मध्‍ये केलेंडर लागवडीपासून अधिक उत्‍पन्‍न मिळते. या लागवडी मुळे केळी 18 महिन्‍याऐवजी 15 महिन्‍यात काढणे योग्‍य होतात.

लागवड पध्‍दत

लागवड करताना 0.5 x 0.5 x 0.5 मीटर आकाराचे खडडे खोदून किंवा स-या पाडून लागवड करतात. दोन झाडातील अंतर बसराई जाती करिता 1.25 1.25 किंवा 1.50 1ञ50 मीटर असते.

खते व वरखते

या झाडाची मुळे उथळ असतात. त्‍यांची अन्‍नद्रव्‍यांची मागणी जास्‍त असते. त्‍यामुळे वाढीच्‍या सुरुवातीच्‍या काळात (पहिले वार महिने) नत्रयुक्‍त जोरखताचा हप्‍ता देणे महत्‍वाचे ठरते. प्रत्‍येक झाडास 200 ग्रॅम नत्र 3 समान हप्‍त्‍यात लावणीपासून दुस-या तिस-या व चौथ्‍या महिन्‍यात द्यावे. प्रत्‍येक झाडास प्रत्‍येक वेळी 500 ते 700 ग्रॅम एरंडीची पेंड खतासोबत द्यावी. शेणखता बरोबर 400 ग्रॅम ओमोनियम सल्‍फेट प्रत्‍येक झाडास लावणी करतांना देणे उपयुक्‍त ठरते.

दर हजार झाडास 100 कि नत्र 40 कि स्‍फूरद व 100 कि पालांश ( प्रत्‍येक खोडास) 100 ग्रॅम नत्र 40 ग्रॅम स्‍फूरद, 40 ग्रॅम पालाश म्‍हणजेच हेक्‍टरी 440 कि. नत्र 175 कि. स्‍फूरद  आणि 440 कि पालाश द्यावे.

पाणी देणे

केळीला भरपूर पाणी लागते. पाणी खोडाजवळ साठून राहणार नाही याची काळजी घेणे आवश्‍यक असते. जमिनीचा मगदूर व झाडांच वय लक्षात घेवून पाण्‍याचे पाळयामधील अंतर ठरवितात. भारी सुपिक व खोल जमिनीतील पिकांना 7 ते 10 सेमी पाणी दरपाळीस लागते. उन्‍हाळयात 6 ते 8 दिवसांनी व हिवाळयात 9 ते 15 दिवसांनी पाणी देतात. अतिकडक उन्‍हाळयात 5 ते 6 दिवसांनी पाणी द्यावे लागते. केळीचे एक पिक घेण्‍यास (18 महिने) 45 ते 70 पाण्‍याच्‍या पाळया लागतात. पाण्‍याची कमतरता असल्‍यास केळीच्‍या वाफयाच्‍या मधल्‍या जागेत तनिस, गवत, पालापाचोळा व पॉलीथीनचे लांब तुकडे यांचे आच्‍छादन करावे. त्‍यामुळे पाण्‍याच्‍या दोन पाळया चुकविता येतात.

आंतरपिके

केळीत घ्‍यावयाच्‍या मिश्र पिकांची निवड करतांना मुख्‍य पिकातील अंतर, अन्‍नद्रव्‍याचा पुरवठा मशागतीच्‍या पध्‍दती पिकांवर पडणारे रोग व किड पाणीपुरवठा वगैरे बाबींचा प्रामुख्‍याने विचार करणे अगत्‍याचे ठरते. जळगांव भागातील शेतकरी सुरुवातीला मिश्र पिक घेत नाहीत. परंतु पिक 16 ते 17 महिन्‍याने झाल्‍यावर आणि बागेतील 85 ते 90 टक्‍के घड कापले गेल्‍यावर केळीच्‍या बागेत गहू हरबरा सारखी रब्‍बी हंगामातील पिके घेतात. अथवा कांद्याचे बियाण्‍यासाठी कांदे लावतात. कोकण किनारपटटीत नारळ पोफळीच्‍या बागेत केळीची पिके लावतात.

किड व रोग

केळीच्‍या झाडावर पनामा रोग, शेंडे झुपका इत्‍यादी महत्‍वाचे हानीकारक रोग विशेष करुन पडतात. किड त्‍या मानाने कमी पडते. रोग व किडी विषयांची माहिती संक्षेपात खालीलप्रमाणे आहे.

रोग व किड नुकसान उपाय
पनामा (मर) रोग पाने वाढतात. फळे खराब होतात, अयोग्‍य निचरा व भारी जमिन यामुळे जास्‍तीत जास्‍त अपाय होतो. हा रोग कवकामुळे होतो. बसराई, लालकेळ, हरीसाल व पुवन या जाती रोगप्रतिकारक आहेत. मॅक्‍युरी, क्‍लोराईड (2000 पीपीएम) किंवा व्‍हापाम (112 ग्रॅम) दर 20 लिटर पाण्‍यात मिसळून वापरावे.
शेंडा झुपका

(बंचीटॉप )

रोग विषाणुमुळे होतो. झाडे खुजी पाने तोकडी होतात. या रोगाचा प्रसार रोगट कंद व मावा किडीमळे होतो. निरोगी कंद व मुनवे वापरावेत. रोग प्रतिकारक जाती बसराई लागवड करावी. मावा किडीचा बंदोबस्‍त करावा. रोगट झाडे नष्‍ट करावीत.
घडांच्‍या दांडयाची सडण मुख्‍य दांडा सडतो व काळा पडतो. कवकामुळे रोग पडतो सुर्याकडील घडावील जास्‍त स्‍पष्‍ट चिन्‍हे उपाय घडावर झाडाची पाने बांधावित. 4.4.50 च्‍या बोर्डो मिश्रणाच्‍या घड लहान असताना फवारा द्यावा.
किड व खोड भुंगा या भुंग्‍याची अळी केंद व खोड यांचा भाग पोखरते. झाडावर 0.05 टक्‍के एंडोसल्‍फान फवारावे. पॅरीसगीन औषध अधिक धान्‍याचे पीठ (1.5) यांच्‍या विषारी गोळया करुन कंदाचे जवळ टाकतात. दुषित कंद नष्‍ट करावेत.
पानावरील भुंगे पावसाळयातील पाने व फळे कोरतात आणि खातात गुप्‍तरोल 550 (250 ग्रॅम औषध 1000 लिटर पाणी फवारावे.)
पानावरील मावा उष्‍ण व सर्द दिवसात पाने व कोवळया फळातील रस पितात वरीलप्रमाणे
फळावरील तुडतुडे फळाच्‍या सालींना रस पितात साल फाटते. ·       एंडोसल्‍फान 150 मिलि 100 लिटर पाणी हे मिश्रण फवारावे.

·       गुप्‍तेरॉल 5500 हे औषध फवारावे.

मोहोर फळधारण व हंगाम

लागवडीनंतर 10 ते 12 महिन्‍याच्‍या अवधित झाडावर लॉगर येऊ शकतो. बसराई जातीचे लोंगर 7 ते 12 महिन्‍यात बाहेर पडतात. वाल्‍हा जातीत 6 ते 7 महिने लागतात. लालवेची, सफेदवेलची व मुठळी जाती 9 ते 13 महिने लागतात. तर लालकेळीस लॉंगर येण्‍यास 14 महिने लागतात. झाड चांगले वाढलेले असल्‍यास लागवडीनंतर साधारणपणे 6 महिन्‍यांनी खोडास फुलोरा तयार होवू लागतो. व 9 ते 10 महिन्‍यांनी केळी फूल खोडाबाहेर पडते. व 3 ते 5 महिन्‍यात घड तयार होतो. थंडीच्‍या दिवसात घड तयार होण्‍यास जास्‍त काळ लागतो.

घडाने आकार घेतल्‍यानंतर त्‍याच्‍या टोकास असलेले वांझ केळफूल त्‍या घडातील केळयांच्‍या शेजारी फणीपासून थोडया अंतरावर कापून टाकतात. त्‍या केळफूलाचा भाजीसाठी उपयोग होतो शिवाय ते काढून घेतल्‍यामुळे घडातील केळी चांगली पोसून त्‍याचे वजन वाढते.

केळीचा हंगाम मुख्‍यतः महाराष्‍ट्रात ठाणे, वसई भागात जूलै ते मार्च व खानदेश भागात सप्‍टेंबरमध्‍ये असतो. फळ चांगले पोसून गुबगुबित झाले, त्‍यावरच्‍या धारा (कडा) मोडून ते गरगरित झाले की, ते पूर्ण तयार झाले समजावे. पूर्णपणे तयार झालेला घड तीन ते चार दिवसांत पिकतो. त्‍यामुळे तो वाहतूकीस योग्‍य ठरतो. त्‍यासाठी 75 टक्‍के पक्‍व असेच घड काढतात. त्‍यामुळे ते लांबवर वाहतूक करता येते.

वाहतूक

बारमाही बहराचे वरदान केळी पिकाला लाभलेले असले तरी जलद गतीने नाशवंत फळांच्‍या शापांचे गालबोटही या पिकास लागले आहे. झाडावर केळ पूर्णपणे वाढून तयार झाल्‍यावर घड कापून जलद गतीने ग्राहकापर्यंत पोहचविण्‍याची गरज असते. केळीची घड त्‍यांच्‍या पानाचा थर देऊन वाघीणी किंवा ट्रक मध्‍ये रचली जातात. 2 ते 7 दिवसापर्यंतच्‍या रेल्‍वे प्रवासात केळी आपोआप पिकतात व स्‍थानकावर पोहोचविल्‍यावर त्‍वरीत त्‍याची 2 ते 4 दिवसांत विल्‍हेवाट लावावी लागते.

केळी हिरवी व पूर्ण वाढीची सोडली तरीही आपोआप प्रवासात पिकतातञ किंवा धुरी वा इथाइलीन गॅसच्‍या साहारूयाने पिकविले जातात. केळीच्‍या घडाच्‍या दांडयाला पॅराफिन मेण, व्‍हॅसलिन किंवा चुना लावतात.  त्‍यामुळे फळे जास्‍त काळ टिकतात व अधिक आकर्षक रंगाचे होतात. अर्धा किलो मेन 100 घडयांना पुरते.

उत्‍पादन व विक्री

प्रदेश, जात व जमिनीच्‍या प्रकारानुसार केळीच्‍या उत्‍पादनाचे प्रमाण बदलू शकते. बसराई जातीचे खानदेश भागात अंदाजे उत्‍पन्‍न 335 ते 450 क्विंटल प्रति हेक्‍टरी सरासरी येते. पूणे व ठाणे भागात 590 ते 650 क्विंटल प्रति हेक्‍टरी सरासरी येते. राज्‍य व्‍यापार महामंडळ, मुंबईतर्फे रशिया. जपान. इटली. कुवेत. वगैरे देशात केळीची निर्यात केली जाते. घाऊक व्‍यापारी केळयांची खरेदी जागेवरच केळी बागेत घडांची संख्‍या आकारमान विचारात घेऊन करतात. तथा सर्वर मोठया पेंठात त्‍यांची वजनावर विक्री होते. किरकोळ विक्रेते भटटीचा तयार माल विकत घेऊन डझनावर विक्री करतात.

बागेची निगा

बागेतील जमिन स्‍वच्‍छ व भुसभुशित ठेवावी. त्‍याकरिता सुरुवातील कोळपण्‍या द्याव्‍यात. पुढे हाताने चाळणी करावी. केळीच्‍या बुंध्‍यालगत अनेक पिले येऊ लागतात. ती वेळच्‍या वेळी काढून टाकावीत. लागवडीनंतर 4 ते 5 महिन्‍याने झाडांच्‍या खोडाभोवती मातीवर थर द्यावा. आवश्‍यकता भासल्‍यास घड पडल्‍यावर झाडास आधार द्यावा. सुर्यप्रकाशापासून इजा होऊ नये म्‍हणून केळीच्‍या घडाभोवती त्‍याच झाडाची वाळलेली पाने गुंडाळण्‍याची प्रथा आहे. थंडीपासून संरक्षणासाठी बगीच्‍याच्‍या भोवताली शेकोटया पेटवून धूर करावा.

केळी पिकाला इतर फळपिकांच्‍या मानाने जास्‍त पाणी लागते. दिवसेंदिवस पर्जन्‍यमान कमी होत आहे व त्‍यामुळे पाणी पातळी खोलवर जात आहे. त्‍यामुळे केळी खाजलील क्षेत्र कमी कमी होत आहे. क्षेत्र वाढीसाठी उपलब्‍ध पाण्‍याचे नियोजन करणे आवश्‍यक आहे. त्‍यासाठी ठिबकसिंचन योजना राबवून क्षेत्र टिकवून राहू शकेल व त्‍यात वाढही शक्‍य आहे.

केळी हे सर्व फळांमध्‍ये स्‍वस्‍त आहे व त्‍यामुळे गरीबवर्गीयांसाठी उपयुक्‍त आहे. या पिकांचे क्षेत्र वाढीसाठी विशेष शासकीय सवलतीचा कार्यक्रम नाही. इतर जिरायत व बागायत पिकांप्रमाणे कर्जपुरवठा वगैरे उपलब्‍ध केला जातो. वाहतूकीसाठी रेल्‍वेकडून वॅगन्‍स उपलब्‍ध केल्‍या जातात. पण त्‍यात अल्‍पशी सवलत आहे. केळी उत्‍पादन टिकविणे, वाहतूक जलद व सवलतीच्‍या दराने करणेची व्‍यवस्‍था करणे यामुळे लागवड क्षेत्र वाढीवर चांगला परिणाम होईल.

खत व्‍यवस्‍थापन

सेंद्रीय खते – शेण खत 10 किलो प्रति झााड किंवा गांडूळ खत 5 किलो प्रति झाड

जैवकि खते – अॅझोस्पिरीलम – 25 ग्रॅम प्रति झाड व पी एस बी 25 ग्रॅम प्रति झाड केळी लागवडीच्‍या वेळी

रासायनिक खते – केळीसाठी प्रति झाडास 200 ग्रॅम नत्र 40 ग्रॅम स्‍फूरद व 200 ग्रॅम  पालाश्‍ देण्‍याची शिफारस करण्‍यात आलेली आहे. जमिनीतून रासायनिक खते देताना त्‍यांचा कार्यक्षमपणे उपयोग होण्‍यासाठी खोल बांगडी पध्‍दतीने किंव कोली घेवून खते द्यावी.

तक्‍ता 1 केळीसाठी जमिनीतून रासायनिक खत देण्‍याचे वेळापत्रक (ग्रॅम प्रति झाड)

अ.क्र. खत मात्रा देण्‍याची वेळ युरिया सिंगल सुपर फॉस्‍फेट म्‍युरेट ऑफ पोटॅश
1 लागवडीनंतर 30 दिवसांचे आंत 82 250 83
2 लागवडीनंतर 75 दिवसांनी 82
3 लागवडीनंतर 120 दिवसांनी 82
4 लागवडीनंतर 165 दिवसांनी 82 83
5 लागवडीनंतर 210 दिवसांनी 36
6 लागवडीनंतर 255 दिवसांनी 36 83
7 लागवडीनंतर 300 दिवसांनी 36 83
एकूण 435 250 332

(तक्‍यात दिलेल्‍या खत मात्रेत माती परिक्षण अहवालानुसार योग्‍य ते बदल करावे )

तक्‍ता 2 – केळीसाठी ठिबक सिंचनातून खत देण्‍याचे वेळापत्रक

अ.क्र. आठवडे हजार झाडांसाठी खतांची मात्रा (किलो प्रति आठवडा )
युरिया म्‍युरेट ऑफ पोटॅश
1 1 ते 16 (16) 6.5 3
2 17 ते 28 (12) 13 8.5
3 29 ते 40 (12) 5.5 7
4 41 ते 44 (4) 5

स्‍फूरदाची संपूर्ण मात्रा 250 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्‍फेट व 10 किलो शेणखत केळी लागवडीच्‍या वेळी जमिनीतून द्यावे.

पाणी व्‍यवस्‍थापन

केळी पिकास एकूण 1800 ते 2200 मि. मि. पाणी लागते. केळीसाठी ठिबक सिंचन अत्‍यंत उपयुक्‍त असून, ठिबक सिंचनासाठी सूक्ष्‍म नलीका पध्‍दतीपेक्षा ( मायक्रोटयुब) ड्रिपर किंवा इनलाईन ड्रीपर चा वापर करणे अधिक योग्‍य असते. बाष्‍पीभवनाचा वेग, जमिनीची प्रतवारी वाढीची अवस्‍था इ. बाबींवर केळीची पाण्‍याची गरज अवलंबून असते.

तक्‍ता 3 केळीसाठी पाण्‍याची गरज ( लिटर प्रति झाड प्रति दिवस )

महिना पाण्‍याची गरज महिना पाण्‍याची गरज
जून 06 आक्‍टोबर 04-06
जूलै 05 नोव्‍हेंबर 04
ऑगस्‍ट 06 डिसेंबर 06
सप्‍टेबर 08 जानेवारी 08-10
आक्‍टोबर 10-12 फेब्रूवारी 10-12
नोव्‍हेंबर 10 मार्च 16-18
डिसेंबर 10 एप्रिल 18-20
जानेवारी 10 मे 22
फेब्रूवारी 12 जून 12
मार्च 16-18 जूलै 14
एप्रिल 20-22 ऑगस्‍ट 14-16
मे 25-28 सप्‍टेबर 14-16

(वरील पाण्‍याच्‍या मात्रा मार्गदर्शक असून हवामान जमिनीचा प्रकार व पिकाच्‍या वाढीच्‍या अवस्‍था यानुसार योग्‍य तो बदल करावा.)

आंबा लागवड पद्धत