Share

तरुणाने पिकवलं ‘पिवळं कलिंगड’; इस्रायलच्या तंत्रज्ञानातून पालघरमध्ये लाखो रुपयांची कमाई

Published On: 

Yellow Watermelon Farming: Farmer Prafulla Patil showing his unique yellow watermelon in his agricultural field.

कलिंगड म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर काय येतं? बाहेरून हिरवं आणि आतून लालबुंद. पण जर कुणी तुम्हाला बाहेरून पिवळं धमक आणि आतून लाल किंवा आतून पिवळं आणि बाहेरून हिरवं कलिंगड दिलं तर? ऐकून धक्का बसला ना? पण पालघरच्या एका तरुण शेतकऱ्याने ही भन्नाट किमया करून दाखवलीये.

पालघर जिल्ह्यातील वाडा तालुका तसा ‘वाडा कोलम’ तांदळासाठी जगभर प्रसिद्ध. पण अलिकडे भातशेतीचं आर्थिक गणित चांगलंच बिघडलंय. त्यामुळे इथला शेतकरी आता नव्या प्रयोगांकडे वळतोय. याचंच उत्तम उदाहरण म्हणजे देवघर गावचे प्रफुल्ल पाटील. या तरुण शेतकऱ्याने थेट इस्रायलचं तंत्रज्ञान वापरून आपल्या ५ एकर शेतात या अनोख्या पिवळ्या कलिंगडाची लागवड केली आहे.

Yellow Watermelon Farming: इस्रायलच्या तंत्रज्ञानाने क्रांती

प्रफुल्ल यांना कायम शेतीत काहीतरी वेगळं करायचं होतं. गेल्या वर्षी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत त्यांना शेतीच्या अभ्यासासाठी इस्रायलला जाण्याची मोठी संधी मिळाली. तिथली प्रगत शेती पाहून ते पुरते भारावून गेले. मायदेशी परतल्यावर त्यांनी गावात हा प्रयोग करायचं ठरवलं. थेट सोसायटीचं कर्ज काढलं. एवढंच नाही, तर कुटुंबाचे दागिनेही गहाण ठेवले. या पैशातून त्यांनी शेतात ठिबक सिंचनाची व्यवस्था केली आणि नेटशेड उभारून सोबत मिरचीचीही लागवड केली.

सध्या या आकर्षक रंगाच्या कलिंगडांनी ग्राहकांना चांगलीच भुरळ घातली आहे. कमी खर्चात जास्त नफा देणारं हे पीक पाहण्यासाठी आता कृषी अधिकारी आणि इतर शेतकरीही त्यांच्या बांधावर गर्दी करत आहेत.

थोडक्यात सांगायचं तर, प्रफुल्ल यांचा हा प्रयोग इथेच थांबणार नाहीये. भविष्यात खास साच्याच्या मदतीने बदामी आणि चक्क चौकोनी आकाराची कलिंगडं पिकवण्याचा त्यांचा मानस आहे. जिद्द आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड असली, तर शेतीतही लाखोंची कमाई करता येते, हेच या तरुणाने सिद्ध केलंय.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
यशोगाथा (Success Stories)बातम्या
krushinama fevicon

🕘 संबंधित बातम्या