आता होणार राज्यातील पशुवैद्यकीय सेवा ऑनलाईन

 राज्यातील पशुवैद्यकीय सेवा आता ऑनलाईन होणार त्यासाठी एक विशेष ॲप विकसित करण्यात येणार आहे. या ॲपच्या माध्यमातून पशुपालक शेतकऱ्यांनी आपल्याकडील विविध पशुधनाची नोंद करणे बंधनकारक करण्यात येईल. तसेच या ॲपवर संंबंधित पशुवैद्यकीय दवाखाना आणि अधिकाऱ्यांचीदेखील नोंद असणार आहे. पशुधनाला झालेल्या आजाराची नोंद शेतकऱ्यांनी या ॲपवर करावयची आहे. यानंतर संबंधित पशुवैद्यकीय अधिकारी पशुधनावर उपचार करणार असून, केलेल्या उपचाराची नोंद या ॲपवर करणार आहेत. त्यामुळे जनावरांचे आजार, केलेले औषधोपचार यांची माहिती संकलित होणार आहे. पुढील उपचारासाठी या माहितीचा उपयोग होईल. राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी ही माहिती दिली.

जनावरांना अधिकच्या उपचारासाठी दवाखान्यात आणल्यानंतर त्यांची संगणकीय नोंद होणार असून, त्याला एक विशिष्ट कोड क्रमांक देण्यात येणार आहे व हा कोड त्या पशुधनाची कायमस्वरूपी ओळख म्हणून उपयोगात आणला जाईल, असे मिश्रा यांनी सागितले. ऑनलाईन प्रणाली सुरू झाल्यानंतर सध्या पशुवैद्यकीय सेवांच्या नोंदीसाठी वापरण्यात येणारी विविध १८ रजिस्टर बंद करण्यात येतील, असे ते म्हणाले.

तसेच राज्यातील ८० दुर्गम तालुक्यांमध्ये पशुवैद्यकीय सेवा तातडीने मिळण्यासाठी मोबाईल हॉस्पिटल सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी १२ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर (पीपीपी) ही हॉस्पिटल्स सुरू करण्यात येणार आहेत, असे मिश्रा यांनी सांगितले.