पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बटाटा, भेंडी, टोमॅटो आवक कमी

गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी भाजीपाल्याची सुमारे १५० ट्रक आवक झाली होती. गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यातील थंडीच्या वाढलेल्या कडाक्याने विविध भाजीपाल्याचे उत्पादन तुलनेने घटल्याने आवक मंदावली आहे. परिणामी बटाटा, भेंडी, गवार, टोमॅटो, पावटा, सिमला मिरची आणि घेवड्याच्या दरात वाढ झाली आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीत गवार २००० ते ४००० रुपये प्रतिक्विंटल

परराज्यांतून झालेल्या आवकेमध्ये आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटक येथून सुमारे हिरवी मिरची सुमारे १५ टेम्पो, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथून शेवगा सुमारे २ टेम्पो, कर्नाटक येथून घेवडा २ टेम्पो, राजस्थानातून ७ ट्रक गाजर, कर्नाटक आणि गुजरात येथून कोबी सुमारे ४ ट्रक, गुजरात येथून भुईमूग सुमारे १०० गोणी, मध्य प्रदेशातून मटार सुमारे ३० ट्रक, मध्य प्रदेशातून लसणाची सुमारे सहा हजार गोणी, आग्रा आणि इंदूर येथून बटाटा सुमारे बटाट्याची सुमारे ५० ट्रक आवक झाली होती. तर स्थानिक आवकेमध्ये सातारी आले १२०० पोती, टोमॅटो सुमारे ६ हजार क्रेट, भेंडी, कोबी, सिमला मिरची, आणि तांबडा भोपळा प्रत्येकी सुमारे १० टेम्पो, फ्लॉवर १५ टेम्पो, गवार ७ टेम्पो,  पावटा ८ टेम्पो, हिरवी मिरची ४ टेम्पो, कांदा सुमारे १५० ट्रक आवक झाली होती.