Pregnancy Vaccination: गरोदरपण हा काळ एका स्त्रीच्या आयुष्यातला सर्वात नाजूक पण तितकाच महत्त्वाचा टप्पा असतो. या काळात आईच्या पोटात एक नवा जीव आकार घेत असतो. त्यामुळेच, आईचं आरोग्य उत्तम राहणं अत्यंत गरजेचं आहे. पण तुम्हाला माहितीये का? या काळात आईला आणि बाळाला संसर्गापासून वाचवण्यासाठी लसीकरण ही एक मोठी ढाल ठरते.
कोणत्या लसी गरोदरपणात सुरक्षित आहेत आणि कोणत्या टाळल्या पाहिजेत? हा प्रश्न अनेक गर्भवती महिलांना सतावतो. यावर सविस्तर आणि अचूक मार्गदर्शन केलंय.
गरोदरपणातील सुरक्षित लसीकरण (Pregnancy Vaccination)
सर्वात महत्त्वाची आणि नियमितपणे दिली जाणारी लस म्हणजे ‘टिटॅनस टॉक्साइड’. गर्भधारणेच्या २४ आठवड्यांनंतर ही लस दिली जाते. तिचे दोन डोस ४ आठवड्यांच्या अंतराने घ्यावे लागतात. ही लस आई आणि बाळ दोघांनाही भक्कम रोगप्रतिकारशक्ती देते.
याशिवाय, हिपॅटायटीस बी, रेबीज, डिप्थीरिया आणि इन्फ्लुएंझा या लसीही गरोदरपणात अगदी सुरक्षित मानल्या जातात. विशेषत: इन्फ्लुएंझा लस ही गर्भवती महिलेचं प्राणघातक एच१एन१ (H1N1) विषाणूपासून संरक्षण करते. न्यूमोनियाचा धोका टळतो. शक्यतो इमर्जन्सी नसल्यास ही लस १२ आठवड्यांनंतर दिली जाते. जून ते ऑक्टोबर या काळात ती घेणं अधिक फायदेशीर ठरतं.
दुसरीकडे, डी-टॅब लस (डिप्थीरिया, टिटॅनस आणि परट्युसिस) २० ते २८ आठवड्यांच्या दरम्यान दिली जाऊ शकते, ज्यामुळे बाळाचं सुरुवातीचे ६ महिने संरक्षण होतं.
या लसी गरोदरपणात चुकूनही घेऊ नका!
काही लसी अशा आहेत ज्या गरोदरपणात बाळासाठी धोकादायक ठरू शकतात. यामध्ये गोवर (Measles), गालगुंड (Mumps), रुबेला (MMR), कांजण्या (Chicken Pox), बीसीजी (टीबी), पोलिओ आणि पिवळ्या तापाची लस यांचा समावेश आहे. या लसी जिवंत विषाणूंपासून बनलेल्या असतात. त्यामुळे संसर्गाचा धोका असतो. जर एखाद्या महिलेने यापैकी कोणती लस घेतली असेल, तर तिने किमान ४ आठवडे गर्भधारणा टाळण्याचा सल्ला डॉक्टर देतात. प्रसूतीनंतर मात्र एमएमआर आणि चिकन पॉक्सची लस घेता येते, कारण ती स्तनपान करताना सुरक्षित असते.
थोडक्यात सांगायचं तर, गरोदरपणात डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही लस घेऊ नये. गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा. नियमितपणे हात स्वच्छ धुवा आणि मास्कचा वापर करा. यामुळे संसर्गाचा धोका टळेल.
डॉ. शिल्पा अग्रवाल










