Share

शेतकऱ्याची कमाल! सीताफळाला फाटा देत पेरूच्या बागेतून कमवले ३६ लाख

Published On: 

Thai Guava Farming: Successful young farmer Khanderao Lawand standing in his lush green Thai guava orchard.

Thai Guava Farming: शेती परवडत नाही, असं म्हणत अनेक तरुण आज शहराकडे धावत आहेत. पण जर योग्य नियोजन आणि जिद्द असेल, तर याच काळ्या मातीतून लाखो रुपये कमवता येतात. हे तुम्हाला खरं वाटतंय का? सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातल्या एका तरुण शेतकऱ्याने हीच भन्नाट किमया करून दाखवलीये.

खंडेराव दत्तात्रेय लवांड हे कुसळंबजवळील वाणेवाडी येथील तरुण शेतकरी. त्यांच्या गावात सगळेजण प्रामुख्याने सीताफळाची शेती करतात. पण खंडेराव यांनी पत्नी जयश्रीच्या साथीने वेगळी वाट निवडली. त्यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत थेट ‘थाई’ वाणाच्या पेरूची लागवड केली. अन बघता बघता दोन एकरात तब्बल ३६ लाखांचं घसघशीत उत्पादन घेतलंय.

Thai Guava Farming: इस्रायली तंत्रज्ञानाने ३६ लाखांची कमाई

पाण्याचा प्रश्न मोठा होता. पण खंडेराव थांबले नाहीत. त्यांनी बाभळगावच्या विहिरीतून चक्क सात किलोमीटरची पाईपलाईन केली. शासनाची कोणतीही मदत न घेता त्यांनी हा धाडसी प्रयोग केला. दोन ओळींत दहा फूट आणि दोन झाडांत पाच फूट अंतर. अशा प्रगत इस्रायली पद्धतीने त्यांनी एका एकरात ८०० आणि दोन एकरांत १६०० रोपं लावली.

खर्च किती आला? एका एकरासाठी फक्त एक लाख रुपये. यात ५० हजार मशागतीसाठी आणि ५० हजार रुपये मजुरीवर खर्च झाले. पेरूच्या बागेवर प्रामुख्याने भुरी आणि मिलीबगचा प्रादुर्भाव होतो. त्यावर त्यांनी योग्य फवारण्या केल्या. झाडांना आवश्यक असलेलं कॅल्शियम, पोटॅश आणि मायक्रोन्यूट्रिएंट्स वेळेवर दिले. अवघ्या सहा महिन्यांत फळं यायला सुरुवात झाली.

पहिल्याच वर्षी एका झाडाला ४० ते ४५ किलो पेरू लागले. त्यातून एकरी ६ लाखांचं घसघशीत उत्पन्न मिळालं. दुसऱ्या वर्षी तर कमालच झाली. प्रत्येक झाडाने किमान १०० किलो माल दिला. सुरुवातीला बाजारात ६० रुपये किलोचा चांगला दरही मिळाला आणि एकरी १८ लाखांप्रमाणे दोन एकरात ३६ लाखांची कमाई झाली.

थोडक्यात सांगायचं तर, थाई पेरूची खासियत खूप वेगळी आहे. यात बिया एकदम मऊ असतात. साल जाड असल्याने फळ काढणीनंतरही २० दिवस आरामात टिकतं. चवीला अतिशय गोड असल्याने मुंबई, पुणे आणि सोलापूरच्या मार्केटमध्ये या पेरूला प्रचंड मागणी आहे. त्यामुळेच खंडेराव लवांड यांचा हा यशस्वी प्रयोग आज अनेक शेतकऱ्यांसाठी मोठा आदर्श ठरला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
यशोगाथा (Success Stories)बातम्या
krushinama fevicon

🕘 संबंधित बातम्या