वातावरण बदलाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक बाबींची सवय लागणे गरजेचे – आदित्य ठाकरे

मुंबई – पर्यावरण संवर्धन ही एखादा दिवस म्हणून साजरा करण्याची बाब राहिली नसून लहान लहान पर्यावरणपूरक बाबींची सवय लागणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.

राज्यातील शहरे कार्बन न्यूट्रल व नेट झिरो होण्यासाठी राज्य शासनामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत. या अनुषंगाने सह्याद्री अतिथीगृह येथे शून्य कार्बन उत्सर्जन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आबासाहेब जऱ्हाड, सदस्य सचिव अशोक शिनगारे, सर्व विभागीय आयुक्त, महानगरपालिकांचे आयुक्त, राज्यातील 43 अमृत शहरांचे मुख्याधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.

मंत्री श्री. ठाकरे म्हणाले, वातावरणीय बदलाच्या पार्श्वभूमीवर शासन विविध उपाययोजना करीत आहे. तथापि यामध्ये नागरिकांचा सहभाग असणेही तितकेच गरजेचे आहे. राज्यातील 43 शहरांच्या माध्यमातून सुमारे साडेसहा ते सात कोटी नागरिक ‘रेस टू झिरो’ मोहिमेमध्ये सहभागी झाले आहेत. या अनुषंगाने महाराष्ट्राने जगभरात सर्वात मोठे पाऊल टाकले आहे. राज्यात कधी दुष्काळ, अतिवृष्टी, वादळे अशा नैसर्गिक आपत्तींच्या माध्यमातून वातावरणीय बदलांचे परिणाम दिसून येत आहेत. कमी वेळेत अधिक पाऊस पडत आहे, यामुळे मुंबईत काही ठिकाणी संरक्षक भिंत असूनही पावसाच्या पाण्यामुळे नुकसान झाल्याचे पाहावयास मिळाले. हे सर्व लक्षात घेता पर्यावरण चांगले राहावे यासाठी विचार नव्हे तर कृती करण्याची वेळ आली आहे. यासाठीच लोकांचा सहभाग अत्यावश्यक ठरणार आहे.

श्री. ठाकरे म्हणाले, विकास करताना शहरीकरणाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. तथापि शहरीकरण म्हणजे नक्की काय हे ठरवण्याची आता वेळ आली आहे. शासनाच्या सर्व संबंधित यंत्रणा आणि नागरिक एकत्र आले तर कोणतेही काम अशक्य नाही, त्यामुळे पर्यावरण बदलावर मात करण्यासाठी शासन, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक बाबतीत केवळ शक्ती असून उपयोग होत नाही अन्यथा शक्ती असूनही डायनासोरचा जसा अस्त झाला तशी परिस्थिती येण्यास वेळ लागणार नाही, असे सांगून ‘आता नाही तर कधीच नाही’ या संकल्पनेनुसार प्रत्येकाने पर्यावरण संवर्धनासाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

 

पर्यावरण राज्यमंत्री श्री. बनसोडे म्हणाले, अतिवृष्टी वादळे तर कधी दुष्काळ अशा विविध आपत्तींनी आपण वातावरणीय बदलाचे दुष्परिणाम अनुभवत आहोत तथापि यावर मात करण्यासाठी राज्य शासन करीत असलेल्या उपाययोजनांचे विविध राज्यांकडून कौतुक केले जात आहे. कोविड प्रतिबंधाच्या काळात सर्व बाबी ऑनलाइन असताना देखील माझी वसुंधरा अभियानात सर्वांनी उत्कृष्ट काम केल्याबद्दल त्यांनी अभिनंदन केले. जमिनीचे तापमान वाढत असल्याने पंचमहाभूतांचे संरक्षण व संवर्धन आवश्यक बनले असून उद्योग धंदे विस्तारत असताना त्यांनी प्रदूषण होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेश होताना त्यांच्या हस्ते एक झाड लावून त्याची देखभाल त्याने करावी, अशी संकल्पना श्री बनसोडे यांनी मांडली. त्याचबरोबर पर्यावरण संवर्धनाची चळवळ समाजातल्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

 

श्रीमती मनीषा म्हैसकर यांनी या परिषदेचा उद्देश स्पष्ट करताना पर्यावरण बदलाच्या पार्श्वभूमीवर शासन करीत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली. दीड कोटी लोकांनी माझी वसुंधरा अंतर्गत ई- शपथ घेतल्याचे त्यांनी सांगितले. आता माझी वसुंधरा टप्पा दोन ची प्रक्रिया सुरू आहे. राज्याने इलेक्ट्रिक वाहन धोरण अमलात आणले असून आरे, खारफुटी, पाणथळ जमीन संवर्धन अशा विविध क्षेत्रात झालेल्या कामाची त्यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली. शहरांना राहण्यायोग्य बनवणे हा हेतू लक्षात घेऊन पर्यावरण विभागाने वातावरण कृती आराखड्याची सुरुवात केली आहे, याची अंमलबजावणी ऊर्जा, उद्योग, नगर विकास, परिवहन, कृषी या विभागांमार्फत केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

श्री जऱ्हाड यांनी प्रदूषणमुक्त जीवन शैलीसाठी प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात करूया, असे आवाहन करताना उद्योजकांनी प्रदूषण मुक्तीला प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले. ग्रीन हायड्रोजन वापरासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ पुढाकार घेईल, असेही त्यांनी सांगितले.

पर्यावरण संवर्धनासाठी जागतिक पातळीवर काम करणाऱ्या सी ४० संस्थेचे चे सल्लागार निखिल कुलकर्णी यांनी या संस्थेबाबत माहिती दिली. जगभरात आठशे शहरे या अभियानात सहभागी झाले असून त्यात महाराष्ट्रातील ४३ शहरांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी विभागीय आयुक्त, महानगरपालिका आयुक्त, मुख्याधिकारी आदींनी या क्षेत्रातील आपल्या शहरांमध्ये राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांचे अनुभव कथन केले. तसेच पर्यावरण बदलाच्या अनुषंगाने उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल असे आश्वस्त केले.

प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अशोक शिनगारे यांनी आभार प्रदर्शन केले.

महत्वाच्या बातम्या –