कारले लागवड व वाण

कारले हे वेलवर्गीय पीक आहे. साधारण 100 ते 120 दिवसात पीक निघते. कारल्याची लागवड खरीप हंगामकरिता जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात केली जाते तर उन्हाळी हंगामासाठी जानेवारी ते मार्च पर्यंत लागवड करता येते. महाराष्ट्रातील बाजारपेठ व निर्यातीचा विचार करता 9 ते 10 इंच लांबीची कारली अधिक प्रमाणात विकली जातात. त्यासाठी कोणकोणत्या जातीचे कारले लागवड केली जाते त्याविषयी जाणून घेऊया…

 

हिरकणी : फळे गडद हिरव्या रंगाची व 15 ते 20 सेंमी. लांब व काटेरी असतात. सरासरी उत्पादन 130 क्विंटल प्रति हेक्टर एवढे मिळते.
फुले ग्रीन गोल्ड : फळे गडद हिरव्या रंगाची व 25 ते 30 सेंमी. लांब व काटेरी असतात. हेक्टरी 230 क्विंटल उत्पादन मिळते.
फुले प्रियांका : या संकरित जातींची फळे गर्द हिरवी व 20 सेमी. लांब व भरपूर काटेरी असतात. सरासरी उत्पादन 200 क्विंटल प्रति हेक्टरी मिळते.
कोकण तारा: फळे हिरवी, काटेरी व 15 सेमी. लांबीची असतात. फळे दोन्ही टोकाला निमुळती व मध्यभागी फुगीर असतात. सरासरी उत्पादन 15 ते 20 टन प्रति हेक्टर मिळते.
महिको व्हाईट लाँग: लागवडीपासून 75 ते 78 दिवसात पीक काढणीस तयार होते. फळाचा रंग पांढरा, साल मध्यम जाड व भरपूर शिरा असून फळांची लांबी 9 ते 12 इंच असते.
महिको ग्रीन लाँग: फळांचा रंग गडद हिरवा व टोकाकडे फिकट असून इतर वैशिष्ट्ये महिको व्हाईट लाँग प्रमाणेच आहेत.
MBTH 101 : फळाचे वजन सरासरी 65 ते 70 ग्रॅम असून फळांची लांबी 18 ते 20 सें.मी. असते. एकरी 10 ते 12 टन उत्पादन मिळते.
MBTH 102 : फळाचे वजन सरासरी 100 ते 120 ग्रॅम भरते. एकरी 12 ते 14 टन उत्पादन मिळते.