विकास कामांना गती देण्यासाठी योग्य नियोजन करा – नितीन राऊत

नागपूर – डिसेंबर महिन्यापर्यंत खर्चाची स्थिती अल्प प्रमाणात आहे. आतापर्यंत जिल्ह्यात आचारसंहिता होती. पुन्हा महानगरपालिकेची आचारसंहिता प्रस्तावित असू शकते. अशा वेळी योग्य नियोजन करून विकास (Development) कामे पूर्ण करा, त्यासाठी नियोजन करा, असे आवाहन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत (Nitin Raut) यांनी  केले.

जिल्हा नियोजन समितीवरील कार्यकारी समितीची आढावा बैठक बचत भवन येथे  पार पडली. या बैठकीला पालकमंत्री यांच्यासह जिल्हाधिकारी आर. विमला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा नियोजन अधिकारी राजेश गायकवाड, सहाय्यक समाज कल्याण आयुक्त बाबासाहेब देशमुख आदी उपस्थित होते.

या बैठकीमध्ये यापूर्वी झालेल्या 22 ऑक्टोबर रोजीच्या बैठकीचे इतिवृत्त, तसेच इतीवृत्ताच्या अनुपालन अहवालावर चर्चा झाली. जिल्हा वार्षिक योजना सन 2021 -22 अंतर्गत कोविड-19 च्या झालेल्या खर्चाचा आढावा,तसेच कोविड-19 प्रतिबंधात्मक उपाययोजनासाठी पुनर्विनियोजन प्रस्तावास मान्यता प्रदान करण्यावरही चर्चा झाली. सन 2022-23 च्या सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी घटक, कार्यक्रम आदिच्या प्रारूप आराखड्यास मान्‍यता प्रदान करण्यावरही चर्चा झाली. तत्पूर्वी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी उपलब्ध खर्चाचे योग्य नियोजन करून जिल्ह्यात विकास कामांना गती देण्याचे आवाहन केले.

महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाल्यास पुन्हा आचारसंहितेमुळे अनेक ठिकाणी खर्च करता येणार नाही. त्यामुळे उपलब्ध असणाऱ्या दिवसांचे योग्य नियोजन करण्याबाबतच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या. यावेळी त्यांनी विधानपरिषदेच्या निवडणुकीमुळे आचारसंहितेच्या काळात रखडलेल्या कामांना तातडीने सर्व विभागाने प्राधान्य देऊन पूर्ण करावे,  तांत्रिक मान्यता, प्रशासकीय मान्यता व कार्यपूर्तीचे अहवाल, ज्या ठिकाणी प्रलंबित असतील त्याचा तातडीने निपटारा करण्यात यावा. शंभर टक्के खर्च होत नसल्यास याबाबत नियोजन विभागाला अवगत करावे, ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या विभागाला हा निधी देण्यात यावा, असे निर्देशही त्यांनी दिले.
जिल्हाधिकारी आर. विमला यांनी प्रत्येक विभागाचा यापूर्वी झालेला खर्च, तसेच पुढील वर्षाच्या नियोजनासाठी देण्यात आलेला प्रस्ताव याबाबत संबंधित विभाग प्रमुखांशी चर्चा केली, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये पुढील वर्षाच्या नियोजनाबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.

महत्वाच्या बातम्या –