कपाशीवरील किडींची ओळख व व्यवस्थापन

कापूस हे महाराष्ट्रातील महत्वाचे नगदी पीक होय. कपाशीमध्ये सन 2002 पासून बी. टी. तंत्रज्ञान उपलब्ध झाल्यापासून महाराष्ट्रातील कपाशीचे क्षेत्र 38.06 लाख हेक्टर पर्यंत वाढले असून उत्पादनामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. तथापी आपल्या राज्याची उत्पादकता (246 किग्रॅ प्रति हे). देशाच्या (568 किग्रॅ प्रति हे.) व जागतिक उत्पादकतेपेक्षा (701 किग्रॅ प्रति हे.) अत्यंत कमी आहे.

राज्यामध्ये मराठवाडा, विदर्भ व खानदेश या विभागात कपाशीखालील क्षेत्र मोठया प्रमाणात आहे. परंतु शेतकऱ्यांना बी टी कपाशीपासून किफायतशीर/अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याचे दिसून येत आहे. तथापी नवीन किडी, पावसाचा लहरीपणा, वातावरणातील बदल, किडींचे बदलते स्वरुप, किडीमध्ये रासायनिक किटकनाशके व बी टी जनुकासंबंधी निर्माण होत असलेली प्रतिकारक्षमता अशा अनेक कारणामुळे कपाशीचे शाश्वत उत्पादन मिळत नाही.

पांढरी माशी 

किडीची ओळख आणि नुकसानीचा प्रकार –

पांढरी माशी 1-2 मिमी. लांब रंगाने पिवळसर पांढरट असून पंख पांढरे किंवा करड्या रंगाचे असतात. या किडीची पिल्ले, प्रौढ पानाच्या खालच्या बाजुस राहून पानातील रस शोषण करतात, त्यामुळे पाने कोमेजतात व मलुल होतात. माशी आपल्या शरीरातून एक प्रकारचा चिकट द्रव बाहेर टाकते. त्यामुळे पानावर काळी बुरशी वाढून कर्ब ग्रहणाची प्रक्रिया मंदावते यामुळे कपाशीच्या उत्पादनावर व प्रतीवर अनिष्ट परिणाम होतो. ह्या किडीचा प्रादुर्भाव ऑक्टोबर मध्यापासुन ते नोव्हेंबर अखेर जास्त आढळतो. कमी पर्जन्यमान व अधिक तापमान (30 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त) ह्या किडीच्या वाढीस पोषक आहे. अधिक पाऊस व ढगाळ वातावरणात किडींची संख्या कमी होते. हि किड ‘लिफकर्ल’ या विषाणुचा प्रसार करते.

आर्थिक नुकसान पातळी- 8-10 प्रौढ माश्या किंवा 20 पिल्ले प्रती पान.

एकात्मिक व्यवस्थापन:

  • सरासरी 9 ते 10 प्रौढ माश्या किंवा 20 पिल्ले प्रती पान दिसताच ‘पिवळे चिकट सापळे’ हेक्टरी 10-12 या प्रमाणात लावावेत.
  • पांढरी माशी आर्थिक नुकसान संकेत पातळीच्या जवळपास दिसताच 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.
  • सुरवातीच्या काळात व्हर्टीसिलीअम लेकानी 1.15 डब्लू.पी 50 ग्राम किंवा ट्रोयझोफॉस 40 ईसी. 20 मिली किंवा डायमिथोएट 30 ईसी 10 मिली प्रती 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
  • या किडीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या वर गेल्यास नियंत्रणासाठी असीटामेप्रीड 20 एसपी. 4 ग्राम किंवा असीफेट 75 एसपी. 10 ग्राम किंवा बुप्रोफेन्झिन 25 एससी. 10 मिली किंवा फ्लोनिकामिड 50 डब्लूजी. 4 ग्रा. 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.

पिठ्या ढेकुण

किडीची ओळख व जीवनक्रम-

पिठ्या ढेकुण एकदा पिकात शिरला तर त्याचा बंदोबस्त करणे फार कठीण जाते. पिठ्या ढेकणाची मादी 250 ते 600 अंडी, पिशवी सारख्या आवरणात घालते. यातील बऱ्याचशा अंड्यातून पिल्ले निघालेली असतात तर काही अंडी घातल्यानंतर लगेच उबतात. अशी पिल्ले व अंडी पांढरटव काळपट मादीच्या पोटाखाली आढळतात. अधूनमधून पिल्ले मादीच्या अंगावर व सभोवताली फिरतांना दिसतात. अंडी लांबट पांढऱ्या रंगाची व सुष्मदर्शकाखाली तांदळाच्या दाण्यासारखी दिसतात. पिल्ले 22 ते 25 दिवसात प्रौढ होतात. त्यांच्या शरीराभोवती मऊ केस व त्यालगत मेणामध्ये करवतीसारखी नक्षी दिसते. मिलीबगचा जीवनक्रम साधारणतः एक महिन्यात पूर्ण होतो. एका वर्षात 12 ते 15 पिढ्या होतात.

नुकसानीचा प्रकार-

कपाशी व्यतिरिक्त हंगामात हि कीड इतर पिकांवर, उदा. जास्वंद सारख्या फुलझाडावर तसेच प्रामुख्याने गाजर गवत, रानभेंडी, आघाडा इ. तणांवर उपजीविका करून कपाशीचे पिक उपलब्ध झाल्यास त्याकडे वळते. खाद्य उपलब्ध नसल्यास पिक अवशेषात पडून राहते. या किडीचा प्रादुर्भाव साधारणतः सप्टेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा ते ऑक्टोबर महिन्यापासून सुरुवात होते. सुरवातीला पिठ्या ढेकुण कपाशीवरील पानांच्या खालच्या बाजूने रस शोषण करतो, नंतर कोवळे शेंडे व फुले, बोंडे यांचे नुकसान करतो. या किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळुन आल्यास शेतामध्ये पिठ्या ढेकुणने ग्रस्त असलेली झाडे पूर्णपणे पांढरी झालेली दिसतात. तसेच ढेकुण आपल्या शरीरातून एक प्रकारचा चिकट द्रव बाहेर टाकतात. त्यामुळे पानावर, कळीवर काप्नोडीयम नावाची काळी बुरशी येते व उत्पादनावर परिणाम होतो.

एकात्मिक व्यवस्थापन –

  • शेताजवळील शोभीवंत झाडे जसे जास्वंद, क्रोटोन इ. झाडावरील पिठ्या ढेकणाचा बंदोबस्त करावा. जास्त प्रादुर्भावग्रस्त झाडांचा भाग किंवा संपूर्ण झाड उपटून नष्ट करावे.
  • पिठ्या ढेकणाचा प्रादुर्भाव सुरवातीला शेताच्या कडेच्या झाडावरच कमी क्षेत्रात होतो. तेव्हा फक्त प्रादुर्भावग्रस्त भागावरच कीटकनाशकाचा वापर करावा. संपूर्ण शेतातील पिकावर फवारणी करण्याची गरज नाही.
  • पिठ्या ढेकणावर उपजीविका करणारे क्रीप्टोलिमस व इतर ढालकिडे, क्रायसोपा हे परभक्षी व आनागायरास कामली हे परोपजीवी किटक निसर्गात आढळून येतात. या मित्रकिडीचा फायदा घेण्यासाठी त्यांचे संवर्धन करावे.
  • ज्या ठिकाणी मित्र किडी अधिक क्रियाशील आहेत अशा ठिकाणी रासायनिक किटकनाशकांचा वापर टाळून जैविक किटकनाशके उदा. व्हर्टीसिलीयम लेकॅनी, मेटाऱ्हीझीयम अनिसोप्ली 50 ग्राम प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. जैविक किटकनाशकांचा वापर वातावरणात आर्द्रता अधिक असतांना आणि संध्याकाळी फवारणी करावी.
  • नंतरच्या काळात मित्र किटकास कमी हानिकारक असलेले रासायनिक किटकनाशके उदा. बुप्रोफेन्झिन 20 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • या किडीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्यावर गेल्यास नियंत्रणासाठी बुप्रोफेन्झिन 25 एससी. 20 मिली किंवा डायमिथोएट 30 ईसी. 13 मिली. किंवा फ्लोनिकामीड 50 डब्लूजी. 4 ग्राम प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. या किडीच्या अंगावर मेणचट आवरण असल्यामुळे फवारणी करतांना किटकनाशकासोबत 20 ग्राम धुण्याची पावडर किंवा फिश ऑईल रोझीनसोप 10 लिटर पाण्यात मिसळावी.

तुडतुडे 

हि कीड पाचरीच्या आकाराची 3 ते 4 मिमी. लांबी असून तिचा रंग फिक्कट हिरवा असतो. तुडतुडे पानाच्या खालच्या बाजुस बहुसंख्येने आढळतात. तुडतुड्यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे ते नेहमी तिरके चालतात. त्यांचा एकंदर जीवनक्रम २ ते ४ आठवड्यांचा असतो. कापूस उगवल्यापासून 12 ते 15 दिवसानंतर या किडीचा प्रादुर्भाव सुरु होतो व तो सर्वसाधारणपणे 45 दिवसापर्यंत जास्त असतो. हि कीड पानातील रस शोषण करून घेते व त्यामुळे पानांच्या कडा पिवळसर व नंतर तांबूस होतात. पानांच्या कडा खालच्या दिशेने वाकतात. जास्त प्रादुर्भाव झाल्यास पाने गळून पडतात व झाडांची वाढ खुंटते. तुडतुडे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत फारच क्रियाशील असतात. अधूनमधून होणारा हलकासा पाऊस उष्ण व दमट हवामान, कमी सूर्यप्रकाश दिर्घकाळ राहिल्यास या किडीचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतो.

एकात्मिक व्यवस्थापन –

सरासरी 2 ते 3 तुडतुडे प्रती पान दिसून आल्यास 5 टक्के निंबोळी अर्क किंवा व्हरटीसिलीअम लेकॅनी 10-15 टक्के 40 ग्रा. किंवा असीटामेप्रीड 20 टक्के 4 ग्रा. किंवा थायमिथोक्झाम 25 टक्के 4 ग्रा. किंवा मिथील डेमेटोन 25 टक्के 10 मिली. प्रती 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.

महत्वाच्या बातम्या –

धनिकधार्जिणा व शेतकरी, मध्यमवर्गीयांची घोर निराशा करणारा अर्थसंकल्प! – अशोक चव्हाण

गुळाचा चहा पिण्याचे शरीरासाठी गुणकारी फायदे

वीजयंत्रणे जवळील कचरा पेटल्याने महावितरणचे लाखोंचे नुकसान