महत्वाची बातमी – आता राज्यातील शेतमजुरांनाही अपघात विम्याचे २ लाखांचे कवच मिळणार

शेतमजूर म्हणजे काय तर इतरांच्या शेतजमीनीमध्ये कृषीविषयक कामे रोजंदारी तत्वावर करण्यासाठी जाणारा मजूर म्हणजे शेतमजूर होय. आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे शेती आणि शेतीचा मुख्य कणा शेतमजूर आहे. शेतकरी आणि शेतमजूर हे नातं खूप अतूट आहे. देशात १९६१ साली शेतीवर अवलंबून असणाऱ्यांचे प्रमाण ७२.३६ टक्के होते. त्यापैकी ५२.८० टक्के शेतकरी तर १९.५ टक्के शेतमजूर होते. २०११ साली देशात शेतीवर आधारित लोकसंख्येचे प्रमाण ५४.६० टक्के झाले. त्यात शेतकरी २४.६० टक्के तर मजूर ३० टक्के आहेत. यावरून शेतीवर आधारित शेतकऱ्यांचे प्रमाण कमी झाले मात्र शेतमजुरांचे प्रमाण वाढल्याचे दिसते.

केंद्र सरकारने शेतकऱ्यांबरोबर आता शेतमजुरांनाही अपघात विम्याचे कवच राहणार आहे. याकरिता केंद्र सरकारने आता  ‘ई-श्रम योजना’ ही सुरु केली आहे. देशातील असंघटित कामगार व मजुरांना ई-श्रमपत्र मिळवून देणारी योजना शेतीत कोणत्याही प्रकारची मजुरी करणाऱ्यांना देखील लागू आहे. त्यामुळे नोंदणीकृत मजुरांना दोन लाखांपर्यंत अपघाती विम्याचे कवच मिळू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

केंद्र सरकारने नव्याने सुरु केलेल्या योजनेची माहीती अद्यापही अनेकांना नाहीच. आतापर्यंत ग्रामीण भागात केवळ स्व.गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना ही माहिती होती.  मात्र, या योजनेमुळे असंघटित कामगार व मजुरांना फायदा होणार आहे.

तसेच देशात ३८ कोटी असंघटित कामगार व मजूर आहेत. त्यांची माहिती संकलित करण्यासाठी केंद्र सरकारने ‘ई-श्रम’ नावाचे एक संकेतस्थळ (पोर्टल) सुरू केले आहे. तेथे मोफत नोंदणी करता येते. आतापर्यंत या संकेतस्थळावर देशभरातील आठ कोटींहून अधिक असंघटित कामगार, मजुरांनी नोंदणी केली आहे.

तसेच केंद्राच्या ‘ई-श्रम’ योजनेमध्ये शेती व शेतीसंलग्न क्षेत्रातील मजुरांना तसेच रोजगार हमी योजनेतील मजूर, बांधकाम क्षेत्र, मासेमारी, रोजंनदारी करणारे मजूर, फलाटावर काम करणारे मजूर तसेच फेरीवाले, घरकाम करणारे यांनाही सहभागी होता येणार आहे.

या नोंदणीची सुविधा ऑनलाइन व मोफत आहे. त्यामुळे गावातील सार्वजनिक सुविधा केंद्रावर जाऊन मजुरांनी नोंदणी करून घ्यावी. तसेच संकेतस्थळावर नोंदणी करताना हाताशी आधार क्रमांक, आधार संलग्न मोबाइल क्रमांक, बॅंक खात्याचा तपशील ठेवावा लागतो. त्याचबरोबर मजुराचे वय १६ ते ५९ वर्षे या दरम्यान हवे आहे.

नोंदणी केल्यानंतर असंघटित कामगारांना ‘डिजिटल ई-श्रम कार्ड’ उपलब्ध होते. या कार्डवरील सर्वसमावेशक खाते क्रमांक (युनिव्हर्सल अकाउंट नंबर) देशभरात कुठेही विविध कामांकरिता स्वीकारला जाणार आहे. त्यामुळे अशा मजुरांना सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळवण्यासाठी पुन्हा इतर ठिकाणी नोंदणी करण्याची गरज नसेल.

ई-श्रम कार्डसाठी नोंदणी ही https://register.eshram.gov.in या संकेतस्थळावर करायची आहे. अपघाती मृत्यू झाल्यास वारसांना दोन लाख रुपये मिळतात. अपघातात कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास नोंदणीकृत मजुराला दोन लाख रुपये, तर आंशिक अपंगत्व आल्यास एक लाख रुपयांचे अर्थसाह्य दिले जाते.

महत्वाच्या बातम्या –