जांभूळ लागवड पद्धत

जांभूळ हे फळ महत्त्वाचे औषधी गुणधर्म असलेले परंतु दूर्लक्षित असे कोरडवाहू सदाहरित फळझाड आहे. फळे आंबट, गोड तुरट लागतात. जांभळाच्या बियांचा, फळांचा आणि सालीचा उपयोग मधुमेहासाठी केला जातो.

हवामान

उष्ण व समशीतोष्ण हवामान चांगले मानवते. समुद्रसपाटीपासून १५० मी उंचीपर्यत चांगले येते. हे एक काटक वृक्ष असल्याने कमी तसेच अति पावसाच्या (३५० ते २००० मिमी) प्रदेशातही चांगल्या प्रकारे येते.

जमीन

जांभळाची झाडे सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये वाढतात. गायरानाच्या हलक्या, पडीक ते सुपीक मध्यम काळ्या, माळाच्या जमिनीत ही झाडे चांगली वाढतात. पाण्याचा उत्तम निचरा होणारी, खोल मातीची जमीन असावी. जमिनीचा सामू ६ ते ७.५ असावा.

अभिवृध्दीचा प्रकार

जांभळाची लागवड बियांपासून रोपे तयार करुन तसेच पॅच पध्दतीने डोळे भरुन अभिवृध्दी करता येते. डॉ.बाबासाहेब सावंत कृषि विद्यापीठाने बहाडोली जांभळाच्या जातीची अभिवृध्दी करण्यासाठी मृदूकाष्ठ ही कलम पद्धती विकसित केली आहे.

लागवडीचे अंतर

१० X १० मी लागवडीसाठी १ X १ X १ मी आकाराचे खड्डे खोदावेत. प्रति हेक्टरी १०० झाडे लावता येतात.

पाणी

लागवडीनंतर कलमांना सुरुवातीची दोन वर्षे पाणी देणे आवश्यक आहे. पहिल्या वर्षी प्रति कलमास हिवाळ्यात दर १० दिवसांनी तर उन्हाळ्यात दर ५ दिवसांनी पाणी द्यावे. दुस-या वर्षी प्रति कलमास दर १५ दिवसांनी तर उन्हाळ्यात दर १० दिवसांनी पाणी द्यावे. रोपांना जगविण्यासाठी फक्त संरक्षक पाण्याच्या मात्रा पहिल्या वर्षी द्याव्यात.

खते

खड्डा भरताना त्यामध्ये तळाला पालापाचोळा टाकून १५ ते २० किलो चांगले कुजलेले शेणखत + १५-२० किलो पोयटा माती व १.५ किलो सिंगल सुपर फॉस्फेट व उर्वरीत भाग चांगल्या मातीच्या मिश्रणाने भरुन घ्यावा. जांभळाच्या रोपाला पहिल्या वर्षी १ घमेले शेणखत, २०० ग्रॅम युरिया, ५०० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट व १०० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे. हे खताचे प्रमाण दरवर्षी वाढवत जावे. पाचव्या वर्षी ५ घमेली शेणखत १ किलो युरिया, १.५ किलो सिंगल सुपर फॉस्फेट व ५०० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे.

आंतरपिके

लागवडीनंतर सुरुवातीची ७८ वर्षे आंतरपिके घेता येतात. त्यामध्ये पावसाळ्यात झेंडू, ग्लॅडीओलस किंवा भेंडी, काकडी, वेलवर्गीय भाजीपाला ही भाजीपाला पिके घेता येतात. हिवाळ्यात अॅस्टर, ग्लॅडीओलस, गॅलार्डीया इ. फुलपिके, श्रावणी घेवडा, चवळी, वांगी, टोमॅटो, मिरची इ. भाजीपाला पिके घेता येतात.

फळांची काढणी

जांभळाची रोपांपासून लागवड केल्यास साधारणत: ८-९ वर्षांनी फळे लागतात. कलमापासून लागवड केल्यास सातव्या वर्षापासुन उत्पादनास सुरुवात होते. फळे बांबूच्या करंडीतून किंवा फळ्याच्या खोक्यातुन बाजारात पाठवावीत

उत्पादन

पूर्ण वाढलेल्या झाडापासून  (८-१० वर्षानंतर) ५० ते १०० किलो फळे मिळतात.

कीड व रोग नियंत्रण

  1. साल खाणारी अळी – सुरुवातीस अळी झाडावरील साल पोखरुन खाते आणि नंतर भोक पाडून फांद्या किंवा मुख्य खोडात शिरते.  त्यामुळे झाड कमकुवत होते आणि झाडाचे उत्पन्न घटते. या किडीच्या नियंत्रणासाठी फांद्या किंवा खोडातील भोकात सुमारे ५ मिली रॉकेल किंवा पेट्रोल ओतावे व ते भोक ओल्या चिकट मातीने बुजवून टाकावे. या किडीचा प्रादुर्भाव विशेषत : सप्टेंबर- ऑक्टोबर आणि फेंब्रुवारी – मार्च महिन्यात दिसुन येतो.
  2. फळमाशी – फळमाशीच्या प्रादुर्भावामुळे फळे किडकी होतात आणि खाण्यास अयोग्य होतात. प्रादुर्भाव हा जून-जुलै महिन्यात आढळतो. नियंत्रणासाठी बागेतील किडग्रस्त फळे वेचून खोल पूरावीत. झाडाखालील जमीन थोडी खणावी म्हणजे फळमाशीच्या कोशावस्थेत जाणा-या अळ्या पक्ष्यांमार्फत मारल्या जातील.  बागेत कामगंध सापळे प्रति हेक्टरी ४ ते ६ समान अंतरावर लावावेत.

रोग –

पानावरील ठिपके आणि फळकूज – ग्लोमेरॅल्ला सिंगुलाटा या बुरशीमुळे हे रोग होतात. प्रादुर्भावीत पानावर फिक्कट राखाडी किंवा तांबूस- राखाडी ठिपके आढळतात. प्रादुर्भावीत फळे कुजतात आणि सुकून गळतात. या रोगाच्या नियंत्रणासाठी डायझेन झेड -७८, २ ग्रॅम/प्रति लीटर पाण्यात किंवा ४:४:५० तीव्रतेचे बोर्डो मिश्रण झाडावर फळे नसताना किंवा फळे धरल्यानंतर फवारावे.