राज्यातील ‘या’ विभागात डिजिटल सात–बारा वाटप मोहिमेस गती

ठाणे जिल्ह्यातील सुमारे 5 लाख 24 हजार 491 खातेदारांना शेतीचा सातबारा मोफत घरपोच देण्याची मोहिम सुरू केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली. ठाणे जिल्ह्यामध्ये एकूण 6 लाख 45 हजार 171 इतके सातबारे असून त्यापैकी 5 लाख 4 हजार 91 शेतीचे सातबारा आहेत. यापैकी आतापर्यंत जिल्ह्यात सुमारे सव्वा लाख सात-बारा उताऱ्याचे वाटप जिल्ह्यात झाले आहे. तर पालघरमध्ये 4,96,118 इतके सातबारा आहेत. रत्नागिरीमध्ये 20 लाख 22 हजार 678 सातबारा डिजिटल स्वरुपात उपलब्ध आहेत. तर रायगड जिल्ह्यात एकूण 11 लाख 52 हजार 621 सातबारा उतारे आहेत. त्यापैकी 9 लाख 89 हजार 663 उताऱ्यांचे वाटप करण्यात येणार असून आतापर्यंत सुमारे 90 हजार उताऱ्यांचे वाटप पूर्ण झाले आहे.

डिजिटल भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम, ई-महाभूमी अंतर्गत विकसित करण्यात आलेल्या आज्ञावलीमधून संगणकीकृत डिजिटल स्वाक्षरीने प्राप्त होणाऱ्या अधिकार अभिलेख विषयक शेतजमिनीचा सातबारा अद्ययावत उताऱ्याच्या प्रती गावामध्ये संबंधीत तलाठ्यामार्फत प्रत्येक खातेदारास घरोघरी जाऊन मोफत देण्याच्या दृष्टीने विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. ठाणे जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना मोफत सातबारा घरपोच वाटप करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तहसीलदारांना नियोजन करण्याबाबत सूचना देण्यात आल्या असून तलाठ्यांमार्फत सातबारा वाटपास सुरूवात झाली आहे. शेतकरी बांधवांनी या मोफत डिजिटल स्वाक्षरी सातबारा वाटप मोहिमेमध्ये सहभागी व्हावे. वाटप केलेल्या सातबारा मध्ये काही त्रुटी किंवा विसंगती असल्यास खातेदाराचा अभिप्राय घेऊन त्याची पूर्तता केली जाईल. जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नव्या स्वरुपातील डिजिटल सात बाराचे मोफत वाटप सुरू असले एका खातेदारास एकदाच हा सातबारा मोफत मिळणार आहे. त्यानंतर आवश्यक असल्यास ऑनलाईन पद्धतीने हा सातबारा आपल्याला काढता येणार आहे. त्यासाठी  bhulekh.mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आपल्याला डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा व 8 ई उतारा मिळविता येणार आहे. सर्वच शासकीय उपयोगासाठी हे डिजिटल स्वाक्षरी सात-बारा व 8 ई उतारे ग्राह्य धरले जात असल्याने प्रत्यक्ष कार्यालयात जाण्याची आवश्यकता उरली नाही. माहिती तंत्रज्ञानाचा या उपयोगाचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घेतल्यास त्यांचा वेळ व श्रम वाचणार आहेत.

महत्वाच्या बातम्या –