Share

चौथी पास शेतकऱ्याची कमाल! पाण्याविना फुलवली लिंबाची बाग, महिन्याला लाखोंची कमाई

Published On: 

Zero Budget Lemon Farming: Farmer Rajashekhar Nimbargi standing in his lush green natural lemon orchard.

Lemon Farming: : दुष्काळ, पाण्याची टंचाई आणि डोक्यावर कर्जाचा डोंगर. या दुष्टचक्रात आजचा बळीराजा अडकलाय. पण याच परिस्थितीत एका चौथी पास शेतकऱ्याने भन्नाट किमया करून दाखवलीये. पाण्याचा एक थेंबही न देता, एका एकरात लिंबाची बाग फुलवून हा शेतकरी महिन्याला तब्बल १ लाख ६० हजार रुपये कमावतोय.

ही थक्क करणारी यशोगाथा आहे कर्नाटकातील विजयपूर जिल्ह्यातल्या बेनकनहळी गावची. राजशेखर निंबर्गी असं या प्रयोगशील शेतकऱ्याचं नाव. त्यांच्याकडे ४५ एकर शेती आहे. कृषी तज्ज्ञांनाही कोड्यात पाडणारं ज्ञान त्यांच्याकडे आहे. झिरो बजेट अर्थात नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून ते आज ५२ प्रकारची धान्यं, मसाले आणि फळांचं भरघोस उत्पादन घेतात.

नैसर्गिक शेतीचा चमत्कार: शून्य खर्चात लिंबू बागेतून लाखोंची कमाई

निसर्ग शेती करणं अगदी सोपं असल्याचं निंबर्गी सांगतात. शेतातला पालापाचोळा तिथेच टाकून आच्छादन तयार करायचं. हे कुजल्यावर त्यातून ओलावा तयार होतो आणि जमीन हिरवीगार राहते. सोलापूरला लागून असलेल्या विजयपूरमध्ये भीषण दुष्काळ आहे. धरणं, नदी-नाले कोरडे पडलेत. तरीही निंबर्गी दर बुधवारी आणि रविवारी तब्बल १० हजार लिंबांची तोडणी करतात. दोन रुपये प्रति लिंबू या दराने महिन्याला ८० हजार लिंबं विकून ते लाखोंचा गल्ला जमवतात.

“मी पूर्ण समाधानी आहे. माझ्यावर कुठलंही बँकेचं कर्ज नाही. इच्छाशक्ती असेल तर कोणताही शेतकरी सुखी होऊ शकतो,” असा आत्मविश्वास ते व्यक्त करतात. रासायनिक शेती म्हणजे धरणीमातेवर अत्याचार असल्याचं त्यांचं ठाम मत आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत कर्नाटक सरकारने त्यांना सर्वोच्च कृषी पुरस्काराने सन्मानित केलं आहे. महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी ही यशोगाथा नक्कीच एक नवा आशेचा किरण आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
पिकपाणीयशोगाथा (Success Stories)
krushinama fevicon

🕘 संबंधित बातम्या