इस्राईलमधील शेती तंत्रज्ञान

महाराष्ट्र देशा/प्रशांत झावरे : इस्राईल आणि भारत या दोन देशांची तुलना केली तर भौगोलिक आकारापासून कमालीची भिन्नता स्पष्ट होते. जेमतेम 80 लाख लोकसंख्येचा हा देश मुंबईहून छोटा आहे. कृषी क्षेत्रातील प्रगतीबाबत या देशाचे नाव ख्यातकीर्त असले तरी राष्ट्रीय उत्पन्नात शेती उत्पादनांतून मिळणा-या उत्पन्नाचा वाटा केवळ दोन टक्के आहे, हे उल्लेखनीय.

येथे तयार होणारी बहुतेक कृषी उत्पादने स्थानिक बाजारपेठेतच खपतात. हा देश काही उत्पादने युरोपात निर्यात करण्यातही आघाडीवर आहे. कृषी क्षेत्रातील अत्युच्च तंत्रज्ञान येथील शास्त्रज्ञांनी विकसित केले आहे. त्याला जगात तोड नाही. हे तंत्रज्ञान जगाला विकण्यावर या देशाचा आता भर आहे. तंत्रज्ञान व नावीन्य यांचा ध्यास इस्रायलच्या शेती क्षेत्रात पदोपदी जाणवतो. पाण्याची कमतरता आणि शेतीला योग्य नसलेली रेताड जमीन या संकटांशी झुंज देत येथे समृद्धीचे मळे फुलले आहेत. शेतीचे अफलातून रूप या देशात बघायला मिळते.

तंत्रज्ञानाच्या जोरावर काटेकोर शेती आणि प्लॅस्टिकल्चरचा वापर करून इस्रायल जागतिक यशोगाथा बनला आहे. भारत आणि इस्रायलमधील कृषी देवाणघेवाणीच्या संधी एकमेकांच्या सशक्त बाजू कायम ठेवूनही आणखी वृद्धिंगत होऊ शकतात. शेतकरी किंवा शेती उद्योगाशी संबंधित लोकांनी इस्रायलमध्ये खालील विषयांकडे लक्ष दिले पाहिजे. कारण ही क्षेत्रे दोन्ही देशांच्या दृष्टीने देवाणघेवाणीलाही प्राधान्यक्रमावर आहेत.

अन्न आणि अन्नप्रक्रिया तंत्रज्ञान, कौशल्ये आणि साधने, पॅकेजिंग, अन्न गोठवणूक तंत्रज्ञान हे विषय या क्षेत्रात येतात. जागतिक अन्न उत्पादनात भारताचा वाटा 12 टक्के असला तरी जेमतेम 2 टक्के उत्पादनांवर आपण प्रक्रिया करतो. इथे आपल्या देशाला केवढी मोठी संधी आहे. उत्पादन, प्रक्रिया, काढणीपश्चात (पोस्ट हार्वेस्टिंग) तंत्रज्ञान, साठवणूक (वातानुकूलित गोदामांसह) आदी क्षेत्रे गुंतवणुकीसाठी उपयुक्त आहेत. त्यासाठी इस्रायलमध्ये अत्युच्च तंत्रज्ञान उपलब्ध आहे. भारतात डेअरी उत्पादने आणि प्रक्रिया क्षेत्रात खासगी क्षेत्राचा सहभाग वाढता आहे.

डेअरी उत्पादनांमधील व्यवसाय वर्षाला 18 ते 20 टक्क्यांनी वाढतो आहे. छोट्या वसायिकांकडून उत्पादकतेत फारसे लक्ष दिले जात नाही. आपल्याकडचे सहकारी तत्त्वावर चालणारे डेअरी उद्योग खराब व्यवस्थापनामुळे रडतखडत सुरू आहेत. त्यातच दुधाची कमी उत्पादकता मारक ठरते आहे. दुग्ध उत्पादक क्षेत्रापुढील हे मोठे आव्हान आहे. इस्रायलची दूध उत्पादकता जगात सर्वोच्च आहे. येथील गाय एका वेतामागे 11 हजार लिटर दूध देते. आपल्याकडे 3 हजार लिटर! उच्च संशोधनातून हे शक्य झाले आहे.

इस्रायलमधील पोल्ट्री उद्योग आज जगात सर्वोत्तम आहे. भारतात या क्षेत्रात अमाप संधी आहेत. येथील पोल्ट्री उद्योगाला गुणवत्तेचे वरदान आहे. आपल्याकडच्या तरुण शेतक-यांनी शेतीला जोडधंदा म्हणून इस्रायली पोल्ट्रीचे अनुकरण केले तर निश्चितच चांगले घडू शकेल. पोल्ट्री खाद्य, उत्पादन, ब्रीडर फार्म, हॅचरीज, व्यावसायिक ब्रॉयलर फार्म्स, कोंबड्यांचे कत्तलखाने, प्रक्रिया, विक्री या प्रत्येक टप्प्यावर भारतातील शेतक-यांना, विशेषत: शेतकरी गटांना शिकण्यासारखे खूप आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब कसा वापरायचा, याचा धडा इस्रायलने जगाला दिला.

शिवाय मत्स्योत्पादनातही या देशाने कमाल करून दाखवली. अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून सागरी व गोड्या पाण्यातील मत्स्यशेतीत नवे मापदंड उभे केले. समुद्राचे खारे पाणी वळवून ‘केजफिश फार्मिंग’ अत्यंत यशस्वी केले. महाराष्ट्राला केवढा मोठा विस्तीर्ण समुद्र्रकिनारा आहे. कोकणातील शेतक-यांनी एकत्र येऊन या क्षेत्रात गुंतवणूक केली तर ती वाया जाणार नाही. भारतात सध्या मासेमारी क्षेत्रात वापरले जाणारे तंत्रज्ञान, प्रक्रिया आणि पॅकेजिंगचे तंत्रज्ञान जुनाट आणि अपुरे आहे. इंडिव्हिज्युयल फ्रिजिंग (आयक्यूएफ) सारखे प्रकल्प अलीकडे उभारण्यात आले. मात्र त्यांची क्षमता खूपच अपुरी आहे.

प्रचलित गोठवणुकीच्या तंत्राने साठवलेले मासे व आयक्यूएफ तंत्राने साठवलेले मासे यांच्या किमतीत व गुणवत्तेत मोठा फरक असतो. खोल समुद्रातील मासेमारी उद्योग सध्या कच्च्या पायावर उभा आहे. खोल समुद्रात प्रॉन्स, श्रिम्प, टुना, लोबस्टर, कॅटफिश पकडण्यासाठी नव्या तंत्राची गरज आहे. कोकणातील मत्स्योद्योगासाठी असे तंत्र वरदान ठरू शकेल. मोर्चे, आंदोलने करुन मत्स्य उत्पादकांचे किंवा मासेमारी करणा-यांचे प्रश्न सुटणार नाहीत.

सूक्ष्म सिंचन हा तर इस्रायलच्या शेतीचा आत्मा आहे. शेतीसाठी सिंचन ही महाराष्ट्राच्या शेतीची मोठी गरज आहे. शेतीच्या सिंचनात महाराष्ट्राचा क्रमांक देशात शेवटून दुसरा आहे. उत्पादन आणि उत्पादकता वाढीसाठी सूक्ष्म सिंचन उपयोगी ठरणार आहे. इस्रायलसारख्या चिमुकल्या देशाने संपूर्ण जगाला सूक्ष्म सिंचनाचे वरदान दिले. या क्षेत्रात दंतकथा भासतील अशा यशोगाथा रचल्या. या क्षेत्रात भागीदारीच्या संधी व्यावसायिकांसाठी तर अनुकरणाच्या संधी शेतक-यांसाठी आहेत.

इस्रायलमधील कृषी प्रदर्शनात युरोपातील कृषी उद्योगातील अनेक बलाढ्य कंपन्या आपापली उत्पादने मांडत असतात. त्या उत्पादनांची, तंत्राची माहिती नीट समजावून घ्या. केवळ तिथे मिळणारी पत्रके, ब्रोशर्स, पुस्तके मिळवली म्हणजे प्रदर्शन पाहिले असे नाही. शेतक-यांनी आपल्याला हवे असलेले तंत्रज्ञान प्रदर्शनात आहे की नाही ते हुडकून समजून घ्यावे. प्रदर्शन पाहण्यासाठी एक पूर्ण दिवस पुरतो. त्यानंतर शेतक-यांनी फील्ड व्हिजिटवर भर द्यावा. आपल्या दौ-यात आपल्या शेतीशी संबंधित प्रक्षेत्र भेटी (फील्ड व्हिजिट्स) आयोजकांनी ठरवल्या आहेत का, याची आधीच माहिती घ्या.

नसतील तर त्या आपल्या गरजेनुसार ठरवून घ्या. आपल्या शेतीसाठी कोणते तंत्रज्ञान अधिक उपयोगी आहे, याची माहिती प्रामुख्याने मिळवा. प्रदर्शनात ती मिळणार नसेल तर स्थानिक लोकांकडून माहिती घेऊन ते शोधा. येथून पुढची शेती यांत्रिकीकरणावर आधारित असेल. मजुरांच्या टंचाईमुळे हैराण झालेल्या शेतक-यांनी प्रदर्शनातील कृषी अवजारांची जरूर माहिती घ्यावी. ही उत्पादने विकत घेणे आवाक्यात नसले तरी आपल्याकडील उत्पादकांकडे मागणी करून अशी उत्पादने आपण तयार करवून घेऊ शकतो.