ई-पीक पाहणी मोबाईल ॲप्लिकेशनचा वापर कसा करावा? जाणून घ्या

सध्या ई पीकपाहणी संदर्भात शासकीय स्तरावरून सर्व शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. मित्रांनो तुम्ही जर शेतकरी असाल तर तुम्हाला आता तुमच्या पिकांची नोंदणी स्वतः करता येणार आहे. तुम्हाला जर माहित नसेल ई-पीक पाहणी मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड कसे करावे आणि या ई पीक पाहणी मोबाईल ॲपचा उपयोग करून आपल्या शेतातील पिकांची माहिती कशी नोंदवावी. यासाठी सर्व प्रथम ॲन्ड्रॉइड मोबाईल मधील प्ले स्टोर https://play.google.com/store/apps/details?id=org.mahait.epeek  मधून ई पीक पाहणी हे ॲप्लीकेशन डाऊनलोड करुन घ्यावे.

त्यानंतर शेतकऱ्याने स्वत:चा मोबाईल क्रमांक नोंदवावा. पुढे स्वत:चा जिल्हा, तालुका, गाव निवडा आणि खातेदार निवडा किंवा गट क्रमांक टाका. ही माहिती भरुन झाल्यानंतर आपला परिचय निवडा आणि त्यानंतर पुन्हा होम पेजवर या.  होम पेजवर आल्यानंतर पीकाची माहिती भरा, पीकाची अचूक माहिती भरल्यानंतर खाते क्रमांक निवडा, पुढे भूमापन क्रमांक किंवा गट क्रमांक निवडल्यानंतर जमिनीचे एकूण क्षेत्र निवडा, पुढे हंगाम निवडा, त्यानंतर पीकाचा वर्ग निवडा, एक पीक असेल तर निर्भेळ पीक (एक पीक) निवडा, किंवा एका पेक्षा जास्त पीक असेल तर बहुपिक निवडा, हे झाल्यानंतर पिकाचे नाव निवडा, सिंचन पद्धत, लागवडीचा दिनांक या सर्व गोष्टी अचूकपणे भरल्या नंतर शेतकऱ्याने स्वत:च्या मोबाईलचे जीपीएस, स्थान (लोकेशन) चालू ठेवून शेतात उभे राहून  मुख्य पिकाचे छायाचित्र काढावे ही महत्त्वाची प्रक्रिया असल्याने मुख्य पिकाचे छायाचित्र काढताना शेतकऱ्याने विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. हे सर्व झाल्यानंतर माहिती समाविष्ट करावी. ई पीक पाहणी इतक्या सोप्या पद्धतीने करता येते.

ई-पीक पाहणी अंतर्गत खातेदाराची एकदाच नोंदणी करता येईल. 15 सप्टेंबरपर्यंत हंगाम निहाय पिकाची माहिती अक्षांश-रेखांशासह काढलेल्या पिकाच्या छायाचित्रासह अपलोड करण्यात येईल. 16 ते 30 सप्टेंबर दरम्यान मोबाईल ॲपमधील माहितीची अचूकता पडताळून आणि आवश्यक असल्यास दुरूस्ती करून तलाठ्याद्वारे कायम केली जाईल. खातेनिहाय पिकांची माहिती संबंधित डिजिटल स्वाक्षरीत 7/12 मधील गाव नमुना 12 मध्ये उपलब्ध करून देण्यात येईल. 1 ऑक्टोबरपासून शेतकरी रब्बी हंगामाची पीक पाहणी अपलोड करू शकतात. एका मोबाईलवरून 20 खातेदारांची नोंदणी करता येणार असल्याने एखाद्या शेतकऱ्याकडे स्वत:चा स्मार्टफोन नसल्यास उपलब्ध होणारा दुसरा स्मार्टफोन वापरता येईल. अल्पवयीन खातेदाराच्या बाबतीत त्याचे पालक नोंदणी करू शकतात. सामायिक खातेदार त्यांच्या वहीवाटीत असलेल्या क्षेत्रातील पिकांची स्वतंत्रपणे नोंदणी करू शकतील. ई पीक पाहणीचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा यासाठी  प्रशासनामार्फत आवश्यक प्रशिक्षणाला सुरूवात करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी या प्रणालीची माहिती घेतल्यास येत्या काळात त्यांना ई-पीक पाहणी उपयुक्त ठरू शकेल असा प्रशासनाला विश्वास आहे. शेतकऱ्यांना विविध सुविधा आणि योजनांचा लाभ घेणे शक्य होणार असल्याने आणि ही प्रक्रिया पारदर्शक असल्याने प्रत्येक शेतकऱ्याला यात सहभागी करून घेण्याचे प्रशासनाचे प्रयत्न आहेत.

महत्वाच्या बातम्या –