किटकनाशके फवारणी करताना ही घ्या काळजी !

अकोला : कीटकनाशकांची फवारणी करतांना विदर्भात १८ शेतकऱ्यांचा विषबाधा होऊन मृत्यू झाला.  शेतकऱ्यांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. फवारणी करताना योग्य काळजी न घेतल्यामुळे विषबाधा होऊन १८ शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला. तर ५४६ शेतकरी रुग्णालयात उपचार घेत आहेत. हा प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.
पिकांवर फवारणी करताना शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी. किटकनाशक वापरण्यापुर्वी  लेबल व माहिती पत्रक वाचून खबरदारीच्या सर्व  सुचनांचे पालन करावे. डब्यावरील लाल रंगाच्या पतंगीच्या  आकाराचे चिन्ह  असलेली  किटकनाशके  सर्वात विषारी असतात. तसेच पिवळा ,निळा व हिरवा असा क्रम लागतो.  ही चिन्हे सोपी  व सर्वसाधारण व  निरक्षर व्यक्तीसाठी समजण्यासाठी असतात. म्हणजेच  हिरव्या  रंगाची चिन्ह  असलेली किटकनाशके कमीत कमी विषारी असतात. तणनाशके फवारणीचा पंप चुकूनही फवारणीसाठी वापरू नये. फवारणी करतांना संरक्षक कपडे, बुट ,हात , मोजे, नाकावरील मास्क इत्यादींचा वापर करावा.  उघडया अंगाने फवारणी  करणे टाळावे व नाकावर पातळ  कापड झाकावा जेणेकरून श्वासाच्छावासातुन किटकनाशकाचा विपरीत परिणाम टाळता येईल याची दक्षता घ्यावी.
संपूर्ण क्षेत्रावर  एकाच व्यक्तीकडून  फवारणी  करून न घेता एका व्यक्तीकडून  कमीत कमी क्षेत्रावर फवारणी करावी. एकाच व्यक्तींनी  जास्त  मजुरी मिळावी म्हणून जास्त क्षेत्रावर  फवारणी करणे टाळावे. तसेच दररोज फवारणीचे  काम करू नये. विषबाधा झाल्यास किटकनाशकाच्या माहिती  पत्रकासह डॉक्टरकडे जावे. फवारणी शक्यतोर  हवा कमी असताना किंवा हवेच्या दिशेने करावी. प्राधान्याने सकाळी अथवा सायंकाळी करावी. किटकनाशकांची   फवारणी  केल्यानंतर  हात स्वच्छ धुवावेत. अधिक माहितीसाठी कृषि अधिकारी (पंचायत समिती) तालुका कृषी अधिकारी , मंडळ  कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक , कृषी सहाय्यक, कृषी विद्यापिठातील तज्ञ  यांचेशी  संपर्क साधावा, असे आवाहन  जिल्हा कृषी अधिक्षक कृषी अधिकारी अकोला यांनी केले आहे.
किटकनाशक वापरण्यापुर्वी  लेबल व माहिती पत्रक वाचून सुचनांचे पालन करावे
फवारणी करताना संरक्षक कपडे, बुट ,हात , मोजे, नाकावरील मास्क वापरावा
उघडया अंगाने फवारणी  करणे टाळावे व नाकावर पातळ  कापडा झाकावा
विषबाधा झाल्यास तात्काळ किटकनाशकाच्या माहिती पत्रकासह डॉक्टरकडे जावे