पाठदुखीची का उद्‌भवते तक्रार? जाणून घ्या

सध्याची अनियमित आणि धावपळीची जीवनशैली यामुळे अगदी लहान वयातही पाठदुखी सुरू होऊ शकते. आघात, अपघात, ताठ न बसण्याची सवय, बैठ्या स्वरूपाचे कामकाज, व्यायामाचा अभाव, फार मऊ गादीवर झोपणे, उंच उशी वापरणे, स्थौल्य, उंच टाचेच्या चपला वापरणे, जड वस्तू उचलणे, ओढणे ही सुद्धा पाठदुखीला आमंत्रण देणारी असतात.

सहसा चाळिशीनंतर दुखणी डोके वर काढतात असा आत्तापर्यंतचा समज होता. सध्या मात्र पाठदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी या त्रासांना वयाचा निर्बंध राहिलेला दिसत नाही. तरुण वयातच नव्हे तर, लहान मुलांनाही पाठदुखीचा त्रास होताना दिसतो. सध्याची अनियमित आणि धावपळीची जीवनशैली हे यामागचे मोठे कारण असू शकते. विशेषतः लहान मुलांना पाठीवर उचलावे लागणारे दप्तराचे ओझे, प्रवास करताना पाठीवर झेलावे लागणारे खड्ड्यांचे धक्के, संगणकावर काम करणाऱ्यांच्या किंवा सतत मोबाईलच्या वापराने मान-पाठीवर येणारा ताण अशी कितीतरी कारणे पाठदुखीला कारण ठरू शकतात.

वाढत्या वयानुसारही पाठ-कंबरदुखी सुरू होऊ शकते. आघात, अपघात, ताठ न बसण्याची सवय, बैठ्या स्वरूपाचे कामकाज, व्यायामाचा अभाव, फार मऊ गादीवर झोपणे, उंच उशी वापरणे, स्थौल्य, उंच टाचेच्या चपला वापरणे, जड वस्तू उचलणे, ओढणे ही सुद्धा पाठदुखीला आमंत्रण देणारी असतात. यातील काही कारणे टाळता येण्यासारखी असतात तर काही अनिवार्य असतात. अशा वेळी योग्य उपचार करणे, भविष्यात पाठदुखीचा त्रास होऊ नये म्हणून आधीच काळजी घेणे महत्त्वाचे असते.

का उद्‌भवते तक्रार?

स्त्रियांच्या बाबतीत गर्भाशयातील अशक्‍तता पाठदुखीला कारण ठरू शकते. अंगावरून पांढरे जाणे, पाळीच्या दिवसात अतिरक्‍तस्राव होणे हे सुद्धा पाठदुखीला आमंत्रण देऊ शकते. स्त्रीप्रजननसंस्थेत कुठेही सूज असली, जंतुसंसर्ग असला तरी त्यामुळे पाठदुखी, कंबरदुखी उद्भवू शकते. अर्थात अशा वेळी फक्‍त पाठीवर नाही तर आतील दोषावर नेमके उपचार करणे आवश्‍यक असते.

पाठीचा कणा हा संपूर्ण शरीराचा भरभक्कम आधार असतो. वाकणे, उठणे, बसणे, वळणे, चालणे अशा बहुतेक सर्वच क्रिया करताना आपण पाठीच्या कण्याचा वापर करत असतो. मानेमध्ये सात, छातीच्या मागच्या भागामध्ये बारा, कंबरेमध्ये पाच मणके असतात, माकडहाडाचे पाच मणके एकमेकांशी सांधलेल्या स्थितीत असतात व त्याच्याही खाली तीन-पाच मणके जुळलेल्या स्थितीत असणारा कॉसिक्‍स म्हणून कण्याचा शेवटचा भाग असतो. अशा प्रकारे कवटीपासून ते बैठकीच्या भागापर्यंत हे सर्व मणके एकावर एक रचलेल्या स्थितीत असतात. दोन मणक्‍यांमध्ये जणू रबरापासून बनविल्यासारखी चकती असते, जिला ‘डिस्क’ (गादी) असे म्हटले जाते. या मधल्या चकतीमुळेच कणा वाकू शकतो, वळू शकतो. या शिवाय या सर्व मणक्‍यांना व चकत्यांना धरून ठेवणारे अनेक संधिबंधने, स्नायूू असतात. या कण्यामध्ये मज्जारज्जूचे स्थान असते. अतिशय महत्त्वाच्या व नाजूक मज्जारज्जूला पाठीचा कणा चहूबाजूंनी सुरक्षित ठेवण्याचे काम करत असतो.

आयुर्वेदानुसार विचार केला तर पाठदुखी, कंबरदुखी ही वातदोषातील बिघाडाशी संबंधित तक्रार होय. पाठीतील लवचिकता कमी होणे, उठता-बसताना आधाराची गरज भासणे, पाठ जखडणे, पाठीत चमक भरणे वगैरे सर्व तक्रारी वातदोषाशी संबंधित असतात आणि म्हणूनच पाठदुखी, कंबरदुखीवर उपचार करताना वाढलेल्या, बिघडलेल्या वातदोषाला संतुलित करणे, झीज झालेली असल्यास ती भरून काढणे आणि ज्या कारणामुळे पाठदुखी सुरू झाली असेल ते कारण दूर करणे अशा प्रकारे योजना करणे आवश्‍यक असते.

पाठ दुखायला लागली की विश्रांती घ्यावीशी वाटते हा सर्वांचा अनुभव असतो आणि सहसा यामुळे बरेही वाटते. मात्र फार तीव्र स्वरूपाची पाठदुखी असेल, अगदी साध्या हालचाली करणेही अवघड होत असेल तर मात्र वैद्यकीय सल्ला घेणे आवश्‍यक असते. विशेषतः वेदना पाठीतून सुरू होऊन पायांच्या टोकापर्यंत पोचत असतील, श्वासोच्छ्वास करताना त्रास होत असेल, छातीत दुखत असले तर तातडीने वैद्यकीय सल्ला घेणे इष्ट होय. परंतु अशी परिस्थिती येऊ नये यासाठी दक्ष राहणेच इष्ट.

महत्वाच्या बातम्या –