राज्यातील ‘या’ जिल्ह्यातील सर्व शाळा १० ते ३१ जानेवारीपर्यंत बंद

नाशिक दिनांक – कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता जिल्ह्यातील 10 वी व 12 वी चे वर्ग वगळून सर्व शाळा (School) सोमवार 10 ते 31 जानेवारीपर्यंत बंद राहतील. त्याचप्रमाणे लसीकरणाचा वेग वाढवून, दुसरा डोस घेण्यासाठी विविध माध्यमातून जनजागृती करण्यात यावी, अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या कोरोना सद्यस्थिती आढावा बैठकीत पालकमंत्री श्री. भुजबळ बोलत होते. याबैठकीस जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त दिपक पाण्‍डेय, महानगरपालिकेचे आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, आरोग्य उपसंचालक पी. एस. गांडाळ, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी वासंती माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसिकर, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले, जिल्ह्यातील 10 वी व 12 वी चे वर्ग वगळता बंद करण्यात आलेल्या शाळा (School)  ऑनलाईन पद्धतीने सुरु ठेवण्यास हरकत नाही, जिल्हा आपत्ती व्यवस्थापनांतर्गत घेण्यात आलेला निर्णय पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी जाहिर केला. तसेच ज्या नागरिकांचा लसीकरणाचा दुसरा डोस बाकी आहे. तो वेळेत घ्यावा यासाठी प्रशासकीय यंत्रणामार्फत आवश्यक ते नियोजन करण्यात यावे. त्याचप्रमाणे गेल्या आठ दिवसात वाढलेली रुग्णसंख्या पाहता लग्नसमारंभ साधेपणाने करण्यात यावे. तसेच समांरभामध्ये  50 पेक्षा अधिक व्यक्ती आढळल्यास महसूल व पोलीस यंत्रणा यांच्यामार्फत संयुक्तपणे संबंधित आयोजकांवर कडक कारवाई करण्यात यावी. तसेच पहिला डोस  घेतलेल्यांनी त्यांचा कालावधी पूर्ण होताच दुसरा डोस वेळेत घ्यावा. अन्यथा वेळेत लसीकरण न झाल्यास ‘नो व्हॅक्सिनेशन, नो रेशन’ असा कटू निर्णय घ्यावा लागेल, असेही  पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी  सांगितले.

महत्वाच्या बातम्या –