फायदेशीर बटाटा लागवड

बटाटा पिकाचे लागवड पुणे, सातारा, नाशिक, अहमदनगर, बीड, औरंगाबाद आणि नागपूर या जिल्ह्यात केली जाते. बटाट्यामध्ये प्रथिने, चुना, फाँस्फरस या सारखी खनिजे, ब आणि क जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात. बटाट्याचा उपयोग खाद्य पदार्थाशिवाय अनेक उद्योगधंद्यात मोठ्या प्रमाणात होतो. बटाटा शेतीसाठी आधुनिक पद्धतीचा अवलंब करताना पुढीलप्रमाणे बाबीचा विचार करावा.

आवश्यक हवामान:

बटाटा पिकासाठी वाढीच्या अवस्थेत आणि ट्युबरलायझेनच्या वेळी (बटाटा पिकास काळ) विशेष तापमानाची गरज असते. बटाटा लागवड करतांना रात्रीचे तापमान 18 ते 20 डिग्री सेल्सीअसच्या खाली असणे महत्वाचे असते. साधारणतः ही वेळ 15-30 नोव्हेंबरच्या वेळेस असते. या वेळेस लागवड करण्यासाठी हिताचे ठरते. जेणेकरून वाढीसाठी २० ते २४ डिग्री सेल्सिअस आणि टयुबरलायझेन साठी 18 ते 20 डिग्री सेल्सिअस तापमान उपलब्ध असेल.

बीजप्रक्रिया:

बटाटा कंदाची साठवण कोल्ड स्टोरेज मध्ये केलेली असल्या कारणास्तव लागवड करण्यासाठी बटाटा कोल्ड स्टोरेज मधून कमीत कमी एक आठवडा बाहेर काढून ठेवावा साधारणतः 25 ते 40 ग्रॅम वजनाचा बटाटा कंद वापरणे लागवडीसाठी हिताचे असते परंतु 25 ते 40 ग्रॅम वजनाचा बटाटा कंद नसल्यास कंद आकाराने तसेच वजनाने मोठा कंदाचे दोन अथवा चार आकारानुसार किंवा वजनानुसार समान भागामध्ये कापणी करावी.

कापणी केल्यानंतर हवेतील रोगापासून संरक्षण करण्यासाठी लागवडीपूर्वी कंद एक किलो मॅन्कोझेब+4 ते 5 टाल्कम पावडर यांच्या मिश्रणाबरोबर सुकी प्रक्रिया करून घ्यावी (बटाटा संशोधन केंद्र डीसा, सरदार कृषी नगर दांतीवाडा कृषी विदयापीठ). रासायनिक प्रक्रिया नंतर (आठ तासानंतर), नत्रयुक्त घटकांच्या पूर्तीसाठी कंद 2.5 किलो अझोटोबॅक्टर आणि 500 मिली द्रव्यरूप अझोटोबॅक्टर प्रति 100 लिटर पाण्यामधून मिश्रण करून अर्ध्या तासासाठी बीज प्रक्रिया करावी (महात्मा फुले कृषी विदयापीठ, राहुरी).

खत व्यवस्थापन:

बटाटा पिकाच्या किफायतशीर उत्पादनासाठी जमीन तयार करतांना 25 ते 30 टन शेणखताची अथवा 1 ते 2 टन एरंडी पेंड किंवा 3 टन कोंबडी खत यापैकी जे उपलब्ध असेल याचा वापर करावा. बटाटा पिकाच्या अधिक उत्पादनासाठी विद्राव्य खतांची ठिबक पद्धतीने मात्रा दिल्यास खताची मात्रा बचत होऊन उत्पादनात देखील वाढ होते. बटाटा संशोधन केंद्र डीसा, सरदार कृषी नगर दांतीवाडा कृषी विदयापीठ शिफारसीनुसार 220 किलो नत्र, 110 किलो स्फुरद, 220 किलो पालाश प्रति हेक्टर ठिबक पद्धतीतून दयावेत पूर्ण नत्र आणि पालाश बटाटा लागवडीनंतर 9 दिवसांनी 63 दिवसांपर्यंत 7 दिवसांच्या अंतराने ठिबक मधून दयावे (समान 9 वेळेस) तसेच स्फुरद पायाभूत स्वरूपात दयावे. जर ठिबक सिंचन उपलब्ध नसेल तर महात्मा फुले कृषी विदयापीठ, राहुरीच्या शिफारशीनुसार बटाटा लागवडीपूर्वी 100 किलो नत्र, 60 किलो स्फुरद आणि 120 किलो पालाश प्रति हेक्टरी दयावे 50 किलो नत्र भर लावतांना दयावे (30 ते 40 दिवसानंतर) खतांची मात्रा परिस्थितीनुसार वेगवेगळी असू शकते.

पाणी व्यवस्थापन:

ठिबक पद्धतीने पाणी व्यवस्थापन केल्यास प्रति तासासाठी चार लिटर पाणी बाहेर पडत असलेल्या ड्रीपरचा वापर करणे आवश्यक आहे. तसेच, दोन लॅटरल मधील अंतर दोन फुट ठेवणे आवश्यक असते. डिसेंबर-जानेवारी महिन्यामध्ये तापमान फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत कमी असते म्हणून दिवसासाठी या महिन्यादरम्यान 45 मिनिट ठिबक चालू ठेवावे तसेच फेब्रुवारी महिन्यात 60 मिनिटे ड्रिप चालू ठेवावे. ठिबक पद्धतीची उपलब्धता नसल्यास माध्यम काळी पोयटायुक्त जमीन असल्यास 8 ते 9 दिवसाच्या अंतराने एकूण आठ ते दहा पाण्याची जरुरी असते. परंतु जमीनीत रेती मिश्रित कणांची मात्रा जास्त असल्यास पाच ते सात दिवसाच्या अंतराने एकूण 14 ते 15 पाण्याची गरज असते जास्त पाणी साठल्यास मुळांची कूज होऊन बुरशीनाशक रोगांचा प्रादुर्भाव होण्याचा धोका असतो (बटाटा संशोधन केंद्र डीसा, सरदार कृषी नगर दांतीवाडा कृषी विदयापीठ).

बटाटा पिकामध्ये ३० ते ४० दिवसांनी बटाटा कंदाची वाढ आणि विकास अवस्था सुरु होते म्हणून तणनियंत्रणासाठी खुरपणी करणे, वखरणी करणे सोयीस्कर नसते.

पिक संरक्षण:

बटाटा पिकांमध्ये रसशोषक किडी, स्पोडोप्टेरा अळी इ. किडींचा प्रादुर्भाव आढळतो. रस शोषक किडींच्या नियंत्रणासाठी बटाटा मुख्य पिकाच्या बॉर्डरवर मका पिकाची लागवड करावी. जेणेकरून, या पिकाचा सापळा पिकासारखा उपयोग होऊ शकतो. बटाटा पिकांमधील रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी प्रति हेक्टर 40 चिकट सापळे (स्टिकी ट्रॅप) लावावेत. लागवडीनंतर महिन्याच्या अंतराने निंबोळी तेल 5 मि.ली प्रति लिटर पाणी तसेच गोमूत्र फवारणी करत रहावे. रासायनिक नियंत्रण इमिडाक्लोप्रिड 17.8 एस. एल. 0.5 मिली प्रति लिटर पाणी.

स्पोडोप्टरा अळी नियंत्रण करवी रात्रभर गवताचे ढीग पिकात ठेवून सकाळी अळ्यांसह नष्ट करावेत. 4 ते 5 पक्षी थांबे प्रति एकरी करावेत. 5 ट्रायकोकार्ड प्रति हेक्टरीसाठी वापरावे. रासायनिक नियंत्रण करवी 20 मिली क्विनॉलफॉस 10 लिटर पाण्यामधून फवारणी करावी (बटाटा संशोधन केंद्र डीसा, सरदार कृषी नगर दांतीवाडा कृषी विदयापीठ). बटाटामध्ये स्कॅब, लवकर तसेच उशिरा येणारा करपा या रोगांचा प्रादुर्भाव प्रामुख्याने आढळतो. करपा नियंत्रण करवी पिकांची फेरपालट करावी. बटाटा पिकाच्या काढणीनंतर खोल नांगरणी करून जमीन तापवून दयावी.

ट्रायकोडर्मा व्हिरीडी प्रति हेक्टर 5 किलो लागवडीच्या वेळी सेंद्रिय खतामधून द्यावी. रासायनिक नियंत्रण करवी मॅन्कोझेब 30 ग्रॅम किंवा 30 ग्रॅम कॉपर ऑक्झीक्लोराईड प्रति 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी. रोगांचे लक्षणे दिसण्याच्या तीव्रतेवरून फवारणी मात्रा निश्चित करावी किंवा 5 टक्के हेक्साकोनॅझोन 0.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून पंधरा दिवसाच्या अंतराने लक्षणे दिसण्याच्या त्रीवतेवरून फवारण्या कराव्यात. स्कॅब नियंत्रण करवी ठिबक पद्धतीने पाण्याचे व्यवस्थापन करावे एकाच जमिनीमध्ये वारंवार बटाटा पीक घेऊ नये. बिजप्रक्रिया करवी 3 टक्के बोरिक एसिड (30 ग्रॅम प्रति लिटर पाणी) अर्धा तास कंदाची बुडवणी करावी.

महत्वाच्या बातम्या –

कांदा खाण्याचे हे आहेत आरोग्यदायी फायदे…

कांद्याच्या खरेदी विक्रीसाठी सुट्टीच्या दिवशी बाजार समित्यांचे व्यवहार सुरु

शेतकऱ्याने अंगातील बनियन काढून वाचवला रेल्वेचा अपघात

जाणून घ्या; पाणी कसं आणि केव्हा प्यावं?