सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून तालुक्यातील शाळांचा विकास साधणार – दादाजी भुसे

मालेगाव – असंख्य चिमुकल्यांच्या डोळ्यात असलेल्या भविष्याचा दुर्दम्य इच्छाशक्तीचे प्रेरणास्थान असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळांचा सामाजिक दायित्व निधीतून विकास साधतांना विलक्षण आनंद होत असून तालुक्यातील सर्व शाळांचा या माध्यमातून विकास साधण्यात येईल असे प्रतिपादन राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केले.

सिंजेंटा इंडीया लि. या कंपनीच्या सामाजिक दायित्व निधीतून साकारण्यात आलेल्या तीन जिल्हा परिषद शाळांचे लोकार्पण कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी मंत्री श्री.भुसे बोलत होते. यावेळी सिजेंटा कंपनीचे पी.एस.जगदिशा, संजय पवार, भगवानराव कापसे, बाजार समितीचे सभापती राजेंद्र जाधव, उपसभापती सुनिल देवरे, गट विकास अधिकारी जितेंद्र देवरे, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे, नायब तहसिलदार विकास पवार यांच्यासह निळगव्हाण, हाताणे व जळकू या ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, पंचायत समिती व जिल्हा परिषदेचे सदस्यांबरोबर सर्व शाळांचे शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलतांना मंत्री श्री.भुसे म्हणाले, गोरगरिबांची मुले ही जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेत असतात. जिल्हा परिषदेच्या शाळांच्या खोल्यांची दयनिय अवस्था पाहून त्यांना उभारी देण्याच्या उद्देशाने, सामाजिक दायित्व निधीतून त्यांचा विकास साधण्याचे ध्येय ठरविले होते. गतवर्षी निळगव्हाण, हाताणे व जळकू येथील नुतन इमारतींचे भुमीपूजन करण्यात आले होते, आणि आज त्याच शाळांच्या भव्य इमारतींचे लोकार्पण करतांना आनंद होत असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. या शाळांच्या नवीन इमारतींची देखभाल राखण्याची जबाबदारी शिक्षकांसोबतच सर्व ग्रामस्थांनी पार पाडावी असे आवाहन मंत्री श्री.भुसे यांनी यावेळी केले.

ज्ञानगंगेचे पावित्र्य राखण्यासाठी मदत करा

जिल्हा परिषदेच्या शाळा ह्या ग्रामीण भागातील चिमुकल्यांना ज्ञानाच्या महासागरापर्यंत घेऊन जाणाऱ्या ज्ञानगंगेचे उगमस्थान आहे. लहान बाळांच्या चिमुकल्या पंखात आसमान भरारीचे वेड लावणारे हे शक्तीस्थान आहे आणि आपण सगळेच ज्याच्या छत्रछायेत राहून ज्ञानामृताचे घोट घेत येथवर येऊन पोहचलो, अशा आपल्या सगळ्यांचे हे श्रध्दास्थान असून या ज्ञानगंगेचे पावित्र्य राखण्यासाठी सर्व गावकऱ्यांनी मदत करावी. जो कोणी या ज्ञानगंगेचे पावित्र्य राखणार नाही, त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराही मंत्री श्री.भुसे यांनी यावेळी दिला.

डिजीटल व ई-लर्निंग साठी लोकसहभागातून आजपर्यंत चांगला प्रतिसाद मिळाल्याचे सांगतांना मंत्री श्री.भुसे म्हणाले, कोरोनाच्या संकटकाळात ऑनलाईन शिक्षण घेत असतांना विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात मोबाईलचा वापर झाल्यामुळे त्यांची नेत्र तपासणीसाठी विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. आणि या मोहिमेतून ज्या विद्यार्थ्यांमध्ये नेत्र दोष आढळून येईल अशा विद्यार्थ्यांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून त्यांना सिएसआर निधीच्या माध्यमातून मोफत चष्मा घरपोच पुरविण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

शाळा सुरू होत असतांनाच नुतन शाळांचे लोकार्पण हा चांगला योग जुळून आल्याचे सांगतांना सिंजेंटा कंपनीचे पी.एस.जगदिशा म्हणाले, सामाजिक बांधिलकी जपतांना मनस्वी आनंद होत आहे. यापुढेही ग्रामीण भागातील विकास कामांसाठी आमचे योगदान देऊ असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

सिंजेंटा कंपनीचे संजय पवार म्हणाले, सामाजिक दायित्व निधीतून वास्तु उभारण्यात आली असली तरी त्याचे जतन करा. ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या शिक्षकांना खुप महत्व असल्याची भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

महत्वाच्या बातम्या –