अत्याधुनिक सेवा सुविधांच्या उपलब्धीसह लोकाभिमूख गतीमान प्रशासनावर भर – अशोक चव्हाण

नांदेड – प्रशासकीय सोईच्या दृष्टीने अनेक नानाविध तंत्रज्ञानावर आधारित माध्यमे विकसीत झाली आहेत. या माध्यमांचा जिल्ह्यातील प्रशासनाला लोकाभिमूखतेची जोड देऊन सर्वसामान्यांचे प्रश्न तात्काळ मार्गी लागावेत यावर आम्ही भर दिला आहे. जिल्ह्याच्या विकासाला लोकप्रतिनिधींच्या सहमतीतून ज्या सभागृहात नियोजनाचा आराखडा तयार केला जातो त्या सभागृहालाही आता अत्याधुनिक माध्यम व तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यामुळे नांदेड जिल्ह्याच्या वैभवाला नवी जोड मिळाल्याचे गौरोद्गार राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी काढले.

जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात जिल्ह्यातील 5 नगरपरिषदांना सुसज्ज अग्निशमन दल वाहनाचे हस्तांतरण, डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथील मुख्य सभागृहात उभारण्यात आलेल्या नवीन भव्य डिजिटल एलईडी डिस्पलेचे अनावरण, ग्रीन जिमचे उद्घाटन, श्री गुरु गोबिंदसिंघजी जिल्हा रुग्णालय नांदेड येथे आरोग्य विभागाच्या 10 रुग्णवाहिकेचे लोकार्पण, जिल्हा क्रीडा संकुल येथील बॅटमेंटन कोर्टचे उद्घाटन, नांदेड वाघाळा शहर मनपाच्या स्टेडिअम परिसरातील बॅटमेंटन कोर्टचे उद्घाटन आणि क्लब रोडच्या सुशोभिकरणाचे लोकार्पण आज पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, महापौर जयश्री पावडे, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार राजेश पवार, आमदार जितेश अंतापूरकर, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांची प्रमुख उपस्थिती होती.

नांदेड जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी आपण कटिबद्ध असून प्रशासकीय सेवा सुधारण्यासमवेत आरोग्याच्या सेवा-सुविधा पर्यंत याचबरोबर चांगले निकोप आरोग्य प्रत्येकाला लाभावे, युवकांना विविध खेळांच्या सरावासाठी दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात यावर मी अधिक भर दिला असल्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. जिल्हा क्रीडा संकुल परिसरातील बॅडमिंटन व टेनिस कोर्टचे हे सर्व सुविधायुक्त दोन हॉल राष्ट्रीय पातळीवरील नवीन खेळांडू घडवतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

नांदेड जिल्ह्याचे पॅरानॅशनल चॅम्पियम बॅडमिंटन स्पर्धेमध्ये नाव उज्ज्वल करणाऱ्या लता उमरेकर हिचा यावेळी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सत्कार केला. उत्तराखंड येथे सन 2019 मध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत लता उमरेकर हिने सिलव्हर मेडल प्राप्त केले आहे. यावेळी महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे सभापती विरेंदरसिंघ गाडिवाले, महिला व बालकल्याण शिक्षण सभापती संगिता पाटील-डक, नगरसेवक मुन्तजिबोद्दीन, दुष्यंत सोनाळे, नागनाथ गड्डम, विजय येवनकर आदी मान्यवर उपस्थित होते.

नांदेड जिल्ह्यातील विविध आरोग्य संस्थाना या नवीन 10 रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या जात आहेत. यात  उपजिल्हा रुग्णालय मुखेड, देगलूर,  गोकुंदा, ग्रामीण रुग्णालय बारड, अर्धापूर, भोकर, नायगाव, माहूर तर किनवट तालुक्यातील सारखणी व बोधडी येथील आश्रम शाळा यांचा समावेश आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत कोविड-19 च्या रुग्णांसह जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमामध्ये रेफरल ट्रान्सपोर्ट कार्यालयामार्फत माता मृत्यू व बाल मृत्यू कमी करण्यासाठी गरोदर माता आणि आजारी बालकांना मोफत वाहन संदर्भ सेवा उपलब्ध करून देणे, गरोदर मातांना मोफत सोनोग्राफी तपासणीसाठी वाहन पुरविणे, संपूर्ण लसीकरणाचे उद्दिष्टे साध्य करण्यासाठी कमीत कमी वेळात सर्व केंद्राना लसीकरणाचा साठा पोहचविणे नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील, दुर्गम व पहाडी परिसरात तसेच जंगल परिसरात रुग्णांना विविध रुग्ण सर्वेक्षण करण्यासाठी तात्काळ वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी या दृष्टीकोनातून या शासकीय रुग्णवाहिका उपयोगात आणल्या जाणार असल्याचे आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले.

जिल्ह्यातील 5 नगरपरिषदांना नवीन अग्निशमन दलाची वाहनांची चाबी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी संबंधित नगरपरिषदांच्या अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांना सुपूर्द केल्या. या नगरपरिषदांमध्ये मुदखेड, धर्माबाद, बिलोली, कुंडलवाडी, अर्धापूर यांचा समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या –