अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाची मदतीची भूमिका – जयंत पाटील

सांगली – सांगली जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे वाळवा, तासगाव, पलूस, खानापूर, आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, तासगावचा पूर्व भाग या सर्व ठिकाणी शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. विशेषत: द्राक्षबागेचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातात आलेल्या द्राक्षबागा गेलेल्या आहेत. यांचा पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत. पंचनामे सुरू आहेत. शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. कृषि आयुक्त व जिल्ह्यातील कृषि अधिकारी यांनी स्वत: जिल्ह्यातील विविध ठिकाणी भेटी देवून झालेल्या नुकसानीची पहाणी केली आहे. नुकसान प्रचंड आहे, शेतकरी उध्वस्त झाला आहे. अशावेळी शेतकऱ्यांना मदतीचीच भूमिका राज्य शासनाची राहील, असे आश्वासन जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि पालकमंत्री जयंत पाटील यांनी अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिले.

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या द्राक्ष शेतीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी तासगाव तालुक्यातील मणेराजुरी, निमणी, नेहरूनगर, येळावी येथे पहाणी केली. यावेळी सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, कृषि आयुक्त धीरजकुमार, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, कृषि संचालक (फलोत्पादन) कैलास मोते, कोल्हापूर विभागाचे कृषि सहसंचालक उमेश पाटील, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार वेताळ, तासगाव तहसिलदार रवी रांजणे, जिल्हा परिषद कृषि विकास अधिकारी विनायक पवार, तासगाव तालुका कृषि अधिकारी सर्जेराव अमृतसागर, रोहित आर.आर. पाटील आदि उपस्थित होते.

पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या भागाचे पंचनामे सुरू असून येत्या दोन चार दिवसात पंचनामे पूर्ण होतील. यातून नुकसानीची अचूक माहिती मिळेल. त्यानुसार राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा विषय सादर करून शेतकऱ्यांना नुकसानीची मदत देण्यासाठी शासन स्तरावरून मदत देण्याची सकारात्मक भूमिका घेतली जाईल, असे ते म्हणाले.

सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, वातावरणाचा फटका बहुतांशी वेळी शेतीला बसतो. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. या अडचणी प्रसंगी शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करील. तथापी, शेतकऱ्यांना विमा योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत होईल यासाठी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पीक विमा धोरणात बदल करण्याबाबत शासनस्तरावर प्रयत्न केले जातील. तसेच कृषि विभागाच्या माध्यमातूनही शेतकऱ्यांचे पंचनामे तातडीने पूर्ण करून जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळेल यासाठी प्रयत्न केले जातील.

यावेळी पालकमंत्री जयंत पाटील, सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, कृषि आयुक्त धीरजकुमार यांना द्राक्ष बागायतदार संघाने विविध मागण्यांची निवेदने सादर केली. यावेळी प्रामुख्याने शेडनेट शेतीसाठी राज्य शासनाकडून मदत व्हावी तसेच राज्यस्तरावर औषध विक्रीबाबत व त्यांच्या योग्य किंमतीबाबत धोरण ठरविण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. यावेळी कृषि आयुक्त धीरजकुमार यांनी शेडनेट शेतीसाठी कृषि विभाग शासन स्तरावर धोरण तयार करत असून हे धोरण शासनास सादर करण्यात येईल. राज्य शासन याबाबत निर्णय घेवून शेडनेट शेतीसाठी सबसिडी उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घेईल. त्याचबरोबर नकली औषधांचे नमुने सादर करावेत. याबाबत संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल.

जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार वेताळ यांनी अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या व सध्या सुरू असलेल्या पंचनामा, उपाययोजना याबाबत माहिती सादर केली.

महत्वाच्या बातम्या –