वैजापूर येथे मका पिकावरील लष्करी अळीची कृषी विभागातर्फे विद्यापीठातील शास्त्रज्ञांकडून पाहणी

मका पिकावर नवीन अमेरिकन लष्करी अळीचे गंभीर संकट उद्भवल्याने जगभरात मका उत्पादक देश संकटात सापडले आहेत. मागील वर्षी मक्यावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव कर्नाटकात आढळला होता. यंदा खरीप हंगामात महाराष्ट्रात मका पिकावर लष्करी अळी थैमान घालील, असा इशारा कृषी विद्यापीठ व कृषी विभागाने दिला होता.

औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्‍यांतर्गत येत असलेल्या लोणी बु. व सवंदगाव शिवारातील लष्करी अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याचे कृषी विभागाच्या निदर्शनास आले होते. हा धोका विस्तारू नये, यासाठी नेमक्‍या काय उपाययोजना कराव्या, यासाठी शेतकरी व कृषी विभागाच्या गाव पातळीवरील कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन व्हावे, कृषी विभागातर्फे  गुरुवारी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी पाहणी केली.

अनुकूल हवामान, लागवडीतील प्रयोगशीलता आणि नवीन तंत्रज्ञानामुळे औरंगाबाद जिल्हा राज्यात मका उत्पादनात ‘नंबर वन’ ठरला आहे. यंदा खरीप हंगामात २ लाख ३९ हजार हेक्टरवर मका लागवड प्रस्तावित आहे. यामुळे सर्वांचे या जिल्ह्यावर लक्ष टिकून राहिले आहे. ७ जून व ११ जून रोजी मक्याची लागवड झालेल्या शेतात अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे.

मका पिकावरील लष्करी अळीच्या (फॉल आर्मी वर्म) आक्रमणाची वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांच्या चमूने गुरुवारी (ता. २७) पाहणी केली. पाऊस हा अळीच्या नियंत्रणात हातभार लावेल. मात्र त्यावरच विसंबून न राहता करावयाच्या उपाययोजनांविषयी तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

औरंगाबाद येथील राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे प्रमुख व सहयोगी संचालक संशोधन डॉ. एस. बी. पवार यांच्या नेतृत्वात कीटकशास्त्रज्ञ डॉ. एन. आर. पतंगे, डॉ. गजेंद्र जगताप यांच्या शास्त्रज्ञांमध्ये समावेश होता. त्यांनी गुरुवारी मका पिकाची पाहणी केली. या पाहणीत बीज प्रक्रिया न केलेल्या बियाण्याचा वापर पेरणीसाठी केल्याचे शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीतून समोर आले.

वैजापूर तालुक्‍यात जवळपास ३० हजार हेक्‍टरवर मक्याचे क्षेत्र असते. बीज प्रक्रिया केलेल्या बियाण्याचा वापर केल्यास लागवडीनंतर सुमारे २० दिवसांपर्यंत मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव होत नाही. शेतकऱ्यांनी मका पिकावर या अळीचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन अधिक सजगपणे पिकाच्या व्यवस्थापनाकडे लक्ष देण्याची गरज  डॉ. पवार यांनी व्यक्‍त केली. कीटकशास्त्रज्ञ डॉ. पतंगे यांनी प्रादुर्भावाचा परिणाम, अळ्यांची अवस्था, पाऊस लक्षात घेऊन करावयाच्या उपाययोजनांची माहिती शेतकऱ्यांना दिली.

तसेच तज्ज्ञांनी शिफारस केलेल्या कीटकनाशकांची फवारणी करा, पिकात पक्षिथांबे उभारा, पिकाचे निरीक्षण करताना आढळून आलेल्या मोठ्या अळ्या नष्ट करा असा उपाय सुचविला आहे.

महत्वाच्या बातम्या –

भेंडी लागवड पद्धत

हे केले तरच मूग लागवडीचा होणार फायदा