Share

संपूर्ण लसीकरणासाठी मोहिमेत सातत्य राखा – यशोमती ठाकूर

Published On: 

अमरावती – राज्यात कोरोनाच्या उत्परिवर्तित ओमायक्रॉन विषाणूचे आढळलेले रुग्ण, मंगळवारी जिल्ह्यात आढळलेले नवे 9 कोरोनाबाधित लक्षात घेता सर्वत्र सतर्कता बाळगण्याची गरज असून, नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज केले. प्रशासनाने मोहिमेद्वारे लसीकरणाला वेग दिला. तथापि, प्रत्येक पात्र व्यक्तीचे लसीकरण होण्यासाठी मोहिमेचा वेग व सातत्य राखण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी प्रशासनाला दिले.

भीती नको; पण दक्षता बाळगावी

महाराष्ट्रात कोरोनाच्या उत्परिवर्तित ओमायक्रॉन विषाणूचे रूग्ण आढळले. अमरावती महापालिका क्षेत्रात मंगळवारी नव्याने नऊ कोरोनाबाधित आढळले. या पार्श्वभूमीवर अधिक सतर्कता बाळगण्याची गरज असल्याचे श्रीमती ठाकूर यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, कोविड साथीचे प्रमाण घटल्याने जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी मिशन बिगेन अगेनअंतर्गत विविध बाजारपेठा, व्यवहार यांना परवानगी देण्यात आली. तथापि, धोका अजूनही टळलेला नाही. त्यामुळे गाफिल राहून चालणार नाही. गत साथीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सुसज्ज करण्यात आली आहे. भीती नको; पण दक्षता बाळगावी. प्रत्येकाने मास्क, सोशल डिस्टन्स व सॅनिटायझरचा वापर या त्रिसूत्रीचे पालन केले पाहिजे.

एकही पात्र व्यक्ती लसीकरणापासून वंचित राहता कामा नये

जिल्ह्यात लसीकरणाला वेग देण्यासाठी सर्व विभागांच्या समन्वयातून मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत साडेसहा लाख नागरिकांचे लसीकरण झाले. मोहिमेत लसीकरणाच्या प्रमाणात वाढ झाली असली तरी लसीकरणाचे संपूर्ण उद्दिष्ट पूर्ण होणे गरजेचे आहे. लसीकरणाचा वेग कायम राखला तरच संपूर्ण लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य करणे शक्य होईल.  लसीकरणाची दुसरी मात्रा घेतलेल्या नागरिकांचे प्रमाण अद्याप 35 टक्के एवढे आहे. हे कमी प्रमाण पाहता कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन अत्यंत गरजेचे आहे. त्याचप्रमाणे, 18 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण व्हावे. ज्या नागरिकांनी अद्यापही लस घेतली नाही किंवा दुसरी मात्रा घेतलेली नाही, त्यांनी तत्काळ आपले लसीकरण करून घ्यावे व स्वत:सह इतरांनाही सुरक्षित करावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.

लसीकरणाला गावोगाव वेग देतानाच विविध माध्यमांतून प्रभावी जनजागृती व लोकशिक्षणाची जबाबदारीही विविध विभागांनी समन्वयाने पार पाडावी, असेही निर्देश त्यांनी दिले.

त्या पुढे म्हणाल्या की, कोरोनाकाळात विविध क्षेत्रांना अडचणींना सामोरे जावे लागले. शासन व प्रशासनाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनी साथ नियंत्रणात आली. त्यामुळे जनजीवन पूर्वपदावर आले आहे. आता पुन्हा साथ वाढता कामा नये.  कोविड अनुरूप जीवनशैलीचा अवलंब प्रत्येकाने केला पाहिजे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.

महत्वाच्या बातम्या – 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
बातम्या (Main News) राजकारण (Politics)

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon

🕘 संबंधित बातम्या