कपाशी पिकामध्ये गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे मोठे नुकसान होते, तर मग करा ‘हे’ उपाय

मालेगाव – ऑक्टोबर महिन्यातील वातावरण हे शेंदरी बोंडअळी (गुलाबी बोंड) अळीच्या वाढीस पोषक आहे. गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने डॉ.पंजाबराव कृषी विद्यापीठ आकोला यांच्या 17 ऑक्टोंबर 2020 च्या कपाशी वरील गुलाबी बोंड अळीचे नियंत्रणासाठी प्राप्त झालेल्या अहवालाप्रमाणे उपविभागातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापूस पिकाचे नियमित सर्वेक्षण करुन खालील प्रमाणे उपाय योजना करण्याचे आवाहन उप विभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे यांनी केले आहे.

फेरोमोन सापळ्याचा वापर करावा. यासाठी एकरी दोन किंवा हेक्टरी पाच फेरोमोन सापळे लावावे. सतत तीन दिवस या सापळ्यामध्ये आठ ते दहा पतंग आढळल्यास गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनाचे उपाय योजावे. फुलावस्थेत दर आठवड्याने पिकामध्ये मजुरांच्या सहायाने डोमकळ्या (गुलाबी बोंडअळी ग्रस्त फुले) शोधून नष्ट कराव्या. 5 टक्के निंबोळी अर्क किंवा अॅझॉडिरेक्टीन 0.03 (300 पी.पी.एम) 50 मी.ली. किंवा 0.15 टक्के (1500 पी.पी.एम.) 25 मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

प्रत्येक आठवडयाला एकरी शेतीचे प्रतिनीधीत्व करतील अशी 20 झाडे निवडून निवड केलेल्या प्रत्येक झाडावरील मध्यम पक्व झालेल्या बाहेरुन किडके नसलेले एक बोंड असे 20 बोंडे तोडून ते भुईमुगाच्या शेंगाप्रमाणे दगडाने टिचवून त्यामधील किडके बोंड व अळ्याची संख्या मोजून ती दोन किडकी बोंड किंवा दोन पांढुरक्या / गुलाबी रंग धारण करीत असलेल्या अळ्या आढळल्यास आर्थिक नुकसान पातळी (5 ते 10 टक्के) समजून खालीलप्रमाणे रासायनिक किटकनाशकाची फवारणी करावी. थायोडीकार्ब 75 टक्के, डब्ल्युपी 25 ग्रॅम किंवा क्विनॉलफॉस 25 टक्के, एएफ 25 मिली किंवा क्लोरपायरीफॉस 25 टक्के, प्रवाही 25 मिली किंवा प्रोफेनोफॉस 50 टक्के, 30 मि.ली. किंवा इंडोक्साकार्ब 15.8 टक्के, 10 मि.ली. किंवा डेल्टामेथ्रीन 2.8 टक्के, 10 मि.ली. या पैकी कोणतेही एक किटकनाशक प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

जेथे प्रादुर्भाव 10 टक्केच्यावर आहे अशा ठिकाणी आवशकतेनुसार प्रादुर्भाव पुढे वाढू नये म्हणून खालील पैकी कोणत्याही एका मिश्र किटकनाशकाची 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. यामध्ये ट्रायझोफॉस 35 टके + डेल्टामेथ्रीन 1 टक्के, 17 मि.ली. किंवा क्लोरॅट्रानिलीप्रोल 9.3 टक्के + लॅब्डासायहॅलोथ्रीन 4.6 टक्के 5 मिली किंवा क्लोरपायरीफॉस 50 टक्के + सायपरमेथ्रीन 5 टक्के, 20 मि.ली. किंवा इंडोक्झाकार्ब 14.5 टक्के + ॲसीटामाप्रिड 7.7 टक्के 10 मि.ली. किटकनाशकाची 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

शेतकरी बांधवांना वरील उपाययोजनांबाबत अडचण अथवा मार्गदर्शन हवे असल्यास उपविभागातील क्षेत्रीय स्तरावरील कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असेही उपविभागीय कृषी अधिकारी  देवरे यांनी शासकीय प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापनाबाबत जनजागृती मोहिम मालेगांव उपविभागातील मालेगांव तालुक्यातील 22,133 हेक्टर, सटाणा तालुक्यातील 166 हेक्टर तर नांदगांव तालुक्यातील 8,275 हेक्टर लागवडीखालील क्षेत्र असुन कापुस पिकावरील किड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्पांतर्गत तालुका निहाय शेतकरी मेळावे घेण्यात येवून कृषी संजीवनी सप्ताहात (1 ते 7 जुलै कालावधीत) किड व रोग बंदोबस्ताबाबत मार्गदर्शन करण्यात आलेले आहे.

उपविभागातील मालेगांव, सटाणा व नांदगांव तालुक्यात 217 कापूस उत्पादक गावांमध्ये बैठका घेण्यात येवून 1,812 घडी पत्रीकांचे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलेले आहे. कपाशी बोंडअळी व्यवस्थापनासाठी कृषी विभाग महाराष्ट्र शासन व बियाणे उत्पादक कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने चित्ररथाद्वारे मालेगाव व नांदगांव तालुक्यांमध्ये प्रचार प्रसिध्दी करण्यात आलेली आहे. तरी देखील सद्यस्थितीत ऑक्टोंबर महिन्यातील वातावरण हे शेंदरी बोंडअळी (गुलाबी बोंडअळी) च्या वाढीस पोषक असल्याने वरीलप्रमाणे उपाययोजना करण्याचे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी देवरे यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या-