पहिल्या टप्प्यात ३४ लाख शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी; २९ हजार कोटींची कर्जमाफी

ठाकरे सरकारने जाहीर केलेल्या कर्जमुक्ती घोषणेच्या पहिल्या टप्प्यात जिल्हा बँका आणि व्यापारी बँका यांच्याकडील ३४ लाख पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करून त्यांना २९ हजार ७१२ कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाईल, असे सहकार विभागातील एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

देवेंद्र फडणवीस सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेत कुटुंबातील एकाच व्यक्तीला कर्जमाफीचा लाभ दिला जात होता. ठाकरे सरकारने मात्र कुटुंबातील एकापेक्षा अधिक थकबाकीदारांचाही या योजनेत समावेश केला आहे. त्यामुळे या योजनेची व्याप्ती वाढणार असून जास्तीतजास्त शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात हा निर्णय जाहीर करण्यात आला. या योजनेअंतर्गत चुकीच्या व्यक्तींना कर्जमाफीचा लाभ होऊ नये यासाठी जिल्हा बँका आणि व्यापारी बँकांकडील थकबाकीदार शेतकऱ्यांची कर्जखाती आधार कार्डशी संलग्न करून खात्री करण्यात येत आहे.

तर व्यापारी बँकांकडील कर्जखात्यांची तपासणी ही कोअर बँकिंग यंत्रणेद्वारे करण्यात येणार आहे. त्यानंतरही योजनेअंतर्गत एखाद्या अपात्र व्यक्तीला कर्जमाफीचे लाभ दिले गेल्याचे आढळून आल्यास त्याला संबंधित बँकेला जबाबदार धरले जाणार आहे.

पहिल्या टप्प्यात जिल्हा बँका आणि व्यापारी बँकांकडील ३४ लाख पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात येत आहे. संबंधित शेतकऱ्यांना २९,७१२ कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाईल, असे सूत्रांनी सांगितले. येत्या १५ फेब्रुवारीला पात्र शेतकऱ्यांच्या याद्या गावपातळीवर प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. त्यानंतर आपले सरकार सेवा केंद्रे आणि सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानांमध्ये बोटांचे ठसे घेऊन शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण केले जाणार आहे.

तसेच एखाद्या शेतकऱ्याच्या कर्जखात्यासंदर्भात काही त्रुटी आढळल्यास त्या दूर करून संबंधितांना योजनेचा लाभ दिला जाणार आहे. येत्या मे महिन्याअखेर जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र प्रत्येक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. तसेच या योजनेअंतर्गत ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत दोन लाख रुपये थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांची कर्जे माफ होणार आहेत.

महत्वाच्या बातम्या –

सहकारी गृहनिर्माण संस्थांचे कामकाज अधिक सुलभ आणि पारदर्शक – सुभाष देशमुख

कर्जमुक्ती योजनेच्या व्हिडिओतील छेडछाडीची शासनाकडून गंभीर दखल; चौकशीचे आदेश

नाशिकमध्ये द्राक्षउत्पादकांची अडीच कोटींची फसवणूक

राज्यात सहा हजार टँकर्सद्वारे साडेपंधरा हजार गावांना पाणी