बचत गटाच्या माध्यमातून महिलांमध्ये वित्तीय साक्षरता – यशोमती ठाकूर

अमरावती – बचत गटांमुळे महिला सक्षम बनत असून त्यांच्यामध्ये वित्तीय साक्षरताही वाढत आहे. महिलांना बचत गटांसाठी सुलभ कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रचा पुढाकार प्रशंसनीय असल्याचे गौरवोद्गार पालकमंत्री ॲङ यशोमती ठाकूर यांनी काढले.

संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे बँक ऑफ महाराष्ट्र व महिला आर्थिक वितरण महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महिला बचत गटांना उद्योग निर्मितीसाठी कर्ज वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी श्रीमती ठाकूर बोलत होत्या.

महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, प्रकल्प संचालक प्रिती देशमुख, बँक ऑफ महाराष्ट्र अमरावती झोनचे अंचल प्रबंधक राहूल वाघमारे, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे, जितेंद्रकुमार झा आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

महिला बचत गटांना स्वयंपूर्ण बनवून त्यांना सहज भांडवल उपलब्ध व्हावे यासाठी बॅंक ऑफ महाराष्ट्रने कर्ज वितरणाची प्रक्रिया सुलभ केली आहे, असे सांगून श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, बचत गटांच्या माध्यमातून आत्मनिर्भर होण्यासाठी महिला पुढाकार घेत आहेत. ही बाब कौतुकास्पद आहे. कोविडच्या काळात महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांनी घरुनच मास्क बनविणे, सॅनिटायझर तसेच खाद्य पदार्थ आदींची निर्मिती केली. त्यांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. यामुळे बचत गटातील महिलांचेही मनोबल वाढले. जागतिक बँकेनेही महिला बचत गटांच्या कार्याची नोंद घेतली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रमुळे आज 582 महिला बचत गटांना 8 कोटी 13 लक्ष रुपयांचे कर्ज वितरण करण्यात येत आहे. यापासून प्रेरणा घेऊन इतर महिलांनीही बचत गटांमध्ये सहभागी होऊन आर्थिक स्वावलंबी बनण्यासाठी प्रयत्न करावे. प्रशासनामार्फत आपल्याला सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही  त्यांनी यावेळी दिली.

जिल्ह्यात एकूण 1475 महिला बचत गट कार्यरत आहेत. या बचत गटांच्या सक्षमतेसाठी लवकरच गोट बँक प्रस्तावित करण्यात येणार आहे. काही ठिकाणी गोट बँक ही संकल्पना यशस्वी ठरली आहे. त्याच धर्तीवर आपल्या जिल्ह्यातही ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यास आपोआपच समाजही सक्षम होतो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या सहकार्याने स्वयंसहाय्यता गट नव्या प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. बँक ऑफ महाराष्ट्र प्रमाणेचे इतर बँकांनीही महिला बचत गटांना सुलभ कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी पुढाकार घ्यावा. व सामाजिक बांधिलकी जोपासत महिलांना त्यांच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत करावी, असे आवाहन श्रीमती ठाकूर यांनी यावेळी केले.

महिला बचत गटांना  मान्यवरांच्या हस्ते यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात धनादेशाचे वाटप करण्यात आले. माहुली जहागीर येथील विठ्ठल स्वयंसहाय्यता बचत गट, मासोद तपोवन येथील अल्मिरा अल्पसंख्यांक बचत गट, राजकमल चौक येथील अलिना महिला बचत गट, लोणी काकडी येथील रुख्मिणी महिला बचत गट, थूगाव पूर्णानगर येथील प्रेरणा महिला बचत गट आदींना यावेळी धनादेशाचे वाटप करण्यात आले.

जिल्ह्यातील एकही नागरिक कोरोना लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी प्रशासनामार्फत प्रभावीपणे लसीकरण मोहिम सर्वत्र राबविल्या जात आहे. याचाच एक भाग म्हणून आज कार्यक्रमस्थळीही कोविड लसीकरण मोबाईल व्हॅन उपलब्ध करण्यात आली होती. ज्यांचे अद्याप लसीकरण व्हायचे होते, त्यांनी या सेवेचा लाभ घेतला.

श्रीमती ठाकूर यांनी महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाची पाहणी करुन खरेदीही केली. उत्पादित केलेल्या मालाची गुणवत्ता उत्तम असल्याचे सांगून त्यांनी बचत गटातील महिलांचे कौतुक केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहूल वाघमारे यांनी केले. तर संचालन निशा राऊत व आभार सुनील सोसे यांनी मानले.

महत्वाच्या बातम्या –