संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना बच्चू कडू यांनी दिला ‘हा’ मोठा सल्ला

बच्चू कडू

अमरावती : मागील दोन ते तीन वर्षांपासून संत्रा उत्पादनावर अवकळा दिसत आहे. परिणामी अपार कष्टातून हाती आलेले संत्रा पीक कोणत्या ना कोणत्या कारणाने निसटून जात आहे. पूर्वीच्या तुलनेत यंदा संत्रा फळ गळतीचे प्रमाण वाढत असल्याने वैतागलेले शेतकरी आता संत्रांच्या बागा उद्ध्वस्त करत आहेत. शेतकऱ्यांच्या समस्येवर योग्य नियोजन करण्यासाठी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी पुढाकार घेतला असून शासन, संशोधन व शेतकरी यांच्या समन्वयातून या संकटावर मात करण्यासाठी एका नियोजन आराखडा तयार करण्यात आल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे शेतकऱ्यांनी फळबागा उद्ध्वस्त न करता संयम ठेवावा! लवकरच नियोजन होईल असा विश्वास त्यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.

विदर्भाला कॅलिफोर्नियाची ओळख देणाऱ्या अमरावती जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर संत्रा उत्पादन करण्यात येते. जिल्ह्यातील चांदुरबाजार, अचलपुर, मोर्शी, वरूड व इतरही तालुक्यांमध्ये संत्रा उत्पादन घेतले जाते. संत्रा बहार आणि फळ धारणा झाली की, शेतकरी आर्थिक गुंतवणूक व अपार कष्ट करीत चांगल्या उत्पन्नाची आशा करीत असतात. मात्र, संत्रा पिक हाती येत असतांनाच कोणत्या ना कोणत्या रोगाचा प्रादुर्भाव आणि त्यामुळे संत्रा फळ गळती सुरू होते. काही प्रमाणात संत्रा गळती अपेक्षित असली तरी मागील दोन ते तीन वर्षांपासून वाढणारी फळगळती यंदा मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सर्व काही उपाय योजना करूनही फळ गळती सुरू असल्याने संतापलेल्या आणि हतबल झालेला शेतकरी वर्ग संत्राच्या बागा उद्ध्वस्त करीत आहे.

शेतकऱ्यांवर आलेल्या संकटाची दखल घेत दोन दिवसापूर्वी राज्यमंत्र्यांनी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची भेट घेत त्यांचेशी सकारात्मक संवाद साधला व लवकरच नियोजन आराखडा कार्यान्वित होईल असे आश्वासन दिले. संत्रा पिकांना लागलेली गळती यावर एक सक्षम असा नियोजन आराखडा करण्याचे निर्देश राज्यमंत्र्यांनी दिले. यानुसार शासन, प्रशासन (कृषी विद्यापीठ) व शेतकरी यांचा समन्वय घालण्याचा प्रयत्न होईल. कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, संशोधक व तज्ञ मंडळी आता थेट संत्रा बागांना भेट देत शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. भेटी दरम्यान संत्रा पिकाची पाहणी, झाडांचे व जमिनीचे नमुने घेत त्यावर संशोधन करण्यात येणार आहे. संत्रा कमल, नर्सरी आणि बहार ते तोडणी पर्यंत संत्रा पिकाच्या स्वस्थ वाढीसाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या –