राज्यातील द्राक्षे, नारळ, केळी, ड्रॅगन फ्रुट यांसह फुलांचा रोजगार हमी योजनेत समावेश – संदिपान भुमरे

औरंगाबाद – राज्यातील द्राक्षे, नारळ, केळी, ड्रॅगन फ्रुट यांसह फुलांचा रोजगार हमी योजनेत समावेश करण्यात आला असून याच बरोबर वैयक्तिक लाभाच्या विहिरीच्या संख्येतही वाढ करण्यात आली आहे. तसेच शेततळ्याची जुनी अट रद्द करण्यात आली असून मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या मोसंबीला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन रोजगार हमी मंत्री संदिपान भुमरे(Sandipan bhumre) यांनी केले.

पाचोड येथे सुमारे २६ कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येत असलेल्या महाराष्ट्र शासन व आशियाई विकास बँक अर्थासहीत महाराष्ट्र शासन ऍग्री बिझनेस नेटवर्क प्रकल्पांतर्गत महाराष्ट्र शासन राज्य कृषी पणन मंडळ पुणेच्या मोसंबी ग्रेडिंग व्हॅक्सिन कोल्ड स्टोरेजच्या भूमिपूजन प्रसंगी बोलताना व्यक्त केले. याप्रसंगी व्यासपीठावर दूध संघाचे उपाध्यक्ष नंदलाल काळे, बाजार समितीचे सभापती राजू भूमरे, उपसभापती कुसुम बोंबले यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलतांना संदिपान भुमरे म्हणाले की, शेतकऱ्यांना मोसंबी सह इतर फळांचे चांगल्या दर्जाचे रोपे मिळावी यासाठी पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानात ६२ एकर मध्ये सुमारे ३८ कोटी रुपये खर्च करून सर्वात मोठे मोसंबी संशोधन व रोपवाटिका केंद्र उभारण्यात येत आहे. या रोपवाटिकेतून दर्जेदार रोपे मिळाल्यामुळे मोसंबीच्या लागवड क्षेत्रात तसेच उत्पादनात निश्चितच वाढ होणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या कच्च्या मालाची प्रक्रिया करण्यासाठी बिडकीन येथे सुमारे ५०० एकर मध्ये फळ अन्नप्रक्रिया केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यामुळे या भागातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

औरंगाबाद पैठण या चौपदरी रस्त्याची घोषणा

औरंगाबाद-पैठण या चौपदरी रस्त्याचे काम लवकरच सुरू होणार असल्याची घोषणा यावेळी संदीपान भुमरे यांनी केली. ते म्हणाले, यासंदर्भात आपण नितीन गडकरी यांची भेट घेऊन या रस्ते कामाबद्दल बद्दल चर्चा केली आहे. हे काम लवकरच सुरू करणार असून रस्त्यासाठी लागणारी सर्व प्रक्रिया लवकरच पूर्ण करणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले आहे. प्राधिकरणाच्या माध्यमातून पैठण येथील संत शिरोमणी, संत एकनाथ महाराज मंदिर परिसराचा विकास केला आहे. याचबरोबर रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून तालुक्यातील प्रत्येक गावात पानंद रस्ते करण्यात येत असून याचा लाभ तालुक्याचे जनतेने घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

महत्वाच्या बातम्या –