साहित्य संमेलनातून मराठी भाषेच्या समृद्धीचा जागर करणार – छगन भुजबळ

नाशिक – मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. याच अनुषंगाने नाशिकमध्ये होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून मराठी भाषा अधिक समृद्धीचा जागर  करणार असल्याचे प्रतिपादन  राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी केले आहे.

नाशिक येथील भुजबळ नॉलेज सिटी येथे 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मुख्य मंडपाच्या भूमिपूजन कार्यक्रमच्या वेळी पालकमंत्री श्री. भुजबळ बोलत होते. यावेळी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार, नाशिक महानगरपालिकेचे महापौर सतीश कुलकर्णी, माजी खासदार समीर भुजबळ, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलिस आयुक्त दिपक पांडेय, संमेलनाचे निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर, विश्वास ठाकूर, डॉ. शेफाली भुजबळ, मुकुंद कुलकर्णी, संजय करंजकर, सुभाष पाटील, प्रा. शंकर बोऱ्हाडे, दिलीप साळवेकर, मिलिंद गांधी, रंजन ठाकरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री मंत्री छगन भुजबळ म्हणाले, भाषा ही समाजाला बांधून ठेवण्याचे काम करत असते. आईप्रमाणे अथांग असणाऱ्या मराठी भाषेला अधिक संपन्न, समृद्ध असल्याचे सिद्ध करण्याची संधी नाशिककरांना मिळाली असून या संधीचे सोने नाशिककर केल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वास पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी यावेळी  व्यक्त केला आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने  भुजबळ नॉलेज सिटीचे कुसुमाग्रज नगरीत रूपांतर होण्याऱ्या साहित्य संमेलनाच्या कामाची सुरुवात आजच्या भूमीपूजनातून होत आहे. नाशिक ही मुळातच साहित्याची नगरी असून साहित्य संमेलनाच्या माध्यमातून जगासमोर नाशिकची वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने संपूर्ण शहराचे कलात्मकतेने सजविण्यात येऊन विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे. तसेच संमेलनाच्या निमित्ताने येणाऱ्या साहित्यिकांची सेवा करण्याची संधी मिळणार आहे. या भूमीपूजन कार्यक्रमानंतर संमेलनाच्या कामाला वेग प्राप्त होणार असून सर्वांनी उत्साहाने कामाला लागावे, असेही पालकमंत्री तथा स्वागताध्यक्ष श्री. भुजबळ यांनी सांगितले.

साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,मराठी कादंबरीकार विश्वास पाटील, गीतकार जावेद अख्तर तर समारोप कार्यक्रमासाठी खासदार शरदचंद्र पवार आणि जेष्ट साहित्यिक माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर आदी उपस्थित राहणार असल्याचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

मराठी साहित्यासाठी नाशिकचे संमेलन ठरेल दिशादर्शक : केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार

केंद्रीय राज्य मंत्री डॉ.भारती पवार म्हणाल्या, प्रभू रामचंद्राच्या पावन भूमीत पार पडणार हे तिसरे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे. नाशिक ही साहित्याची कर्मभूमी असून नाशिकला सांस्कृतिक, धार्मिक वारसा लाभला आहे. हे संमेलन पालकमंत्री श्री. भुजबळ यांच्या पुढाकारामुळे नाशिकच्या मराठी साहित्य चळवळीसाठी  दिशादर्शक ठरेल, आणि नाशिककर मोठ्या सन्मानाने येणाऱ्या साहित्यिकांचे स्वागत करतील असा विश्वासही केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी यावेळी व्यक्त केला.यावेळी त्यांनी भाषणाच्या शेवटी एक स्वरचित कविता सादर केली.

 महापालिकेच्या वतीने करणार सर्वतोपरी सहकार्य : महापौर सतीश कुलकर्णी

 महापौर सतीश कुलकर्णी म्हणाले, कोरोनाच्या  संकटामुळे साहित्य संमेलनाला उशीर झाला असला तरी आयोजकांनी केलेली तयारी अतिशय उत्तम असून बाहेरून येणाऱ्या साहित्यिकांना आकर्षित करणार आहे. पालकमंत्री मंत्री छगन भुजबळ यांनी यात सहभागी  होऊन साहित्य संमेलनाला चांगली जागा उपलब्ध करून दिली आहे. नाशिक महानगरपालिकेच्या वतीने आवश्यक ते सहकार्य संमेलनाच्या यशस्वीतेसाठी करण्यात येईल असेही महापौर श्री. कुलकर्णी यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला महापौर सतिश कुलकर्णी यांच्या हस्ते संमेलनाच्या मुख्यमंडपाचे भूमिपूजन करण्यात आले. त्याचप्रमाणे संमेलन गीताच्या व्हिडिओचे उद्घाटन देखील यावेळी करण्यात आले.

महत्वाच्या बातम्या –