जनसुविधेच्या माध्यमातून होणारी कामे दर्जेदार व्हावीत – दादाजी भुसे

मालेगाव – जनसुविधा योजनेच्या माध्यमातून मंजूर झालेली सर्व कामे चांगली व दर्जेदार होण्यासाठी गावातील नागरिकांनी जागरुक राहिले पाहिजे. जनसुविधेच्या माध्यमातून होणाऱ्या कामांव्यतिरीक्त अजूनही गावाच्या विकासाच्या दृष्टीकोनातून जी काही गरजेची कामे प्रलंबीत आहेत, त्याचा पाठपुरावा करुन लवकरच गावातील सर्व मुलभूत सोयीसुविधा ग्रामस्थांना उपलब्ध करून देण्यासाठी शासनस्तरावर सदैव प्रयत्नशिल असल्याची ग्वाही राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी दिली.

काष्टी येथे मंजूर झालेल्या विविध विकास कामांचा भुमीपूजन कामांचा शुभारंभ कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बाजार समितीचे सभापती राजेंद्र जाधव, उपसभापती सुनिल देवरे, सरपंच उषाबाई खैरनार, गट विकास अधिकारी जितेंद्र देवरे, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे, नायब तहसिलदार विकास पवार, धनराज निकम, वसंत हिरे, गोकुळ सुर्यवंशी, बबन सोनवणे, अनिल बच्छाव, भरत खैरनार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

काष्टी येथे जनसुविधेच्या माध्यमातून सुमारे 65 लाखांची तर ठक्कर बाबा योजनेतून 7 लाख अशी विविध विकास कामांचे भुमीपूजन मंत्री श्री.भुसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलतांना ते म्हणाले, शेतकरी असो वा शेतमजुर यांची प्रगती कशी होईल त्या दृष्टीकोनातून कामकाज करणे ही आमची जबाबदारी आहे. येणाऱ्या काळात आदिवासी भागातील ग्रामस्थांना सोयीसुविधा कशा उपलब्ध होतील यावर लक्ष केंद्रीत करुन त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील. शेती महामंडळाच्या जागेवरील आदिवासी बांधवांच्या वस्तीच्या पुर्नवसनासाठी राज्यपातळीवर लवकर निर्णय होईल, त्या अनुषंगाने काष्टी येथील आदिवासी बांधवांना देखील न्याय मिळेल असा विश्वास मंत्री श्री.भुसे यांनी व्यक्त केला.

महादेव कोळी सह इतरही काही जातीचे लोक आहे ज्यांचा जातीच्या दाखल्यासंदर्भातील प्रश्न प्रलंबीत आहे. ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासनस्तरावर आवश्यक तो पाठपुरावा केला जाईल असे आश्वस्त करतांना मंत्री श्री.भुसे म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान आणि आनंद वाटेल असे पाच कृषी महाविद्यालये ही काष्टी येथील शेती महामंडळाच्या जागेवर साकारण्यात येत असल्याने काष्टीचे नाव हे संपूर्ण राज्यभरात पोहचेल. काष्टी येथील कृषी महाविद्यालयाच्या बांधकामाला लवकरच सुरुवात होणार असून या कृषी महाविद्यालयाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील असा विश्वासही मंत्री श्री.भुसे यांनी यावेळी व्यक्त केला.

यासोबतच तालुक्यातील अंजग येथे साकारण्यात येणाऱ्या एम.आय.डी.सीच्या माध्यमातूनही बेरोजगारांच्या हाताला काम मिळणार असल्याचे सांगतांना मंत्री श्री.भुसे म्हणाले, गावातील संजय गांधी निराधार योजनेतील पात्र लाभार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांनाही लाभ मिळवून देण्यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.

कृषी विभागामार्फत राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान आणि ग्रामबिजोत्पादन कार्यक्रमांतर्गत मालेगाव तालुक्यात गहू, हरभरा या वाणाचे बियाणे शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात उपलब्ध होणार आहेत. ज्या शेतकऱ्यांना गव्हाचा बिजोत्पादन कार्यक्रम घ्यावयाचा असेल त्यांना रुपये 12 प्रति किलो अनुदान आहे. हरभरा ग्राम बिजोत्पादन तसेच प्रमाणित बियाणे वाटप करताना राजविजय 202 वज्ञविक्रम हे वाण उपलब्ध असून त्याकरिता महाबीज मार्फत कृषी विभागाच्या वतीने आहे. ज्या शेतकरी बांधवांना गहू हरभरा बीजोत्पादन तसेच हरभरा वाणाची लागवड करावयाची असेल त्यांनी कृषी विभागाकडून परवाना घेऊन महाबीज कडून बियाणे उपलब्ध करून घ्यावे. असे आवाहनही मंत्री श्री.भुसे यांनी यावेळी केले.

महत्वाच्या बातम्या –