२० नोव्हेंबरपर्यंत पहिल्या डोसचे १०० टक्के लसीकरण व्हावे – सतेज पाटील

कोल्हापूर – येत्या २० नोव्हेंबरपर्यंत कोणत्याही परिस्थितीत पहिल्या डोसचे १०० टक्के लसीकरण व्हावे, अशी अपेक्षा पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केली. शासकीय विश्रामगृहातील राजर्षि शाहू सभागृहात ‘पालकमंत्री कोविड लसीकरण’ प्रोत्साहन योजनेंतर्गत सामाजिक संस्थांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले, कोविडला तिसऱ्या लाटेपासून थोपविण्यासाठी जनतेचे लसीकरण आवश्यक आहे. जनतेने स्वतःचे दोन्ही डोस पूर्ण होण्याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे.  ज्यांचा पहिला डोस पूर्ण झाला आहे त्यांनी दुसरा डोस घ्यावा. तसेच ज्यांचे लसीकरण अपूर्ण आहे त्यांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी आरोग्य यंत्रणेबरोबरच सामाजिक संस्थांनीही पुढाकार घ्यावा, असे आवाहन करून जिल्ह्यातील अनाथ, फिरस्ती तसेच ज्यांच्याकडे आधार कार्ड अथवा इतर आवश्यक कागदपत्रे नसतील अशा लोकांचे येत्या १९ तारखेला लसीकरण करण्यात यावे, अशी सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी केली.

८ तारखेला जिल्ह्यातील सर्व तहसिलदार व बीडीओंच्या होणाऱ्या आढावा बैठकीत , जे नागरीक लसीकरणापासून वंचित राहिले आहेत अशांचे लसीकरण व्हावे यासाठी स्वंयसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा तसेच या कामाबाबत गावनिहाय कार्यकर्त्यांची यादी तयार करण्यात यावी, अशी सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केली.

तर जिल्ह्यात कोविडच्या अनुषंगाने  84 टक्के लोकांनी पहिला तर 41 टक्के लोकांनी दुसरा डोस घेतला असून जिल्ह्यातील 145 गावांतील 18 वर्षावरील नागरीकांचे 1OO टक्के लसीकऱण पूर्ण झाल्याची माहिती सीईओ संजयसिंह चव्हाण यांनी दिली.

प्रारंभी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ . साळे यांनी आत्तापर्यंत झालेल्या लसीकरणाचा आढावा ‘ पावर प्रेझेंटेशन ‘ द्वारे सादर केला. यावेळी पालकमंत्र्यांनी लसीकरणाचा वेग वाढविण्यासंदर्भांत विविध स्वंयसेवी संस्थांकडून आलेल्या सूचना ऐकून घेवून त्यानुसार कार्यवाही करण्याची ग्वाही दिली. जिल्हा लसीकरण अधिकारी फारूक देसाई यांनी आभार व्यक्त केले. या आढावा बैठकीसाठी जिल्ह्यातील अनेक स्वंयसेवी संस्था आणि त्याचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या –