स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांच्या सूचना विचारात घेऊन महामार्गाचे काम करा – बाळासाहेब पाटील यांच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना सूचना

सातारा –  सातारा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 (जुना क्र.4) चे    सहा पदरीकरणाचे काम स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन तसेच गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करण्याच्या  सूचना सहकार, पणन तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना केल्या.

सातारा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 (जुना क्र.4) अंतर्गत रस्ता रुंदीकरण (सहा पदरीकरण) डीपीआरबाबत पालकमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात बैठक झाली. या बैठकीला खासदार श्रीनिवास पाटील, जि.प.चे अध्यक्ष उदय कबुले, जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, महामार्गाचे प्रकल्प संचालक वसंत पंधरकर, चंद्रकांत भरडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, पावसाळ्यात पुराचे पाणी महामार्गावर येते त्यामुळे वाहतूक थांबते, अशा ठिकाणी पहाणी करुन त्या ठिकाणची रस्त्यांची उंची वाढवावी. ज्या ठिकाणी नवीन पुल करण्यात येणार आहेत त्या पुलांवरील बाजुचे कठडे मजबुत करा. महामार्गाच्या बाजुला तयार करण्यात येणारा सर्व्हिस रोड स्थानिक लोकांशी चर्चा करुन व मदतीने उत्तम दर्जाचे करा. तसेच या सर्व्हिस रोडवर कुठेही पाणी साठणार नाही याची दक्षता घ्या. तसेच महामार्गावरील अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी महार्गावर कुठेही पिकप शेड करु नये, अशा सूचनाही पालकमंत्री श्री. पाटील यांनी  यावेळी केल्या.

लोकांचे समाधान होईल, असे काम करा. त्याचबरोबर कामाचा दर्जाही चांगला ठेवा. महामार्गच्या नजीक येणाऱ्या प्रत्येक गावाच्या नावाची पाटी महामार्गावर लावावी, अशा सूचना खासदार श्रीनिवास पाटील यांनी केल्या.

स्थानिक नागरिक व शेतकरी यांच्या अडचणी लक्षात  घेऊनच तयार करण्यात येणाऱ्या महामार्गावरील पुलांची कामे करावी, अशा सूचना जि.प.चे अध्यक्ष श्री. कबुले यांनी केल्या.

जिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणाले, महामार्गाच्या कामासाठी जिल्हा प्रशासनामार्फत पूर्णपणे सहकार्य राहिल.

या बैठकीत  महामार्गाचे प्रकल्प संचालक वसंत पंधरकर यांनी महामार्गाच्या कामाचे सविस्तर सादरीकरण केले.   मान्यवरांनी केलेल्या सूचनांचा विचार करुनच  महामार्गाचे काम केले जाईल, असेही श्री. पंधरकर यांनी यावेळी सांगितले.

महत्वाच्या बातम्या –